विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 6 March 2026

२८ फेब्रुवारी १६९५ सरसेनापती संताजी घोरपडेंची स्वारी.. 🚩

 


२८ फेब्रुवारी १६९५ सरसेनापती संताजी घोरपडेंची स्वारी..

🚩

(छत्रपती राजाराम महाराजांच्या (मराठ्यांच्या) सैन्याच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देता यावे म्हणून आमच्या वखारीच्या संरक्षणाच्या जय्यत तयारीत आम्ही गुंतलो आहोत. मराठे केव्हाही येतील, अशी सुरतकरांना भीती वाटत असल्याने त्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. शक्य तेवढी संपत्ती ते जमिनीत गाडून ठेवीत आहेत. मराठे आले की राहिलेले सामान सुमान घेऊन पळ काढायचा असे त्यांनी ठरविले आहे. ठाणेदाराने सुरतेच्या संरक्षणासाठी सैन्याची कुमक पाठविण्यात प्रांताच्या सुभेदारास व बादशहास लिहिले आहे..) याचवेळी आपणाकडे वखारीच्या संरक्षणासाठी जादा तोफा व दारूगोळा पाठवावा, अशी सुरतकर इंग्रजांनी मुंबईकरांकडे विनंती धाडली होती. त्याप्रमाणे मुंबईकरांनी तोफा व दारू गोळ्याची कुमक पाठवूनही दिली. (२८ फेब्रुवारी १६९५) पण सुरतकरांच्या सुदैवाने संताजींनी सुरतेवरील आपल्या स्वारीचा बेत बदलला. सुरतेऐवजी नंदुरबार या शहरावर ते घसरले...

● सरसेनापती संताजी घोरपडेंची स्वारी नंदुरबार शहरास वेढा :
बुऱ्हाणपूर ते सुरत या मार्गावरील नंदुरबार हे महत्त्वाचे लष्करी ठाणे होते. संताजींनी या शहरास वेढा देऊन तेथील फौजदाराकडे चौथाईची मागणी केली. त्याने संताजींची मागणी धुडकावून देऊन शहराच्या संरक्षणाची कडेकोट तयारी चालविली. नवी सैन्यभरती करून त्याने त्यांना शहराच्या संरक्षणाच्या कामगिरीवर नेमले. नंदुरबार संकटात असल्याचे पाहून अहमदाबादेचा सुभेदार सुरजितखान याने एक हजाराचे सैन्य मदतीस पाठविले. आसमंतातील इतर ठाणेदारांनीही कुमक पाठविली. अशा प्रकारे बाहेरून कुमक येताच नंदुरबारच्या फौजदाराने शहराबाहेर पडून मराठ्यांशी सलाबतपूर येथे लढाई दिली. पण फार वेळ रणांगणावर न थांबता तो नंदुरबारकडे लगेच परतला. मराठ्यांनी शहराच्या तटबंदीवर हल्ला चढविला. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही...

मराठे काही काल शहराजवळ छावणी करून राहिले. शहरास वेढा देऊन त्यास जेर करावे इतका वेळ त्यांच्या जवळ नव्हता. अन्नधान्य व पाणी यांची टंचाई त्यांना जाणवत होती. अशा परिस्थितीत नंदुरबारला वेढा देणे शहाणपणाचे नाही, हे उमजून ते आसमंतातील मुलूख लुटण्यासाठी पसार झाले. मराठ्यांच्या लष्करी तुकड्यांनी नंदुरबारच्या संताजींच्या नेतृत्वाखाली साताऱ्याकडे परतीच्या प्रवासाचा रस्ता धरला...

आर्टिस्ट प्रमोद मोर्ती.
―――――――――――――
#इतिहासकर्ते_महराट्टे #नंदुरबार_स्वारी
#सरसेनापती_संताजी_घोरपडे
#गडवाटप्रवाससह्याद्रीचा #रणमार्तंड_महराट्टे 

No comments:

Post a Comment

तळेगावच्या लढाईत मराठ्यांचा इंग्रजांवर दणदणीत विजय..!!

  तळेगावच्या लढाईत मराठ्यांचा इंग्रजांवर दणदणीत विजय..!! अठराव्या शतकात मराठे आणि इंग्रज यांच्यात सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला होता. मुंबईतील ...