विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : भाग - ४

 संताजी घोरपडे : भाग - ४

पन्हाळगडावर भरलेल्या दरबाराचे कामकाज सुरुवात करण्याची विनंती हंबीररावांनी राजेंना केली. संभाजीराजेंनी गंभीरपणे सर्व दरबारावर नजर फिरवली. दरबारात महत्त्वाचे स्थान असलेले म्हाळोजी घोरपडे म्हणाले, "महाराज, झाल्या गोष्टीचा काथ्याकूट नको. आम्ही सर्वांनी स्वराज्यासाठी छत्रपतींच्या गादीशी निष्ठा वाहिली आहे. आपण फक्त आम्हाला आज्ञा करावी.''

राजे म्हणाले, "अण्णाजी पंत व मोरेपंत पिंगळे गडावर कुटील डाव खेळण्यास निघाले असल्याचे हेराने बातमी आणली आहे."

ताडकन उठून संताजी म्हणाले, "महाराज, आम्ही त्यांना कृष्णाच्या पलीकडेच पळवतो."

राजे म्हणाले, नाही... "त्या दोघांच्या पायात बेड्या पडायला हव्यात."

हंबीरराव म्हणाले, "आम्ही त्यांना अटक करून आपल्यासमोर हजर करतो."

दरबार बरखास्त झाला.

हंबीरराव संताजीला घेऊन अण्णाजी दत्तो व मोरोपंत पिंगळे यांना अटक करण्याच्या मोहिमेवर निघाले. ते दोघेही पन्हाळगडाकडेच निघाले होते. वाटेतच त्यांना संभाजीराजें बाबतची हकीगत कळल्यावर दोघांची गाळण उडाली. तेवढ्यात हंबीररावने दोघांना अटक करून पन्हाळगडावर आणले. राजेंच्या हुकूमानुसार कडक बंदोबस्तात ठेवले.

संभाजी राजेंनी हंबीररावांच्या व संताजींच्या मदतीने २०,००० वर फौज फाटा जमा केला. पन्हाळगडावर व्यवस्थीत जम बसवला. तटनौबत म्हाळोजी घोरपडेंवर सर्व जबाबदारी सोपवून, संभाजी राजे वीस हजार फौज घेऊन रायगडावर चालून गेले. त्यांना विशेष विरोध झाला नाही. संभाजी राजांनी रायगडाचा पक्का बंदोबस्त केला. ज्यांच्या घरावर चौक्या बसवल्या होत्या त्या उठवल्या. मोरोपंतांनाही बंधन मुक्त केले. यथावकाश राज्याभिषेक होऊन संभाजीराजांचे सिंहासनरोहण झाले. काही दिवसांनी वातावरण निवळले. हिरोजी फर्जद व अण्णाजी दत्तो यांना कैदेतून मुक्त करून त्यांना पूर्वीच्या जागी रुजू केले. या दरम्यान मोरोपंतांचे निधन झाले. त्यांचा पुत्र निळोपंतांची नेमणूक केली. पहिला क्रोधाचा भर ओसरला. कारभार सुरळीत सुरू झाला.

त्याचवेळी इकडे पन्हाळगडावर संताजी घोरपडेची प्रथम पत्नी सोयराबाईला पुत्ररत्न प्राप्त झाले. घोरपडे घराण्याच्या वंशवेलीवर हे गोंडस रुपडे बघून म्हाळोजी रावांना अत्यानंद झाला. नातवाच्या मुखदर्शनाने कृतकृत झाले.

बातमी संताजींना रायगडावर कळविण्यात आली. आपल्या प्रथम पुत्राच्या मुखदर्शनार्थ संताजी पन्हाळगडी आले. त्यांच्या दुसऱ्या पत्नी द्वारका बाईने त्यांचे स्वागत केले. नंतर ते सोयराबाईच्या दालनात गेले. ते नवजात बालक हाती घेतल्याबरोबर त्यांचा प्रेमाने उर भरून आला. विचारले, "बाळाचे नाव काय ठेवले?"

"मामाजींच्या इच्छे प्रमाणे "राणोजी" ठेवले."

