*
३२२ वर्षांपूर्वी ची पुण्यातील अपरिचित घटना*
लेखक :- अतुल तळाशीकर
पुण्यात औरंगजेबाची छावणी आजच्या स्वारगेट पासून गोळीबार मैदानाच्या पलीकडे पसरलेली होती. खुद्द औरंगजेबाचे निवासस्थान हे स्वारगेट आणि गोळीबार मैदान यांच्या मध्ये भवानी पेठेच्या कोपऱ्यावर ओढ्याच्या काठ्यावर उभे होते. छावणीतील माणसांची संख्या चाळीस ते पन्नास हजार असावी व सैनिकांची संख्या वीस ते पंचवीस हजार असावी.
एक दिवस अचानक औरंगजेबाने हमीदुद्दीन खानाला बोलावलं आणि फर्मावलं की तू शाहू कडे जा व त्याला सांग माझा निरोप की तू मुसलमान हो. हमीदुद्दीन खान तडक तसाच शाहू राजांच्या कडे आला. त्याने बादशहा चा निरोप शाहू राजांना सांगितला. आता शाहू राजांनी हमीदुद्दीन खानाचा निरोप ऐकला आणि त्यावर हमीदुद्दीन खानाचा मी मुसलमान होणार नाही असा स्पष्ट नकार दिला. हमीदुद्दीन खानाने तो निरोप जसाच्या तसा औरंगजेबाला कळवला, यावर बादशहा हमीदुद्दीन खानाला म्हणाला शाहू वर कडक नजर ठेवा.....
ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री सेतुमाधवराव पगडी म्हणतात, शाहू राजांनी धर्मांतराला नकार दिल्यामुळे महाराष्ट्रातील केवढे तरी मोठे संकट टळले. शाहू राजांना असा ठाम निर्णय घेण्याची शक्ती कोठून आली असावी? त्याचा विचार करता आपले लक्ष येसूबाईंकडे जाते. मोगलांच्या छावणीतील सगळे वातावरण आणि संस्कार हे मुसलमानी धर्माला पोषक होते. बादशहाच्या सान्निध्यात,निर्बंधात राहात असतांना शाहू राजांच्या संस्कारक्षम वयात त्यांच्या मनावर धर्मांतराला अनुकूल असे परिणाम होणे काही अशक्य नव्हते. पण असे घडले नाही. याला मोठे कारण म्हणजे शाहू राजांवर येसूबाईंचीं सतत नजर हेच होय. सतत १८ वर्षेपर्यंत शाहू राजे हे मुगलांच्या निर्बंधात होते. या काळात त्यांची आई येसूबाई ही त्याच्या मागे सतत सावली सारखी वावरत होत्या. शाहू राजांचे धर्मरक्षण येसूबाईने महाराष्ट्राच्या या जगदंबेने केले असेच म्हणावे लागेल.
ही घटना घडली होती ज्युलियन कालगणनेनुसार ९ मे १७०३ या दिवशी, ते ही आपल्या पुण्यात. पुणे पुन्हा नव्याने वसवलं होत शिवप्रभुंनी, पुणे जिथं शंभूराजांनी धीरोदात्तपणे हौतात्म्य पत्करले होते त्या त्या पुण्यातच शिवप्रभुंच्या नातवानं, शंभूराजांच्या सुपुत्राने शाहू राजांनी औरंगजेबाला धर्मांतर करणार नाही हा ठाम व स्पष्ट नकार कळवला होता व आपल्या घराण्याचे नाव राखलं होतं.

No comments:
Post a Comment