मराठ्यांचे कर्नाटकावर निर्विवाद वर्चस्व :
लेखन :
गडवाटकरी 'सचिन पोखरकर'
कर्नाटकातील कांचीपूरमचा मोगल सुभेदार अली मर्दानखान होता. तो जिंजीला रसद पुरवून मार्गाचे रक्षण करीत होता. संताजी घोरपडेने त्याला कैद केले, त्यांची नोंद जेधे शकावलीत मिळते. या शिवाय भीमसेन सक्सेना या लढाईची माहिती देतो. संताजीने खानास कैद करून त्याच्याकडून मोठी खंडणी घेऊन त्यास सोडून दिले. अशा प्रकारे मराठा फौजांमुळे जुल्फिकार खानाची ताराबंळ उडाली. मोगल सेनानीवरील संताजी व धनाजीच्या नेत्रदिपक विजयानंतर मराठ्यांनी ताबडतोब हैद्राबाद, कर्नाटक, कडाप्पा व कांजीवरम प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करून केशव रमन्ना याची मराठा सुभेदार म्हणून नेमणूक करून त्याच्या हाताखाली एक हजार घोडदळ व चार हजार पायदळ जानेवारी १६९३ मध्ये ठेवले. याचाच अर्थ संताजी व धनाजी जाधवांनी कृष्णेच्या दक्षिणेकडील सर्व कर्नाटकी प्रदेश छत्रपती राजारामराजेंच्या नावे मराठा राज्यात सामील केला व तसा जाहीरनामा काढला..
मराठ्यांनी घवघवीत यश मिळविल्याने त्यांनी मोगलांच्या कर्नाटक व मद्रास परिसरातील हालचालींना पायबंद केला, त्यांचे दळणवळण बंद पाडले व रसद थांबविली. अशा प्रकारे जिंजीला वेढा देण्याऱ्या मोगलांनाच धनाजी जाधवांच्या सैन्याने वेढल्याचे दिसते, या वेळेसच्या मराठ्यांच्या विजयाचे वर्णन मार्टिन पुढील प्रमाणे करतो :
“भाले व तलवारी ही मराठ्यांची शस्त्रे आहेत. त्यांच्यात काही धनुर्धारी असून ते संख्येने कमी आहेत. या बाबतीत मोगल हे मराठ्यांपेक्षा सरस आहेत. ते नेमबाजीत श्रेष्ठ आहेत कारण त्यांच्याकडे धनुर्धारी जास्त संख्येने आहेत. त्यामुळे मराठे हे मोगलांपुढे जाण्यास धजावत नाहीत. युध्दात मोगल हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असे मराठ्यांना वाटत होते. ३/४ हजार मराठ्यांसमोर एक हजार मोगल कधीच माघार घेणार नाहीत..”
“परंतु मराठे हे गनिमीकाव्यात मोगलांपेक्षा सरस आहेत. मराठे हे मोगलांपेक्षा शारिरिक कष्टाच्या कामात श्रेष्ठ आहेत. ते वैयक्तिक ऐषारामाची पर्वा करीत नाहीत. ते आपल्या सोबत जास्त सामान बाळगीत नाहीत आणि लहान सहान गोष्टीने देखील त्यांचे समाधान होते..”
तर खाफीखानाच्या मते, मराठ्यांकडे जवळपास १५ ते २० हजार घोडदळ होते. संताजी त्यांचा प्रमुख सरदार होता. कित्येक श्रीमंत शहरे लुटणे व प्रसिध्द सेनापतींवर हल्ला करण्यासाठी तो प्रसिध्द होता. जे कोणी रणांगणावर त्याच्या समोर येत असत त्यांना खालील तीनपैकी एक परिणाम भोगावा लागत असे :
१. एक तर ते ठार मारले जात,
२. जखमी किंवा कैद होत, आणि
३. शेवटी त्यांचा पराभव होत असे.
.
मोगल सैन्यास संताजी व धनाजींची खूप दहशत भीती होती. ह्या मराठा सरदारांपैकी एखादा जरी आपल्या प्रदेशात आला तरी शूर मोगल सरदारांची देखील भीतीने गाळण उडत असे. त्यामुळे कोणताही प्रसिध्द मोगल सरदार संताजी धनाजीशी सामना द्यायचे क्वचितच धाडस करीत असे..
――――――――――
Ram Deshmukh
No comments:
Post a Comment