विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : भाग - १२

 संताजी घोरपडे : भाग - १२

महाराणी म्हणाल्या, "महाराज, आता काथ्याकूट करण्यात अर्थ नाही. पंतांचा शब्द गेलाय. प्राप्त परिस्थितीत तो पाळणे आपल्याला भाग आहे."

"तसं नाही महाराणी... "

"तसंच आहे. पुढचा उपाय खबरदारीने केला पाहिजे. संताजी धनाजीची जोडी अभंग राहण्यानेच आलमगीरवर धाक राहील."

महाराज म्हणाले, "ताराऊ, धनाजीरावांची समजूत आम्ही घालू... " तोच खंडो बल्लाळ प्रवेशले. महाराज महाराणींना मुजरा करून म्हणाले, "संताजीराव आले आहेत. वर्दी द्यायला आलोय..."

तेवढ्यात धनाजी जाधव आल्याचा व ते गडाखाली माचीवर मुक्कामाला असल्याचा निरोप आला. "त्यांना ताबडतोब गडावर बोलवावे.'

ताराराणी म्हणाल्या, 'पाहिलत पंत?"

रामचंद्रपंत खजील होत म्हणाले, "कधी नव्हे ती माझ्याकडून गफलत झाली. पण केवळ दौलतीच्या हितासाठीच."

महाराज म्हणाले, ''ताराऊ, धनाजींचाही सत्कार, मानसन्मान संतांजी सारखाच करावा.''

"जरूर महाराज. महाराज, त्यांचे करता "सरलष्कर" हे नवीन पद निर्माण करावे."

महाराज म्हणाले, "त्यांना आम्ही "जयसिंगराव" हा किताब बहाल करावा म्हणतो."

"चालेल महाराज. एवढ्यात संताजी येतीलच, त्यांचा सन्मान करतानाच धनाजीराव सुद्धा त्यांच्याच तोला मोलाचे सेनापती आहेत आणि संताजींनी त्यांची सदैव जाणीव ठेवावी हे त्यांना समजावून सांगावे."

खंडो बल्लाळ चाचरत म्हणाले, 'महाराज, आपल्याला आणखी एक खबर द्यायची आहे."

'बोला खंडेराव... महाराज, कैलासवासी संभाजी महाराजांना गिरफ्तार करून घेऊन जाणारा शेख निजाम, मुकर्रबखान आपल्याला पकडण्यासाठी प्रचंड फौजांनिशी पन्हाळावर चालून येत आहे."

महाराज, ताराराणी आणि मुत्सद्यात चर्चा होऊन, निवडक मुत्सद्दी आणि सैन्य घेऊन महाराजांनी एकट्याने जिंजीकडे निघावं आणि महाराणींनी कबिल्यासह विशालगडी मुक्काम करावा असे ठरले. महाराजांनी तिथेच रामचंद्र पंतांना "हुकूमतपन्हा" हा किताब देऊन, आपले सर्वाधिकार दिले. महाराजांच्या माघारी त्यांचा शब्द हुकूम मानला जाईल. तो फिरवण्याचा अधिकार खुद्द छत्रपतीनाही असणार नाही.

रामचंद्रपंत म्हणाले, "महाराज आपण माझ्यावर विश्वास टाकला याबद्दल धन्यता वाटते. पण आपल्या लोकांची मने जाणता, मी असे सुचवू इच्छितो की, राजमंडळाचे नेतृत्व खुद्द महाराणींनी करावे. त्यांच्या मदतीसाठी आम्ही सर्व सेनानी सदैव सिद्ध आहोत. महाराणीजी वयाने लहान असल्या तरी, त्यांचे विचार पोक्त आहेत. त्या जे ठरवतील त्या धोरणाला सैन्यच नव्हे तर, अवघी प्रजा मान देईल."

नंतर महाराजांबरोबर जाणाऱ्यांची नावे जाहीर झाली..... प्रल्हाद निराजी, कृष्णाजी अनंत, निळकंठ कृष्णा, बहिरोपंत, खंडेराव दाभाडे आणि महाराणींनी सुचवल्यानुसार खंडो बल्लाळ यांना पाठवायचे ठरले.

तेवढ्यात संताजी घोरपडे आपले दोन्ही बंधू बहिर्जी आणि मालोजी आणि विठोजी चव्हाणसह राजमहालात प्रवेशले. अदबीने पुढे येऊन संताजींनी महाराणी, महाराजांना वाकून मुजरा केला. त्या पाठोपाठ तिघांनीही त्यांचे अनुकरण केले. संताजीरावांनी शेल्यात बांधून आणलेले बादशहाच्या डेऱ्याचे सोन्याचे कळस व शिक्का कट्यार महाराजांच्या स्वाधीन केले. त्या वस्तू महाराणीकडे दिल्या. महाराज संताजींना अलिंगत देत म्हणाले, "धन्य आहे तुमची संताजी!"

संताजी म्हणाले, ''माझे एवढ्याने समाधान झाले नाही. मला त्या औरंगजेबावर सूड घ्यायचा होता. पण तो निसटला. घोरपड्यांच्या कुळाने छत्रपतींच्या गादीशी निष्ठा वाहिली आहे. स्वराज्यासाठी आम्ही प्राणपणाने लढू. मी त्याचा शैयेवर शप्पथ वाहिली की, औरंगजेबाचा शिरच्छेद करून त्याचे मस्तक भाल्याच्या टोकावरून पूर्ण महाराष्ट्रभर फिरवायचे.''

महाराजांचा उर अभिमानाने भरून आला. म्हणाले, "संताजीराव, आम्हाला तुमच्या पराक्रमाची खात्री आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला सरसेनापती पद देण्यासाठी हा दरबार भरवला आहे."

सरसेनापती शब्द कानी पडताच संताजीराव अंतर्बाह्य आनंदीत झाले. "महाराज आपण मोठ्या विश्वासाने ही जोखीम टाकता आहात त्याचं मी तेवढ्याच निष्ठेने पालन करीन असे वचन देतो.'

ताराराणी म्हणाल्या, "संताजीराव, तुम्ही मोगलांच्या पोटात शिरून त्यांच काळीज घेऊन आलात. संभाजीराव, भाऊजींच्या वधाने मराठेशाही संपली नाही तर उलट सुडाच्या भावनेने पेटून बदला घेण्यास कटीबद्ध आहे हे औरंगजेबाला कळून चुकले असेल."

राजाराम महाराज म्हणाले, "रामचंद्रपंत, तुळापूरची मोहीम फत्ते करून आलेल्या वीरांना किताब द्यायचे जाहीर करा."

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

No comments:

Post a Comment

रास्ते घराण्यातील शिक्का 🚩🚩🚩

  रास्ते घराण्यातील शिक्का सदर शिक्का मोर्तब याचे महत्व त्या व्यक्तीच्या इतिहासातील कामगिरीवर लष्करी व मूलखी कारभारातील योगदानावर आधारलेला अ...