विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 4 February 2026

उंबरखिंडीची लढाई :-

 




उंबरखिंडीची लढाई :-

फक्त मूठभर मावळ्यांनी ३०००० मुघल सैन्याची अक्षरशः धूळधाण केली.
शिवाजी राजे व मुघल सरदार कारतलब खान ह्यांच्यात २ फेब्रुवारी १६६१ रोजी ही लढाई झाली. उत्तर कोकण काबिज करण्यासाठी निघालेल्या मुघल सैन्याला शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने उंबरखिंडच्या दरीत गनिमी कावा पद्धतीने हल्ला करुन मुघल सैन्याचा पूर्ण पराभव केला.
२ फेब्रुवारी इ.स.१६६१ ला कारतलब खानाच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्य पुण्याहून निघून लोहगडाच्या बाजूने बोर घाटाकडे न जाता घाटमाथ्यावरुन उंबरखिंडीच्या दिशेस उतरु लागले. नळीसारख्या बारिक वाटेने मुघल सैन्य सह्याद्री डोंगर उतरत होते. घाट उतरुन मुघल सैन्य पुढे उंबरखिंडीत आले. उंबरखिंडच्या घनदाट अरण्यात लपून बसलेल्या शिवाजी राजांच्या सैन्याने मुघलांवर बाणांच्या वर्षावाने व तोफांच्या गोळ्यांनी हल्ला सुरू केला.
मुघल सरदार मित्रसेन व अमरसिंह यांनीही मराठा सैन्याचा बाणांचा हल्ला करुन प्रतिकार करण्यास सुरुवात केला. जंगलात व डोंगरावरुन गनिमी कावा पद्धतीने युद्ध करणार्या मराठा सैन्याला घाबरुन मुघल सैनिक मार्ग मिळेल तेथे पळत होते. पण सर्व मार्ग शिवाजी राजांच्या सैन्याने अडवून धरले होते. मुघल सैन्याचे मराठा सैन्याकडून प्रचंड हाल होत असताना रायबाघण यांच्या सल्लावरुन कारतलब खानाने तह करण्यासाठी शिवाजी राजांकडे दूत पाठवला.
पाठीवर बाणांचे भाते , एका हातात धनुष्य व दुसर्या हातात भाला , कमरेला तलवार , मस्तकावर शिरस्त्राण, शरीरावर चिलखत व ढाल ह्या युद्धसज्ज वेशात शिवाजी राजे घोड्यावर बसलेले होते.
कारतलब खानाचा दूत शिवाजीराजांकडे आला व "कारतलब खान पूर्ण शरणागती पत्करतो आहे व ह्या प्रदेशातून बाहेर पडण्यासाठी परवानगी मागत आहे." हा संदेश दुताने शिवाजी राजांना दिला. शिवाजी राजांनी विनंती मान्य करुन , कारतलब खानाला मुघल सैन्यासह निघून जाण्यास सांगितले. हा संदेश दूताने कारतलब खानाकडे पोहोचवला. तेव्हा कारतलब खान, मित्रसेन व इतर मुघल सरदारांनी शिवाजी राजांना खंडणी पाठवली. मुघलांकडून महाराजांना मोठ्या प्रमाणात घोडे, हत्यारे, दारुगोळा खंडणी स्वरूपात मिळाला. उंबरखिंडीच्या वेगवेगळ्या भागात लढत असलेल्या मराठा सैन्याला युद्धबंदीचा संदेश देण्यात आला व मुघल सैन्याला आल्या वाटेने परत पाठवण्यात आले.
युद्धात हरलेल्या मुघलांनी परत हल्ला केला तर त्यांचा बंदोबस्त करता यावा म्हणून शिवाजी राजांनी सेनापती नेताजी पालकर यांना उंबरखिंडच्या परिसरात म्हणजेच उत्तर कोकणात ठेवले व शिवाजी राजे स्वतः दाभोळ, शृंगारपुर च्या दिशेस दक्षिण कोकणच्या मोहिमेवर गेले.
खोपोली पाली रोडवर उंबर गावापासून पुढे उंबरखिंडीचा फाटा लागतो, या फाट्यापासून गाडीने ४ किमी आत गेल्यावर समरभूमी उंबरखिंड स्मारक आहे. याच ठिकाणी लोणावळा येथील काही संघटनांनी एकत्र येऊन उंबरखिंड युद्ध विजयस्मारक उभारले. या विजयस्तंभेची उंची १२.५० मीटर उंचीचे असून, स्तंभाच्या समोरील बाजूस शिवाजी महाराजांचे शस्त्रसज्ज वेशातील शिल्प आहे. मागील बाजूस उद्घाटनाची कोनशिला असून , डावीकडे आज्ञापत्रातील वृक्षा विषयीची माहिती व उजवीकडील बाजूस उंबरखिंडच्या लढाईचा थोडक्यात इतिहास कोरलेला आहे. दगडी स्तंभाच्या वर ढाल, तलवार, भाला, धनुष्य, ध्वजस्तंभ ह्याच्या मोठ्या प्रतिकृती करुन ठेवल्या आहेत.
(१६ मे २०२० रोजी सकाळ वृत्तपत्राच्या साप्ताहिक पुरवणीत प्रकाशित झालेला गुगल वारी :- उंबरखिंड लेख)
कसे जायचे :- पुणे - रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर खालापूर तालुक्यात खोपोली-पाली रस्त्यावर निसर्गाच्या कुशीत, डोंगरराशीत व नदीकाठी चावणी व उंबर गावाजवळ 'उंबरखिंड' आहे.
कुरवंडे घाटातून अंदाजे दोन मैलांवर चावनी नावाचे गाव आहे. इथून पुढचा मार्ग अत्यंत उताराचा आणि अगदी चिंचोळा. चावनीपुढे आल्यावर नदीच्या वळणापाशी चढाव चढून अर्धा-पाऊण मैलावर उंबरे गाव आहे. चावनी ते उंबरे गावामध्ये असलेली मैलभर लांबीची दरी खिंडीसारखी आहे तीच उंबरखिंड. ( हा मार्ग ट्रेकिंगसाठीचा आहे, वाहने जात नाहीत)
धन्यवाद !
🚩🚩🙏🙏🚩🚩

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...