विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 20 November 2025

छत्रपती संभाजीराजे यांनी यवनी व फिरंगी राजवटी विरुद्ध अविश्रांत दिलेला अविस्मरणीय लढा

 


छत्रपती संभाजीराजे यांनी यवनी व फिरंगी राजवटी विरुद्ध अविश्रांत दिलेला अविस्मरणीय लढा हा जागतिक इतिहासातील सर्वात अतुलनीय आणि तेजस्वी लढा होय..!

१४ नोव्हेंबर १६८३ :
छत्रपती संभाजी महाराजांची ४० लोकांची एक तुकडी ओहटीचा फायदा घेऊन सेंट स्टीफेन (St Estevam or Jua or Chambharjua) बेटावर गेली. तेथे पहारा वगैरे नसल्याने ते लोक थेट किल्ल्यापर्यंत वर चढून गेले. गोव्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्याला बरेच महत्त्व होते. तट फार उंच होते. म्हणून शिड्या लावून संभाजीराजांचे लोक आत शिरले, प्रतिकार काहीच झाला नाही. तोफखानेवाला, लष्कर व म्हातारा किल्लेदार इतके आत होते. त्यास त्यांनी ठार मारले. आपल्या दुसऱ्या टोळीला इशारा देण्यासाठी म्हणून त्यांनी तोफांचे आवाज काढले. हे तोफांचे आवाज गोव्यात ऐकू गेले. तेव्हा किल्ल्यावर काहीतरी गडबड आहे असे समजून व्हाइसराय जे लोक मिळतील ते बरोबर घेऊन सेंट स्टीफेन समोरील डोंगी (Dongium) नावाच्या गावी आला. त्याला सेंट स्टीफेनचा कोट शत्रूच्या ताब्यात गेल्याचे तेथे समजले. शत्रूने काढलेले तोफांचे आवाज त्यांनी आपल्या दुसऱ्या टोळ्यांस इशारा म्हणून दिले असावेत असे जाणून व्हाइसरायने त्यांचा मार्ग बंद करण्याकरिता शेजारील शेतांचे बांध फोड़न सेंट स्टीफेन सभोवती पाणीच पाणी केले. ते करण्यास सांगितल्या नंतर आणखी दोन बटॅलिअन्स तोफखान्यासह ताबडतोब मागविली. परंतु व्हाइसरायने दिलेल्या हुकुमाप्रमाणे व्यवस्था घडून आली नाही..."
● १५ नोव्हेंबर १६८३ :
सकाळी सात वाजता व्हाइसराय चारशे लोकांसह सेंट स्टीफेनच्या चर्चपर्यंत गेला. तोफा आणीपर्यंत वर जाऊ नये असा काहींचा विचार होता, परंतु व्हाइसरायने तो मानला नाही. कारण संभाजी महाराजांचे अधिक लोक येण्यापूर्वी सर्व कार्यभाग उरकणे आवश्यक होते. तेव्हा व्हाइसरायबरोबर अवघे तीनशे लोक वर चढू लागले. टेकडीचा चढ कठीण व खडकाळ होता. व्हाइसराय किल्ल्याच्या पायथ्याशी गेला. तेव्हा त्याचे जवळ दोनशे तीस माणसे राहिली. व्हाइसरायने जोराचा हल्ला चढविताच शत्रुसैन्य पळून गेले. परंतु इतक्यात त्यांच्या मदतीस ३०० घोडेस्वार आल्याने संभाजी महाराजांच्या लोकांनी परत फिरून जोरात भांडण दिले. व्हाइसरायने आपल्या लोकांस शिस्तीने माघार घेण्यास सांगितली. परंतु व्हाइसरायच्या तोंडून हे शब्द निघताच पोर्तुगीजांनी जीव घेऊन पळण्यास सुरूवात केली. व्हाइसरायने त्यास न पळता तोंड देत देत चला म्हणून डोळ्यात पुष्कळ अश्रु आणून आणि विनवून पाहिले. