दक्षिण कोकण आणि गोव्यात मोघलांची फजिती...
फोंड्याच्या मदतीस आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे जवळपास दोन महिने पोर्तुगीजांची अवस्था फार दयनीय करून टाकली होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या धास्तीने शेवटी सेंट झेवियरच्या मृत शरीरास शरण जाऊन पोर्तुगीजांनी प्रार्थना केली. तरीही पोर्तुगीजांना शेवटची आशा होती ती मोघल राजपूत्र शहा आलम याच्या सैन्याच्या कोकणातील आगमनाची. हा शहा आलम सुशेगाद (आरामात) येत होता. त्याने कोल्हापूर सोडून पुढे कोकणात येण्यासाठी सह्याद्रीच्या डोंगर रांगात शिरल्यावर त्याच्या आघाडीच्या सैन्याला मराठ्यांच्या गनिमी काव्याने फार जेरीस आणले होते. कसाबसा शहा आलम रामघाटाजवळ (तिळारी खोऱ्यातील घाट) पोहोचला. मोघल सैन्य गोव्याच्या जवळ येत आहे. हाच मोठा चमत्कार पोर्तुगीजांना वाटला. तरीही पोर्तुगीजांनी आपली मौल्यवान संपत्ती, बायका-मुले, गुरे-ढोरे मूरगाव (वास्को) बंदरात नेऊन ठेवली. कदाचित संभाजी महाराजांमुळे शेवटचा आणिबाणीचा प्रसंग आलाच तर आपली बायका-मुले तरी सुरक्षितपणे गोव्यातून बाहेर पडावी यासाठी खबरदारी घेतली आणि आश्चर्य म्हणजे आपली पोर्तुगीज भारताची राजधानी असणारे जुने गोवे (ओल्ड गोवा) त्यांना असुरक्षीत वाटू लागले. त्यांनी जुने गोव्यातून मूरगाव म्हणजे आजचे वास्को येथे राजधानी हलविण्याचा निर्णय घेतला होता. कारण संभाजी महाराजांच्या युद्धामुळे विजरईस कळून आले होते की मराठ्यांविरूद्ध गोवे शहराचे रक्षण करणे ही एक अशक्य गोष्ट आहे. पोर्तुगीजांकडे गोव्यात चांगले आरमार होते...
गोवा शहराला फार मोठी तटबंदीची मजबूत भिंत होती. खाडीच्या बाजूला धावजी, गवंडळ, बाणस्तरी, करमळी, डोंगरी येथे मोठे गडगंज बुरूज होते. शहराजवळ पाणवेली येथे मोठा दारूगोळ्याचा कारखाना होता. हे शहर तिसवाडी बेटावर मांडवी उर्फ म्हादई नदीच्या तिरावर होते. ही नदी जेथे समुद्राला मिळते तेथे मुखावर आग्वाद, रेईस मागूस हे उत्तर तिरावर आणि काबू, गॅस्पर द डायस हे दक्षिण तिरावर भरभक्कम गडकोट होते. या गडावरील तोफांच्या माऱ्याच्या टप्प्यामुळे कोणतेही शत्रूचे जहाज मांडवी नदीच्या मुखात शिरणे अशक्यप्राय होते. असे असून देखील विजरईला छत्रपती संभाजी महाराजांच्या दहशतीने राजधानी गोवे शहरातून मूरगावला हलविण्याची गरज भासली. पुढे काही काळानंतर पोर्तुगीजांनी मूरगाव राजधानी न करता पणजी हे राजधानीचे मुख्य ठिकाण केले...
इतिहासकार वा.सी.बेंद्रे

No comments:
Post a Comment