विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : भाग - १६

 संताजी घोरपडे : भाग - १६

संताजी म्हणाले, "प्रजा आपली आहे. तिच्या जान मालाचे रक्षण केले तर निश्चितच प्रजा आपल्या मागे खंबीरपणे उभे राहते."

नारो म्हणाला, "कर्नाटकात मांडलीक राजांचा भरणा अधिक आहे. शिवाय जमीनदार, जहागीरदारही आहेत.'

संताजी म्हणाले, "पण ते आपल्या मदतीला कसे येणार?"

नारो म्हणाला, "निजामासारख्या सरदाराला सेनापती संताजी घोरपडेंनी धुळ चारली आहे. त्यात हे मांडलिक राजे मदती अभावी आणि स्वतःमध्ये लढण्याची कुवत नसल्याने, मांडलीकत्व पत्करलेले राजे. यांना जर आपण मदतीचा हात दिला तर, ते तात्काळ तहाला तयार होतील. त्यांना संरक्षणाची हमी दिली तर ते सर्वजण आपल्या फौजेनीशी आपल्या गोटात येतील. शिवाय त्यांच्याकडून इथल्या परिसराची माहिती मिळेल."

सेनापतींना नारोचा सल्ला पटला. म्हणाले, "राणी चन्नमाला खलीता धाडतो. त्यात उल्लेख करतो की, आपणास तह मान्य असेल तर आपल्या फौजा तुंगभद्रा नदीकाठी आमच्या तळावर पाठवून द्याव्यात."

सेनापती संताजीचा खलिता मिळाल्याने राणीला अत्यंत आनंद झाला. योग्य वेळी संताजी आपल्या मदतीला आल्यामुळे, त्यांच्या उपकारास स्मरुन तिने अनेक तुकड्या मोगलांविरुद्ध लढण्यास संताजीकडे पाठवल्या. त्याचवेळी कर्नाटकातील मोगलांच्या मांडलिक राजांनी संताजींची गुप्तपणे मदत करण्याचे ठरविले. मराठ्यांना सहकार्य केले तर आपला फायदा नक्कीच होईल आणि समजा मोगलांची सरशी होते असे दिसले तर, नेमून दिलेली खंडणी भरून हात वर करता येईल.

जान निसारखान व तहरुबखान सेनापती संताजीवर चालून गेले. दोन्ही पक्षात घनघोर लढाई सुरू झाली. शेवटी मोगलांचा पराभव झाला. मोठ्या कष्टाने अत्यंत जखमी अवस्थेत जान निसार खान जिवानीशी निसटला. तहरुब खान जखमी होऊन रणांगणी पडला. मराठ्यांना भरपूर शस्त्रास्त्रे व लूट मिळाली. मोगलांचे कित्येक सैनिक कैद केले. काही जीव वाचवून पळाले.

बादशहाला लढाईच्या पराभवाची वृत्त कळताच तो फार कष्टी झाला. राणी चन्नम्मा देवीने स्पष्ट कळवले की, आम्ही राजारामांना आमच्या राज्यात आश्रय दिला नाही. तुमचे सरदार सेनापती संताजी कडून झालेला पराभव लपवण्यासाठी आमच्यावर खोटा आळ घेत आहेत. तरी बादशहाने आपले पाठवलेले सैन्य परत बोलावून घ्यावे. शेवटी कित्तूरच्या राणीकडून आठ लाख रुपये आणि वार्षिक नजराणा म्हणून २५ हजार मान्य करून प्रकरण मिटवले.

दुखावलेला बादशहा स्वैरभैर झाला आणि सर्वत्र मोगलाई सुरू झाली. पण मराठ्यांचे सुदैव की, अशा कठीण प्रसंगी संताजी घोरपडेंसारखा शूर सेनानी मिळाला. मोगली सैन्यावर हल्ला चढवताना त्यांनी इतके शौर्य आणि क्रौर्य दाखवले की, खुद्द बादशहा औरंगजेब चिंताग्रस्त झाला. मोगलांचा जबरदस्त पराभव करून संताजींनी औरंगजेबला हादरा तर दिलाच, त्याचबरोबर मराठीशाहीला नवचैतन्यही दिले.

रामचंद्रपंत अमात्यांनी संताजींची तोंड भरून स्तुती केली. मराठ्यांचा राजा मारला गेला, त्याच्या जागी असलेला दुसरा राजा परंगदा झाला, चहुबाजूने स्वराज्यावर शत्रूचे आक्रमण झाले. गडकोट शत्रूंच्या ताब्यात गेले. फौज मोडली. राज्यातील वतनदार मंडळी शत्रूला शरण गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मेहनतीने, मोठ्या कष्टाने उभे केलेले स्वराज्य नष्ट होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. अशा बिकट परिस्थितीत सेनापती संताजींनी राज्य वाचवण्यासाठी महान कामगिरी केली. छत्रपतींच्या गादीशी एकनिष्ठ राहून मोगलांना नेस्तनाबूत करण्याचा संताजीने सपाटा सुरू केला. त्यामुळे औरंगजेबावर दहशत बसली.

डिवचला गेलेल्या बादशहाने चारही बाजूने मराठ्यांची कोंडी करण्याकरता सर्व महाराष्ट्रभर फौजा पसरवल्या. त्यामुळे मराठ्यांना मोगली सैन्याशी लढा देणे जिकरीचे झाले. परंतु, त्याचवेळी सेनापती संताजी घोरपडेंनीनी कर्नाटकात मोगली सैन्याची पुरती वाताहत केली. बादशहाने साठ हजार सैन्य तिकडे रवाना केले. जिंजी ते महाराष्ट्र या पाचशे मैलात मोगली फौजा विखुरल्या. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला जागोजागी कित्येक ठाणे उभारावी लागली. हिंदवी स्वराज्य त्याच्या डोळ्यात खूपत होते. दोन्ही ठिकाणी नियंत्रण राहावे यासाठी त्याने तुळापूरची आपली छावणी हलवून विजापूर भागात गलगली येथे उभारली.

झुल्फिकारखानने जिंजीची मोहीम हाती घेण्याची बादशहाला इजाजत मागीतल्यावर, बादशहाने इजाजत दिली. पण एक लक्षात ठेवा, मुकाबला संताजी आणि त्याच्या कडव्या फौजांशी आहे. संताजी खतरनाक असून अकस्मात हल्ला चढवतो. शिपाईगिरीची शर्थ करतो आणि बघता बघता पसार होतो. संताजी व त्याची फौज खाण्या पिण्यात वेळ घालवत नाही. ते धावत्या घोड्यावरच चणे, फुटाणे, भाकर कांदा खाऊन धावतात. ते ऊन, पाऊस, वारा थंडी, अंधार कशाचीच पर्वा करत नाहीत. एका मुलखात मराठी आले म्हणून फौज पाठवावी तर, लगेच दुसरीकडे उपटतात आणि मुलुख मारून ठाणे कब्जात घेतात. संताजी खरोखरच आदमी नाही भूतखाना आहे.

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

No comments:

Post a Comment

रास्ते घराण्यातील शिक्का 🚩🚩🚩

  रास्ते घराण्यातील शिक्का सदर शिक्का मोर्तब याचे महत्व त्या व्यक्तीच्या इतिहासातील कामगिरीवर लष्करी व मूलखी कारभारातील योगदानावर आधारलेला अ...