स्वराज्याची राजधानी दक्षिणदौलत किल्ले जिंजी...
जिंजी किल्ल्यावर खरी क्रांती घडून आली, ती छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात. छत्रपती राजाराम महाराजांच्या चाणाक्ष बुद्धी आणि अचूक धोरणामुळे मोगली सत्तेचा वरवंटा जिंजीच्या आसमंतात स्थिर झाला. याच काळात मोगल आणि मराठ्यांच्या रणसंग्रामात कधीही जिंकू न शकणाऱ्या युद्धात मराठ्यांची बाजू सरस होत गेली. याचे श्रेय अर्थातच छत्रपती राजाराम महाराजांनाच द्यावे लागेल. जिंजीच्या साक्षीने छत्रपती राजाराम महाराजांनी उत्तर आणि मध्य भारताला उसंत प्राप्त करून दिली...
औरंगजेबाचा सर्वात विश्वासू आणि नावाजलेला सेनापती, छत्रपती राजाराम महाराजांनी पाहता पाहता मराठ्यांच्या दावणीला कधी बांधला याचा औरंगजेबाला थांगपत्तादेखील लागला नाही. लढाई केवळ शौर्यानेच जिंकली जाते. या विचारसरणीला मराठ्यांच्या या राजाने चक्क निकालात काढले होते. छत्रपती राजाराम महाराजांनी केवळ जिंजीचा आश्रय घेतला नाही, तर जिंजीच्या परिसरात त्यांनी मराठा साम्राज्याचा पाया भक्कम केला. जिंजीच्या किल्ल्यावर त्यांनी पाण्याची टाकी खोदली. त्यामुळे नायक काळात अडगळीत पडलेली शिवाची मंदिरे पुन्हा प्रकाशमान झाली. जिंजीच्या किल्ल्यांनी जसा छत्रपती राजाराम महाराजांचा मुत्सद्दीपणा पाहिला, तसाच मराठ्यांच्या गोटात झालेला बेबनावदेखील पाहिला. त्याने सेनापती धनाजी संताजींच्या पराक्रमाची झलक तर पाहिलीच, त्याच बरोबरच दोन जिवलग सेनापती मित्र कालचक्रात अडकून परस्परांविरोधात उभे ठाकलेले देखील पाहिले...
काळाची दिशा ओळखून छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीचा किल्ला सोडला आणि ते महाराष्ट्रात परत आले. त्यानंतर जिंजीच्या किल्ल्याची अक्षरशः कळा गेली. जिंजी किल्ल्याने अनुभवलेले वैभव व संपन्नता त्यानंतर त्याला आजवर अनुभवता आली नाही. छत्रपतींपेक्षा मोठ्या राजसत्तांनी जिंजी जिंकला, परंतु त्यांना जिंजीला त्यांची हरवलेली प्रतिष्ठा मिळवून देणे कदापि शक्य झाले नाही...
● तरीही जिंजी आज मोठ्या थाटात उभा आहे. राजगिरीच्या कातळातून डोके वर करून तो सांगू पाहतोय,
'...होय, ही तीच पवित्र भूमी आहे. ज्या भूमीवर शिवछत्रपतींचे चरणस्पर्श झाले. मी तोच आहे, ज्याने वेळप्रसंगी आपल्या अंगाखांद्यावर छत्रपतींचे स्वराज्य टिकवले. याच भूमीत मराठ्यांनी स्वराज्याच्या स्वातंत्र्याचे अंकुर पुन्हा वाढवले. भारत व जगाच्या इतिहासावर प्रभाव टाकणाऱ्या इतिहासाचा साक्षीदार मीच आहे. मी माझ्या उदरात आजही स्वातंत्र्यप्रिय मराठ्यांची हाडे जपून ठेवली आहेत. काळ बदलेल, सत्ता बदलतील; परंतु प्राणपणाने या भारतभूसाठी मराठ्यांनी रचलेला इतिहास मी ताठ मानेने येणाऱ्या पिढ्यांना वर्षानुवर्षे सांगत राहीन...'
पुस्तकाचे लेखक, अभ्यासक : अमर साळुंखे (भाऊ मराठा).

No comments:
Post a Comment