प्राचीन काळी
'सेंद्रक' नावाचे जे विख्यात क्षत्रिय घराणे होते, त्यावरूनच पुढे 'शिंदे' हे नाव रूढ झाले. दख्खनच्या इतिहासात बहामनी राज्यापासूनच शिंद्यांची कित्येक घराणी आपल्या तलवारीच्या जोरावर उदयास आली. याच पराक्रमी वंशातील एक महत्त्वाचे स्थान म्हणजे साताऱ्यापासून अवघ्या सहा कोसांवर, कोरेगाव तालुक्यातील 'कण्हेरखेड' हे गाव होय. येथील पाटीलकी वंशपरंपरेने शिंदे घराण्याकडे चालत आलेली असून, याच कुळातील जनकोजी शिंदे हे थोर पुरुष स्वतः छत्रपती शाहू महाराजांच्या सेवेत रुजू होते. शिंदे घराण्याचा आणि खुद्द छत्रपतींच्या भोसले घराण्याचा संबंध तसा जुनाच; याच घराण्यातील अंबिकाबाई यांचा विवाह सातारच्या छत्रपती शाहू महाराजांशी झाला होता, ज्या महाराज मोगलांच्या कैदेत असतानाच वारल्या. मात्र, शिंद्यांचा उत्कर्ष केवळ नात्यागोत्यामुळे झाला नाही, तर तो राणोजीरावांच्या मनगटातील ताकदीवर आणि अतुलनीय कर्तबगारीने झाला. थोरल्या शाहू महाराजांच्या काळातच राणोजीरावांचा नावलौकिक खऱ्या अर्थाने वाढू लागला.
अगदी सामान्य पायदळापासून आपली कारकीर्द सुरू करणारे राणोजीराव शिंदे, आपल्या अंगभूत गुणांनी लवकरच वरचढ ठरले. त्यांनी इ.स. १७२६ मध्ये माळव्यात मराठा स्वराज्यासाठी चौथाई आणि सरदेशमुखीच्या वसुलीला प्रथम सुरुवात केली. इ.स. १७२७-२८ पासून राणोजीरावांचा खरा देदीप्यमान कार्यकाळ सुरू होतो. माळवा प्रांतातून चौथ व सरदेशमुखी वसूल करण्यासाठी मल्हारराव होळकर यांच्या जोडीला राणोजी शिंदे यांची नेमणूक करण्यात आली होती. याच काळात माळवा प्रांताचा मोगल सुभेदार गिरीधर बहाद्दर याचा जो निर्णायक पराभव मराठ्यांनी केला, त्यात उदाजी पवार आणि मल्हारराव होळकर यांच्या खांद्याला खांदा लावून राणोजी शिंदे यांनी आपल्या शूर पथकासोबत रणांगण गाजवले. या पराक्रमामुळेच उत्तरेत मराठ्यांचे बस्तान बसले.
राणीजीरावांचे आणि उज्जैनचे नाते अतूट होते. इ.स. १७३५ पासून राणोजी शिंदे यांनी आपले लष्करी मुख्यालय उज्जैन येथेच ठेवले होते. पुढे इ.स. १७३७ ते १८८० या प्रदीर्घ काळात उज्जैनवर शिंदे घराण्याचे एकछत्र राज्य होते. उज्जैन ही शिंदे राज्यकर्त्यांची राजधानी होती आणि राणोजीरावांच्या काळात उज्जैनचा खूप विकास झाला. राणोजीरावांनी केवळ राज्यविस्तार केला नाही, तर धर्माचे रक्षणही केले. त्यांनी उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. शिंदे घराण्याचे संस्थापक राणोजी शिंदे यांचे विश्वासू मंत्री रामचंद्र शेणवी यांनी उज्जैन मध्ये सध्या असलेले भव्य महाकाल मंदिर बांधले, जे आजही त्यांच्या धर्मकार्याची साक्ष देते. पुढे १८१० मध्ये शिंदे घराण्याची राजधानी उज्जैनहून ग्वाल्हेर येथे हलविण्यात आली.
राणोजीराव हे स्वभावाने अत्यंत स्वाभिमानी आणि स्वराज्याचे एकनिष्ठ सेवक होते. जुलै १७३६ च्या दरम्यान त्यांनी महादेव भट्ट हिंगणे यास पाठविलेल्या एका पत्राद्वारे त्यांची ही स्वराज्यनिष्ठा आणि स्वाभिमानी बाणा विशेष खुलून दिसतो. इ.स. १७३५ ते १७४५ या दशकात मराठ्यांचे उत्तरेत बस्तान बसविण्याच्या कामगिरीत राणोजीराव सतत आघाडीवरच होते. त्यांचा दरारा आणि राजकीय वजन इतके होते की, जयपूरचा शासक सवाई जयसिंह याच्या मृत्यूनंतर, जयपूरच्या गादीवरून चाललेल्या वारसाहक्काच्या वादात ईश्वरसिंहाने राणोजी शिंदे यांना विशेष पत्र लिहून मदतीस बोलावले होते. यावरून राजस्थानातील राजकारणात त्यांचा शब्द किती मोलाचा होता हे लक्षात येते. या केलेल्या मदतीखातर राणोजीरावांना तब्बल ६६ लाख रुपये मिळाले होते, जे त्यांच्या सामर्थ्याचे द्योतक आहे.
अशा प्रकारे उत्तरेत सुमारे ५० ते ६० लाख रुपये उत्पन्नाचा प्रदेश आणि सात राजपूत राजे ज्यांच्या वर्चस्वाखाली होते, अशा या रणमर्द सेनानायकाचा शेवटही कर्मभूमीवरच झाला. छ. शाहू राजांच्या पदरी असणाऱ्या आणि पेशवे बाजीरावांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या या महापराक्रमी वीराचा १९ जुलै १७४५ रोजी मध्य प्रदेशातील 'शुजालापूर' या ठिकाणी स्वर्गवास झाला. कण्हेरखेडच्या पाटीलकीपासून सुरू झालेला हा प्रवास, उज्जैनच्या राजधानीपर्यंत आणि पुढे ग्वाल्हेरच्या विशाल राज्यापर्यंत पोहोचला, याचे संपूर्ण श्रेय श्रीमंत राणोजीराव शिंदे यांच्या असामान्य शौर्याला जाते.

No comments:
Post a Comment