राजाराम महाराजांच्या निर्देशानुसार रामचंद्रपंत उठून उभे राहत म्हणाले, "मोगलांना वचक बसवल्याबद्दल आणि स्वराज्याची मोहीम अखंड ठेवल्याबद्दल छत्रपती महाराजांच्या वतीने, संताजी घोरपडेंना "सरसेनापतीपद", बहिर्जी घोरपडेंना "हिंदुराव", मालोजी घोरपडेंना "अमीरूल उमराव" आणि विठोजी चव्हाण यांना "हिम्मतबहादुर" असे किताब बहाल करण्यात येत आहेत."
सर्व दरबाराने संताजीराव आणि त्यांच्या साथीदारांचे कौतुक केले. परशुरामांच्या इच्छेनुसार महाराजांनी संताजी घोरपडेंना "ममलकत मदार" हा किताबही जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर त्यांना मानाची वस्त्रे आणि तुरा देऊन सन्मान करण्यात आला. ताराबाईंनीही रत्नजडित मुठीची तलवार भेट दिली.
भारावलेले संताजीराव म्हणाले, 'थोरल्या महाराजांना शत्रूचा निःपात करण्यासाठी भवानी तलवार भवानी मातेने दिली होती. त्याच भवानी तलवारीच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. आणि आज तेच स्वराज्य संकटात असताना त्याच्या रक्षणार्थ महाराणींनी ही तलवार माझ्या हाती दिली. ही रत्नजडित तलवार सदैव तळपट ठेवण्यास जागरूक राहील."
छत्रपती राजाराम महाराजांनी दरबार समाप्त झाल्याची घोषणा केली. महाराणींच्या इशारानुसार खंडो बल्लाळ त्यांच्या खाजगी दालनात आले. त्या म्हणाल्या, "खंडोजीराव, तुम्हाला स्वामींबरोबर पाठवण्याचा आमचा खास उद्देश आहे. महाराज जिंजीला गेल्यावर, प्रल्हादपंत निराजींना प्रधानपद देणे स्वामींना भाग पडणार आहे. पण आम्हाला प्रल्हाद निराजीचा भरोसा नाही. हे स्वामींना भलत्याच भरीस पाडतील असं आम्हाला भय वाटते.'
"मातोश्री, आपण चिंत्ता करू नका. प्रल्हादपंतांच्या प्रत्येक हालचालीवर माझी सख्त नजर राहील."
"खंडोजीराव, त्याहीपेक्षा तुम्हाला एक अवघड व नाजूक कामगिरी पार पाडावी लागणार आहे."
"कोणती मातोश्री?"
ताराबाई गंभीर झाल्या. मन कठोर करून म्हणाल्या, "खंडोजीराव, स्वामी प्रकृतीनेच दुबळे नाही तर, मनानेही दुबळे आहेत. त्यांना अंमली पदार्थांच्या सेवनाबरोबर बायकांचाही शौक आहे. वास्तविक हा विषय बोलण्याचा नाही. आमच्या संगतीत आम्ही त्यांचा तोल जाऊ देत नव्हतो. म्हणून बभ्रा झाला नाही, की राजकारणावर परिणाम होऊ दिला नाही. पण जिंजीला ते मोकळेच असतील. तिथे ते मोकाट सुटण्याचे भय वाटते. म्हणून....."
"मातोश्री, मी त्यांना आवर घालण्याचा आटोकात प्रयत्न करेन."
संताजीरावांना सरसेनापद मिळून आठ दिवस झाले पण संताजी वडिलांच्या आठवणीने एवढे सन्मान मिळूनही दुःखी होते. उभी हयात त्यांचे वडील म्हाळोजीरावांनी शूर सेनानी म्हणून गाजवली. स्वराज्यासाठी त्यांनी विजापूरकरांची सरदारकी सोडली. आज आबा हयात असते तर, त्यांच्या तिन्ही पुत्रांना मिळालेले मानाचे किताब बघून त्यांना किती धन्यता वाटली असती. छत्रपतींच्या गादीशी निष्ठा ठेवण्याची सार्थक झालेले झाल्याने त्यांचा उर भरुन आला असता.
उदास मनःस्थितीत संताजी वाड्यावर आले. अजून मध्यांन्ह रात्र झाली नव्हती. टिपूर चांदण्यात पन्हाळगड न्हाऊन निघाला होता. आणि याच पन्हाळगडाकडे औरंगजेबाचे सरदार यायला निघण्याची खबर आहे. महाराज जिंजीला जायचे निश्चित झाले. त्याचे बरोबर त्यांचे दोन बंधू बहिर्जी आणि मालोजी जातील. स्वराज्याचा कारभार हुकूमतपन्हा रामचंद्र यांच्या शब्दावर चालणार, त्यासाठी त्यांना गरज आहे धनाजी, संताजी सारख्या वीर योध्यांची.
तुळापूरच्या छावणीवरील हल्ल्यानंतर, औरंगजेबने संताजीवर करडी नजर ठेवली. धनाजीरावांची साथ असली तरी आपणही गाफील राहून चालणार नाही. झोपेतही सावध राहायला हवंय. अशा प्रसंगी आपला कुटुंब कबीला पन्हाळगडावर ठेवणे धोक्याचे आहे हे जाणून वंशपरंपरेने आबांना मिळालेली जहागिरी कापशीत ठेवावे. अशाच विचारात किती तरी वेळ ते गडावर फिरत होते. बरीच रात्र झाल्याने वाड्यावर परतले.
सकाळी पत्नी द्वारकाबाईने उठवले तेव्हा सूर्य बराच वेळ वर आला होता. स्नान वगैरे आटपून बैठकीत आले तेव्हा बहिर्जी, मालोजी नारो गप्पा मारत होते. कशाच्या गप्पा चालल्या आहेत? धीर धरून नारो म्हणाला, "तुमच्याबरोबर मोहिमेवर यायची परवानगी हवी."
"खुशाल ये."
विठोजी म्हणाले, "जाधवरावांनी मला आपल्या तुकडीत सामील व्हायला सांगितले आहे. एक-दोन दिवसात धनाजी इथे येईल तेव्हा पुढची मसलत ठरवू. तूर्त आपला कुटुंब कबीला चित्रावती खोऱ्यात कापशीला हलवावा आणि नारो व त्याच्या आईला आपला बहिरेवाडीचा वाडा आहे तिथे, तिथे त्या सुरक्षित राहतील."
दरबाराची वेळ झाल्याने संताजी दरबारात पोहोचले तेव्हा दरबारात प्रल्हाद निराजी, रामचंद्र पंत, राजाराम महाराजांची खलबते सुरू होती. त्यांचा सल्ला होता की, मराठ्यांच्या ताब्यात फार थोडे किल्ले राहिले. ते किती काळ तग धरतील? औरंगाबादचे लक्षावधी सैन्य महाराष्ट्रभर संचार करीत आहे. त्यांच्या टापांखाली हिंदवी राज्य चिरडले जाऊ नये म्हणून इतरत्र पांगलेल्या शिलेदारांची जमवाजमव करावी.
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख
नमोस्तुते!
No comments:
Post a Comment