शिवाजी महाराजांनी युवराज संभाजींना मोगलांच्या तावडीतून सोडवून आणले. महाराजांनी म्हाळोजी घोरपडेंना पन्हागडाच्या तटनौबतीची बढती दिली व त्यांच्या अख्त्यारीत संभाजी राजांना ठेवले. म्हाळोजी घोरपडेना मुसलमान राजवटीचा चांगलाच अनुभव, बारकावे, युद्धनीती अवगत होती. त्याच बरोबर हिंदू धर्माच्या संरक्षणाच्या जबाबदारीचीही त्यांना जाणीव होती. महाराजांना हा विश्वास असल्यानेच संभाजींना त्यांच्या देखरेखीखाली ठेवले होते.
संभाजी राजेंबद्दल जनमानसात काहीसे अनिश्चित वातावरण निर्माण झाले होते. संभाजी राजांचा स्वभाव उदार, थोडा उतावीळ व तामसी होता. लहर लागली तर, कधी काय करतील याचा नेम नसल्यामुळे म्हाळोजी घोरपड्यांची त्यांच्यावर सक्त नजर होती. त्यांचे तिन्ही पुत्र फौजेत व स्वतः ते पन्हाळगडावर असल्यामुळे, भालवणीच्या त्यांच्या वाड्याकडे दुर्लक्ष झाले.
हंबीररावांबरोबर कराडकडे असलेल्या संताजीला बोलावणे पाठवले. संताजी आल्यावर, ते म्हणाले, "संताजी, कर्नाटकातून शत्रूचा उपद्रव होण्याची शक्यता आहे. महाराजांच्या आज्ञेनुसार मला इथून हलता येणार नाही. शिवाय तुम्ही तिघेही बंधू मोहिमेत असता. म्हणून भालवणीतील आपले कुटुंब गडावर आणायचा विचार आहे."
"बाबा, आपल्या आज्ञेप्रमाणे होईल." त्यांना तुकडीत सामील होण्याची घाई असल्यामुळे वडिलांचे चरण स्पर्श करून ते कर्हाडच्या दिशेने निघून गेले.
वायूवेगाने घोड्यावर स्वार असलेल्या संताजींच्या डोक्यात विचारही वेगाने सुरू होते. त्यांच्या नजरेसमोर भालवणीचा वाडा साकार झाला. त्यांच्या दोन्ही पत्नी सोयराबाई व द्वारकाबाई उभ्या राहिल्या. संताजी स्वतःशीच विचार करत होते, लग्नानंतर दोघींशी कधीच सवडीने हितगुज किंवा बोलणे करू शकलो नाही. क्षणिक पतीसुखाखेरीज त्यांच्या वाट्याला वियोगच जास्त आला.
एव्हाना घोड्याने वारणा नदी पार केली होती. या भागात शत्रूने नुकताच शिरकाव केला होता.
संताजी मनातील विचार बाजूला सारून सावध झाले. हातातील तलवार सरसावून कर्हाडकडे निघाले.
पन्हाळगडाच्या निसर्ग सानिध्यात घोरपडे कुटुंबीयांना भाळवणीच्या वाड्याचा विसर कधीच पडला होता. संताजींची द्वितीय पत्नी जरा पोक्त विचारांची होती. सोयराबाईचे तसे नव्हते. त्यांना गडावर रुळायला थोडा वेळ लागला. गडावर कुटुंब असल्यामुळे संताजींचे गडावर येणे जाणे वाढले. भालवणीच्या आठवणी पुसट झाल्या.
म्हाळोजी घोरपडेंच्या सानिध्यात संभाजीराजे बरेच काही शिकले. आपली स्वराज्याला गरज आहे, ही भावना त्यांच्या मनात दृढ झाली. आणि नेमके त्याचवेळी रायगडावर महाराजांचा काळ झाला. ही बातमी पन्हाळगडावर न पोहोचवण्याची काळजी महाराणी सोयराबाई व अण्णाजी पंतांनी व्यवस्थित घेतली होती. त्यांनी राजारामांना गादीवर बसवण्याचा बेत रचला. संभाजी राजेंपासून ह्या सर्व गोष्टी लपवल्या. शिवाजी महाराजांची उत्तरक्रिया सावजी भोसले, शिंगणापूरकर यांच्या करवी करण्यात आली.
त्यावेळी मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो बाहेर होते. कळल्याबरोबर रायगडावर दाखल झाले. प्रल्हाद निराजी, रामचंद्र नीलकंठ, मुख्य लेखनिक बाळाजी आवजी या सर्वांशी सल्लामसलत करून सोयराबाईने राजारामांना गादीवर बसवून रायगडाचा कडक बंदोबस्त केला. परंतु महाराजांचे निधनाची बातमी दीर्घकाळ गुप्त राहणे शक्यच नव्हते. संभाजी राजांना ही बातमी कळल्यावर त्यांचा क्रोध अनावर झाला व ते दुःखी झाले.
सोनाजी नाईकाने बातमी कळू नये म्हणून कडक बंदोबस्त ठेवला होता म्हणून संभाजीराजेंनी प्रथम त्याला ठार मारले. हिरोजी फर्जंद चिपळूणला पळून गेला. पन्हाळ्यावर असलेल्या किल्लेदार विठ्ठल त्रंबकला कैद केले व किल्ल्याचा बंदोबस्त संभाजीराजेंनी स्वतःकडे घेतला. यावेळी पन्हाळाचे तटनौबत म्हाळोजी घोरपडे व त्यांचे पुत्र संताजी, बहिर्जी,मालोजी आणि सरनौबत हंबीररावांनी संभाजींची बाजू योग्य असल्यास मुळे त्यांना साथ केली. या आणीबाणीच्या परिस्थितीत समस्त घोरपडे कुटुंबियाने संभाजीराजेंना दिलेले सहाय्य, सहकार्य केवळ निखालस होते.
म्हाळोजी घोरपडे, हंबीरराव मोहिते आणि संताजी घोरपडे यांचा संभाजीराजांना भक्कम पाठिंबा मिळाला. आतापर्यंत रायगडावर त्यांच्या विरोधात चाललेल्या कटाची माहिती झाली होती. पुढचा बेत ठरवण्यासाठी पन्हाळगडावर दरबार भरवला गेला. हंबीररावांसोबत संताजी दरबारात हजर होते. तिशीची उमर असलेले संताजी करारी मुद्रा, धारदार नजर बघताच समोरच्याच्या काळजात धडकी भरत होती. वीरश्री तर रोमारोमात साचलेली होती."संताजी" या त्यांच्या नावातच झंझावत होता.
दरबारात संभाजी राजेंचे आगमन झाल्यावर, सगळ्या दरबाराने उठून त्यांना मुजरे केले. राजे आसनस्थ झाले. संताजी राजेंना एकटक न्याहळत होते. विश्रामगडाच्या पायथ्याशी केलेली प्रतिज्ञा आठवली. शिवाजी महाराजांसमोर मुजऱ्याला जाऊ शकलो नाही याची खंत त्यांच्या मनी वाटली. त्यांनी आपल्या मनाची समजूत घातली आणि छत्रपतींच्या तक्ताशी शेवटपर्यंत इमानाने, निष्ठेने राहायचे म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीची बाजू घेऊन त्यांना सर्वतोपरी सहाय्य करायचे ठरवले.
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख
नमोस्तुते!
No comments:
Post a Comment