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. या झटापटीत व्हाइसरायने चार गोळ्या झाडून तीन लोक मारले. परंतु व्हाइसरायला आपल्या पळणाऱ्या लोकांबरोबर जाणे भाग पडले. तेव्हा संभाजी महाराजांच्या लोकांनी मोठमोठे अणकुचीदार दगड तेथे मुबलक होते ते खाली ढकलून व फेकून देण्याचा सपाटा लावला. त्यामुळे कित्येकांची डोकी फुटली व कित्येकांस इतर दुखापती झाल्या. पूर्वेकडील वसाहतीत पूर्वी कधीही न पाहिला असा आकांत त्या दिवशी गोव्यात अनुभवास आला. मेलेल्यात दीडशेपेक्षा अधिक लोक होतेच. परंतु त्यावेळी गेलेल्यापैकी एकही असा माणूस राहिला नव्हता की त्याला जखम झाली नाही. व्हाइसरायच्या दंडात गोळी लागली होती आणि दोम रॉड्रिगो द कोस्तच्या ताडावर दुसरी गोळी लागून तोही जखमी झाला होता. व्हाइसराय चाळीस लोकांनिशी प्रतिकार करीत करीत दोन वाजता खाडीवर आला. छातीभर पाण्यात शिरून तो व जनरल जेमतेम मचव्यात बसले व पळाले. सर्वांची घोडी संभाजी महाराजांच्या लोकांनी घेतली. राहिलेले एकशेवीस लोक खाडीत शिरले. परंतु त्यांना नौकावाहन न मिळाल्यामुळे काही चिखलात रुतून बसले. त्यांना संभाजी महाराजांच्या लोकांनी मारले, काही भरती वाढल्याने वाहून गेले. बरेच बुडून मेले. थोडे किंवा क्वचित चार पाच पोहून पैलतीराला गेल्याने वाचले. अशा रीतीने सेंट स्टीफेन बेटावरील दुर्दैवी आणि विनाशक अशा स्वारीचा शेवट झाला. हा सर्व दुर्दैवी देखावा पलीकडील लोकांनी व गोवा शहरातील लोकांनी पाहिला. हजारो लोकांनी उभे राहून हा फार मोठा मनुष्यसंहार पाहिला, परंतु कोणीही मदतीस धावून गेले नाही. रात्री संभाजी महाराजांच्या लोकांनी सेंट स्टीफेन चर्चची व आतील मूर्तीची वगैरे नासधूस करून टाकली..."
या अहवालात व्हाइसरायने दोन पोर्तुगीज बटालिअन्स मागविली होती त्यांच्या हालचालींचा उल्लेख मुद्दाम गाळलेला दिसतो. जो एवढा आकांत झाला तो २०० लोक मारल्याचा नसून त्याबरोबर पोर्तुगीजांची ही निवडक दोन बटलिअन्स गारद केली गेली त्यांचा होता. येथेच छत्रपती संभाजीराजांस भरतीच्या प्रवाहात सापडल्याने संकट प्राप्त झाले होते. संभाजी महाराजांनी डाव खेळून सेंट स्टीफेनवर हुलकावणी दाखवून त्याच्या आवाक्याबाहेर गोव्यात जाऊन बसलेले पोर्तुगीज सैन्य पुन्हा आपल्या अंगावर घेऊन त्यांचा फडशा उडवला अशी ही घटना पोर्तुगीज अहवालावरूनच सिद्ध आहे...
● १६ नोव्हेंबर १६८३ :
संभाजी महाराजांचे आज्ञेवरून सेंट स्टीफेन बेटावरील सैनिक जलदीने दुसरीकडे निघून गेले. आणि मनुची लिहितो की, ते तेथून निघून जाण्यापूर्वी त्यांनी तोफा निकामी करून टाकण्याचा हुकूम दिला होता. त्याप्रमाणे एक तोफ स्फोट करवून फोडली, परंतु दुसऱ्या फुटल्या नाहीत म्हणून त्यात खिळे ठोकून त्या निकामी केल्या. या प्रसंगाची माहिती तत्कालीन कागदपत्रातही इतरत्र मिळते...
इतिहासकार : वा.सी.बेंद्रे.

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...