विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 22 January 2026

महाबली शहाजीराजे भोसले 🙏🚩

 


महाबली शहाजीराजे भोसले 🙏🚩
हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात शहाजीराजे भोसले यांचे स्थान अत्यंत मूलभूत व निर्णायक आहे. ते केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता नव्हते तर स्वराज्याची संकल्पना प्रथम प्रत्यक्ष कृतीत उतरविणारे द्रष्टे होते. शिवाजी महाराजांच्या घडणीत जिजाऊ साहेबांचे संस्कार जितके महत्त्वाचे होते तितकेच शहाजीराजांच्या जीवनातील संघर्ष, राजकीय अनुभव, युद्धकौशल्य आणि स्वातंत्र्याची तीव्र आकांक्षा महत्त्वाची होती.
शहाजीराजांचा जन्म इ.स. १८ मार्च १५९४ रोजी वेरूळ येथे मालोजीराजे भोसले व उमाबाई यांच्या पोटी झाला. भोसले वंशाची मुळे राजस्थानातील चित्तोडगडच्या पराक्रमी परंपरेशी जोडलेली आहेत. बालपणापासूनच शहाजीराजांना घोडेस्वारी, शस्त्रविद्या, युद्धकौशल्य आणि राजकारणाचे शिक्षण मिळाले. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये त्यांचा विवाह झाला. या विवाहामुळे मराठा सरदारांच्या राजकारणात शहाजीराजांचे स्थान अधिक दृढ झाले.
शहाजीराजांचे पिता मालोजीराजे भोसले इ.स. १५९९ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीत दाखल झाले. पुढे शहाजीराजेही निजामशाहीत एक पराक्रमी सरदार म्हणून उदयास आले. इ.स. १६२४ मध्ये झालेल्या भातवडीच्या युद्धात त्यांनी केवळ २० हजार सैन्याच्या जोरावर मुघल व आदिलशाहीच्या प्रचंड संयुक्त सैन्याचा पराभव केला. मेखरी नदीजवळील छावण्यांवर केलेल्या रणनीतीपूर्ण हल्ल्यामुळे शत्रुसैन्याची वाताहत झाली आणि शहाजीराजांचे नाव दख्खनभर दुमदुमले. मात्र याच युद्धात त्यांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले.
निजामशाहीचा ऱ्हास सुरू झाल्यावर शहाजीराजांनी अहमदनगर जिल्ह्यातील पेमगिरी ( भीमगड ) किल्ल्यावर निजामशाहीच्या वंशातील बाल वारस मुर्तझाला गादीवर बसवून स्वतंत्र कारभार सुरू केला. जवळजवळ तीन वर्षे त्यांनी हा स्वायत्त राज्यकारभार चालविला परंतू हा प्रयत्न अपयशी ठरला. पुढे मुर्तझाच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या शब्दासाठी शहाजीराजांनी मुघल बादशहा शहाजहानशी तह करून आदिलशाहीत प्रवेश केला.
इ.स. १६३६ नंतर शहाजीराजे आदिलशाहीच्या सेवेत गेले आणि त्यांना कर्नाटकातील बंगळूरची जहागीर देण्यात आली. बंगळूर, शिरे, कोलार, अर्काट, जिंजी, हुस्कोट, आर्णी अशा विस्तीर्ण प्रदेशात त्यांनी जवळजवळ स्वतंत्र राजाप्रमाणे प्रशासन चालवले. दक्षिणेतील मोहिमांमध्ये त्यांनी पराभूत राजांना मांडलिक म्हणून ठेवले ज्यामुळे आदिलशाहीचा विस्तारही झाला आणि स्थैर्यही निर्माण झाले.
शहाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अनुकूल राजकीय परिस्थिती निर्माण केली. योग्य वेळ साधून त्यांनी शिवाजी महाराजांना पुणे जहागिरीत स्वतंत्र कारभारासाठी पाठवले आणि अनुभवी मुत्सद्दी, सरदार त्यांच्या हाती दिले. स्वराज्य उभारणीमागे शहाजीराजांचा अप्रत्यक्ष पण अत्यंत महत्त्वाचा हात होता. शिवाजी महाराजांच्या वाढत्या कारवायांमुळे संशयग्रस्त झालेल्या आदिलशाहीने २५ जुलै इ.स. १६४८ रोजी शहाजीराजांना जिंजीजवळ दग्याने पकडून विजापूर दरबारात साखळदंडात हजर केले. या प्रसंगी शिवाजी महाराजांनी विलक्षण मुत्सद्देगिरी दाखवत मुघल बादशहा शहाजहानकडे पत्र पाठवले आणि शहाजीराजांची सुटका करून घेतली. इ.स. १६४९ रोजी शहाजीराजांची सन्मानपूर्वक मुक्तता झाली.
इ.स. १६६१-६२ दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले आणि शिवाजी महाराज व जिजाऊ साहेबांसमवेत काही काळ घालवला. आपल्या आयुष्यभर जोपासलेल्या स्वराज्याच्या संकल्पनेचे विशाल रूप पाहून ते समाधान पावले. २३ जानेवारी इ.स. १६६४ रोजी कर्नाटकातील होदेगिरी जंगलात शिकारीदरम्यान घोड्यावरून पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांची समाधी शिमोग्याजवळ होदेगिरी येथे आहे. शहाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जहागिरीचा वारसा धाकटा पुत्र व्यंकोजी यांच्याकडे गेला, ज्यांनी पुढे तंजावरचे मराठा राज्य स्थापन केले. शहाजीराजांचे स्वतंत्र राज्य उभारण्याचे स्वप्न प्रत्यक्षात शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात आणि व्यंकोजीने तंजावरात साकार केले.
शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धकौशल्य, मुत्सद्देगिरी आणि प्रशासन यांचा संगम असलेले व्यक्तिमत्त्व होते. स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले यांना विनम्र अभिवादन 🙏🚩
संदर्भ :-
शककर्ते शिवराय, विजयराव देशमुख
महाबली शहाजीराजे भोसले, गुरुप्रसाद कानिटकर

No comments:

Post a Comment

इंग्रजांच्या मदतीला पोटाल्याचा डोंगर धावून आला.

  इंग्रजांच्या मदतीला पोटाल्याचा डोंगर धावून आला. इतिहास एका रात्रीत घडत नसतो. जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेले परिश्रपूर्वक काम आणि चत...