संताजीने बाळासाठी आणलेल्या मोत्याचा कंठा व सोन्याचं कडं बाळाच्या अंगावर चढवण्यासाठी सोयराबाईकडे दिले. थोडा वेळ गप्पा गोष्टी, जेवण, वामकुक्षी झाल्यावर संताजी आबांच्या दर्शनासाठी निघाले. म्हाळोजींना संताजी येत असल्याची खबर आधीच मिळाली होती. संताजी येत असता त्यांना मुख्य दालनात एक नवखी स्त्री झाडलोट करताना दिसली. संताजीने म्हाळोजींच्या कक्षात जाऊन त्यांचा चरण स्पर्श केला. म्हाळोजींनी रायगडावरची माहिती विचारल्यावर, संताजी म्हणाले, "सर्व ठीक आहे. राजाराम महाराजांनी सगळी सूत्रे वडील बंधू संभाजी राजेच्या हाती सोपवली."

बोलता बोलता संताजींनी विचारले, "आबा, येताना एक नवी स्त्री दिसली. कोण ती?"

"एक निराधार विधवा स्त्री, पाच वर्षाच्या नारो नावाच्या मुलाला घेऊन पोट भरण्यासाठी देशावर आली आहे."

"आबा, पूर्ण चौकशी करून खात्री करून घेतली ना? हल्ली हेरांचं पेव फुटलय. स्वकीय आणि परकीय कोण लक्षात येत नाही. ही कोकणातील. वाडीकर महाराजांच्या विरोधात मोगलांशी संधान बांधून आहे. काळजी घ्या."

"संताजी, काळजी करू नकोस. मी तिची पूर्ण चौकशी करूनच आश्रय दिला. सध्या दोघे मायलेक आपल्या वाड्यावरच राहतात."

संध्याकाळची वेळ जेवण उरकल्यावर, संताजी त्या पाच वर्षाच्या नारोबा बरोबर खेळत होते. द्वारकाबाई दुधाचे भरलेले पात्र घेऊन आल्यावर, नारोबाला त्याच्या आईकडे पाठवले.

संभाजी राजेंनी रायगडावरची व्यवस्था चोख ठेवली होती. पण दुहीचे बीज खोलवर रुजले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जोपासलेल्या एकीला लागलेली दुहीची कीड घुमारे फुटून फोफावत होती. लहरी राजाकडून स्वराज्य रक्षण होणार नाही असा पुष्कळांचा समज होता.

हिरोजी फर्जंद अकबराला भेटून येताच, सोयराबाई राणीसाहेब, अण्णाजीपंत वगैरे मंडळींची गुप्त मसलत झाली. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्यात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती. मोगल बादशहा संघर्षाच्या शोधात होता. तो अफाट सैन्याची जमवाजमव करीत होता. गुप्त मसलतीत ठरले, संभाजी राजांना बाजूला सारून, रामराजाला गादीवर बसवायचे. परंतु शहजादा अकबरने ही बातमी राजांच्या कानावर घालून त्यांना सावध केले होते. याच दरम्यान संभाजींवर विष प्रयोग सुद्धा झाला होता.

संभाजींच्या क्रोधाला पारावर राहिला नाही. रायगडावर कटात सामील असलेल्या प्रमुखांना तडका फडकी बेड्या घातल्या. सचिव अण्णाजी दत्तो, सोनाजी, हिरोजी, बाळाजी आवजी यांना कैद करून ठार केले. अनेकांना हत्तीच्या पायी दिले. अनेकांची वतने, संपत्ती जप्त केली. कित्येक लोक मोगलांना जाऊन मिळाले. त्यामुळे काही अंशी लोकांवर संभाजी राजांचा वचक बसला.

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

No comments:

Post a Comment

रास्ते घराण्यातील शिक्का 🚩🚩🚩

  रास्ते घराण्यातील शिक्का सदर शिक्का मोर्तब याचे महत्व त्या व्यक्तीच्या इतिहासातील कामगिरीवर लष्करी व मूलखी कारभारातील योगदानावर आधारलेला अ...