सेनापती आपल्या शस्त्रसज्ज सैन्यानिशी हर हर महादेवऽऽ, छत्रपती शिवाजी महाराज की जयऽऽच्या गर्जनेत मोहिमेवर निघाले.
शेख निजाम अत्यंत क्रूर व कुशल लढवय्या होता. मुलूखगिरीवर असताना अत्यंत सावधगिरीने, हुशारीने वागायचा. त्याचे हेरजाळे लांबवर पसरलेले असायचे. त्यामुळे त्याला शत्रूच्या बातम्या आधीच मिळायच्या. सेनापती संताजींच्या फौजेची खबर लागतच तो त्यांच्यावर चालून आला. घनघोर युद्ध झाले. नारो पहिल्यांदाच युद्धात उतरला आहे, असे वाटतच नव्हते. त्याची तलवार सपासप चालत होती.
संताजींची नजर शेख निजामला शोधत होती. त्यांनी शत्रूची फळी तोडून सरळ आत घुसले. त्या बरोबर मोगल सैन्याने संताजींना घेरलेले पाहून नारो शत्रूंना भोसकू लागला. संताजीची तलवार विजेच्या गतीने चालत होती. संताजी, नारोपुढे मोगल सैन्याचा निभाव लागत नाहीसे पाहून शेख निजाम व त्याचा मुलगा खान-ए-आलम दोघेही एकदम चालून आले. संताजी व शेख निजामच्या तलवारी भिडल्या. तोच संताजी ओरडून म्हणाले, "नारो, हा बघ निजाम..."
त्या आवाजाने निजामाचे लक्ष किंचित विचलित झाले. ती संधी साधून संताजीने त्याच्या बगलेत वार केला. ते पाहून त्याचा मुलगा खान-ए- आलम चवताळून यायला लागताच नारोने त्याला मध्येच अडवले. दोघात घनघोर युद्ध जुंपले. निजाम बापलेक जबरदस्त जायबंदी झाले. दोघांनीही कसाबसा पळ काढला व दृष्टीआड झाले. निजाम शेखने माघार घेतल्यावर महंमद तारीखखान मोठ्या फौजेनिशी चालून आला. तोही प्राणांतिक जखमांनी घायाळ झाला. संताजींनी पन्हाळ्यावरच्या पायथ्याशी शेख निजाम व तारीखखानची दुर्दशा केली. नामोहरम झालेल्या मोगली फौजेने पन्हाळ्याच्या परिसरातून पळ काढला.
शेख निजाम व तारीखखानच्या पराभवाची वार्ता औरंगजेबाच्या कानी गेली. त्याच बरोबर राजाराम महाराज कृष्णा नदीकडे गेल्याचे कळल्यावर बादशहा अत्यंत संतप्त झाला. मराठ्यांविरुद्ध चहुकडून उठवलेली मोहीम ढासळत असल्याचे पाहून त्याने सरदारांना धारेवर धरले. त्याने अतिशय कडक शब्दात लिहिलेले खलीते सर्वत्र ताबडतोब रवाना केले.
संताजीने निजामाचे हत्ती, घोडे, शस्त्र हस्तगत केले आणि सतत हल्ले चढवून मोगलांना कोल्हापूर प्रांतातच गुंतवून ठेवले. त्यामुळे राजाराम महाराज कर्नाटकला विनासायास जाऊ शकले.
धूर्त औरंगजेबने राजाराम महाराजांच्या पाठलागावर काही सरदार पाठवले आणि कर्नाटकातील महत्त्वाच्या ठिकाणी निकडीचे हुकूम जारी केले....राजाराम सापडेल तिथे पकडावे..अशा फर्मानामुळे महाराजाचा पुढचा प्रवास बिकट झाला. कित्येकदा जीवावरचे प्रसंग गुदरले. मोगलांच्या जलद हालचालीमुळे राजाराम महाराज तुंगभद्रा नदी पार करताना कोंडीत सापडले. परंतु बहिर्जी, मालोजी घोरपडे, रूपाची भोसले, जगताप या शिलेदारांनी मोगलांशी कडवी झुंज दिली. त्याचवेळी बादशहाने अब्दुल्ला खान वर्हाला महाराजांना कैद करण्याची आज्ञा केली.
अब्दुल खानने आपला मोठा मुलगा हसन अलीलाही बरोबर घेतले. तो तीन रात्र तीन दिवस दौड करून सुभानगड किल्ल्याजवळ पोहोचला.
सुभानगड आणि नोरा हे दोन किल्ले तुंगभद्रा नदीच्या काठावर आहेत. नदीच्या पात्रात एक छोटे बेट आहे. तिथे महाराज व साथीदार थांबले होते. रात्रीच्या वेळी अब्दुल खानने त्यांच्यावर हल्ला चढवला. बरेचसे मराठे कापले गेले. एकोजी, मालोजी घोरपडे वगैरे सरदार कैद झाले. या लढाईच्या धुम्मचक्रीचा फायदा घेऊन राजाराम महाराजांनी आपली वस्रे, शस्र, पागोटे टाकून वेश बदलून, बहिर्जी घोरपड्यांच्या पाठगुळीस बसून कुठे निघून गेले कोणाला पत्ताही लागला नाही.
तुंगभद्रा ओलांडून राजाराम महाराज बिद्नुरची राणी चन्नमाच्या आश्रयाला गेले. मोगल सरदार रणमस्तक खानला कळताच राजारामांना मोगलांच्या स्वाधीन करण्याची मागणी केली. राणीने उत्तर पाठवले, राजाराम महाराज बिदनूरहून केव्हाच दक्षिणेत निघून गेले. शिवाजी महाराजांनी तिच्यावर एकेकाळी केलेल्या उपकाराची जाण ठेवून, अशा आणीबाणीच्या वेळेस तिने राजाराम महाराजांना मदत, सहकार्य केले आणि जिंजीपर्यंत सुखरूप पोहोचण्यास सहाय्य केले. अनेक संकटे पार करून राजाराम महाराज जिजींस पोहचले. याचे श्रेय प्रल्हाद निराजी, बहिर्जी घोरपडे, खंडो बल्लाळ, रूपाजी भोसले इत्यादी एकनिष्ठ शिलेदारांचे होते.
इकडे सेनापती संताजी घोरपडेंनी मोगली सैन्यांच्या हालचालीवर पाळत ठेवली होती. त्यांना हेराकडून खबर मिळाली की, राणी चन्नमाने राजाराम महाराजांना पळून जाण्यास मदत केली. त्यामुळे औरंगजेबने जान निसारखान व मतलब खान यांना राणीच्या प्रदेशावर हल्ला करण्यास पाठवले. कळताच संताजी, नारोने अफाट फौज घेऊन आपला मोर्चा बिदनूरकडे वळवला. थंडीचे दिवस असल्यामुळे शेती धान्याने डवरली होती. त्यांनी सैन्यांना सख्त ताकीद दिली की, कोणाकडूनही शेतमालाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख
नमोस्तुते!
No comments:
Post a Comment