परशुराम पंत म्हणाले, "महाराणी, आपली चिंता रास्त आहे. पण संताजी घोरपडे प्रत्यक्ष बादशाही डेर्याचे सोन्याचे कळस काढून अद्भुत पराक्रम करून महाराजांच्या भेटीला येत असल्याने, त्यांच्या सन्मानार्थ दरबार भरवायचा तर...?"
ताराबाई नरमाईने म्हणाल्या, "पंत जीवाची बाजी लावून दौलतीची सेवा करणाऱ्या वीराचा सन्मान करताना खुद्द स्वामींच्या जीवालाच दगा फटका झाला तर? पुढची मसलत पक्की ठरेपर्यंत स्वामींचा मुक्काम येथे आहे ही खबर बाहेर पडू नये.... तेव्हा आलमगिराशी मांडलेले हे युद्ध संपेपर्यंत सगळ्या गडावरचे शाही रिवाज तात्काळ बंद होण्याच्या सूचना द्या." रामचंद्र पंत म्हणाले, "या क्षणापासून अमलांत आणले जाईल."
नंतर संताजीराव घोरपडेंचा सन्मान कसा करायचा याबाबत मसलत सुरू झाली. संताजींना मानाची वस्त्रे, शिरपेच, तुरा आणि महाराणीच्या हस्ते रत्नजडित तलवार दिली जाईल. परशुरामांनी सूचना मांडली की, संताजीरावांना "ममलकत मदार" हा किताब द्यावा. तसेच त्यांचे बंधू बहिर्जींना "हिंदुराव" आणि मालोजींना "अमिरूल उमराव" हे किताब महाराजांनी द्यावेत. शंकरजी म्हणाले, विठोजी चव्हाण यांना "हिंमत बहादूर" किताब द्यावा.
रामचंद्र पंत म्हणाले, काही लोकांचे म्हणणे आहे की, या प्रसंगी संताजीरावांना मिरजेची वतनदारी द्यावी. यावर परशुरामांनी सौम्य हरकत घेत म्हणाले, "थोरल्या महाराजांनी वतन देण्यास बंदी घातली होती. जुनी वतने काढू नये, पण नवीन वतन निर्माण करू नये. असा दंडक....."
ताराबाई म्हणाल्या, "पंत, त्यावेळीचा काळ वेगळा होता. त्या काळाच्या वीरांची दौलतीचं रक्षण करण्याची मनोधारणाही वेगळी होती. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू, मुरारबाजी यांची जातच वेगळी होती. तेवढा निर्लोभीपणा आता कुणात दिसतो का? त्यावेळी आलमगीर उत्तरेत होता. दक्षिणेच्या पातशाह्या जवळ जवळ संपल्या होत्या. आज आलमगीर प्रचंड सेनेसह आपल्या मुलखात ठाण मांडून बसला आहे. दोन्ही हातांनी आमच्याच मुलखांतील वतनांची खैरात वाटत वतनदारांना अंकित करून स्वराज्य गिळंकृत करायला निघालेला.... आपले निम्म्यापेक्षा जास्त वतनदार फुटून बादशहाला जाऊन मिळाले. त्यामुळे जुन्या धोरणात बदल करून वतनाच्या निष्ठेने तरी राजनिष्ठा जागृत होते का हेच पाहायचेय!"
रामचंद्र पंतांच्या चेहऱ्यावरची चलबिचल हेरून राजाराम महाराज म्हणाले, "पंत, काय मनात असेल ते स्पष्ट बोला."
पंत म्हणाले, "महाराज, संताजींना वतनापेक्षा वेगळी अपेक्षा आहे."
"काय अपेक्षा आहे?"
"महाराज, महाराणींचे पिताजी वाईच्या संग्रामात कामी आल्यापासून महादजीनंतर सरसेनापती पद आजवर रिकामं आहे. ते आपल्याला मिळावं अशी त्यांची तीव्र इच्छा आहे. त्यांचा पराक्रम, सैन्यावरचा धाक, शिस्त, दरारा पाहता हे पद त्यांना द्यावं असं मला वाटते."
महाराज म्हणाले, "पण पंत, हे सेनापतीपद धनाजी जाधव यांना देण्याचा संकल्प यापूर्वीच आम्ही जाहीर करून बसलो आहोत. संताजीहुन धनाजी वयाने व अनुभवाने मोठे आहेत."
प्रल्हाद निराजी म्हणाले, "फलटणच्या घनघोर लढाईत धनाजींनी सुद्धा फार मोठा पराक्रम केला आहे. पाच पाच लढाया लढून त्यांनी मोगलांचा पराभव केला आहे. शाहिस्तेखान व रणमस्तखानला सुद्धा खडे चारले. धनाजी सुद्धा भरपूर भेट घेऊन महाराजांच्या दर्शनासाठी इथे येत आहेत...."
रामचंद्रपंत आपला हेका रेटत म्हणाले, "महाराज, संताजींच्या आजच्या पराक्रमाला तोड नाही. त्यांनी आपल्या सैन्याला कडवी शिस्त आणि मोगल सैन्यात जबरदस्त धाक निर्माण केला आहे. त्यामुळे संताजी उजवे ठरतात."
ताराबाई म्हणाल्या, "पंत, सैन्याला कडवी शिस्त आणि दुश्मनाला धाक, एवढ्याच गोष्टी सरसेनापतीपदाला पुरेशा नाही. संताजी कडवे नाही तर कडक आहेत. तेही जरुरी पेक्षा जास्त. कडवेपणाबरोबर माया ममताही असावी लागते. संताजी संतापी, उग्र, उतावळे आहेत. आणि नको इतके अभिमानी आहेत.'
"पण महाराणीजी धनाजींना सरसेनापती केलं तर, संताजी दुखावला जाईल.... "
ताडकन उठून प्रल्हाद निराजी म्हणाले, "हे काय बोलणे झाले? संताजीरावांना सरसेनापतीपद दिले तर धनाजीराव दुखावणार नाही?"
पंत आपला मुद्दा कायम ठेवत म्हणाले, "महाराज, धनाजीराव सौम्य वृत्तीचे आहेत. आपण त्यांची समजूत घातली तर ते...."
"म्हणजे संताजीची समजूत पटणार नाही असेच ना पंत?" ताराबाई म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, "आपल्याला दोन्ही माणसं हवीत. तुर्त सेनापती पदाचा निर्णय लांबणीवर टाकावा."
महाराज म्हणाले, "ताराऊ, आपल्याला हा निर्णय लांबणीवर टाकता येणार नाही. येसूवहिनींनी सुचवल्यानुसार जिंजीला जायचं ठरवलं तर, प्रथम इथला बंदोबस्त पक्का करावा लागेल."
मध्येच रामचंद्र पंत म्हणाले, "म्हणूनच संताजींना हे पद देण्याचा माझा आग्रह आहे."
"पंत, स्पष्ट सांगा.. तुमचा संताजींना शब्द गेला आहे का?" रामचंद्रपंत थोडे घुटमळले.
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख
नमोस्तुते!
No comments:
Post a Comment