विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : भाग - ८

 संताजी घोरपडे : भाग - ८

राजाराम महाराज पन्हाळगडी पोचल्याची खबर ऐकूण औरंगजेबाचा फारच जळफळाट झाला. राजाराम महाराज मुत्सद्दी व सरदारांना हाताशी धरून मोगलांशी मुकाबला करण्याकरितां फौजेची जमवाजमव करू लागले. औरंगजेबने पन्हाळावर चढाई करण्यासाठी शहजादा आझमवर जबाबदारी सोपवली. पन्हाळा किल्ल्याला वेढा पडल्यामुळे किल्ल्याबाहेर कसे पडायचे? सुदैवाने पावसाचे दिवस असल्यामुळे मोगलांचा वेढा तेवढा कडक नव्हता. सल्लामस्तीसाठी सरदारांची बैठक भरवण्यात आली. तेवढ्यात प्रतापगड मोगलांनी घेतल्याची कटू बातमी आली. बराच वेळ विचार विनिमय झाल्यावर, महाराणी येशुबाईंच्या म्हणण्यानुसार महाराजांनी जिंजीला जावे असे रामचंद्रपंत म्हणाले.

"पण पंत! येसूवहिनींना संकटात टाकून आणि तुम्हा सर्वांना संकटात लोटून आम्हाला निघून जावे मनाला पटत नाही."

संताजी म्हणाले, "त्यासाठी आम्ही खंबीर आहोत. लाखाचा पोशिंदा सुरक्षित राहणे आवश्यक आहे. गड किल्ले गेले तरी आम्ही परत घेऊ शकतो. राज्याचा खजिना रिकामा, फौजेचा तुटवडा, महाराणी येसूवहिनी शाहूराजेसहित शत्रूच्या ताब्यात आहे. म्हणूनच आपण सुरक्षित जिंजीकडे गेल्यास तिथून सूत्र हलवता येतील."

बऱ्याच विचारांती योजना ठरली... महाराज मुख्य सल्लागार रामचंद्रपंतांना जवळ ठेवून संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांनी ठिकठिकाणी छापे घालून मोगलांना हैराण केले की, रायगडाचा वेढा ढिला होऊ शकेल. सध्या तरी महाराजांनी पन्हाळगडीच राहण्याचे ठरवले.

संभाजीराजे आपल्या हाती सापडल्यामुळे, औरंगजेबाला वाटले, आता स्वराज्य सहज हाती येईल. त्याने संपूर्ण स्वराज्यात घुसून उच्छाद मांडला होता. त्रिंबक, रोहिंडा, तोरणा किल्ले बादशहाने हस्तगत केले. तसेच कोकणातील कल्याण, माऊली हस्तगत केले. संतापाने, क्रोधाने धगधत संताजी घोरपडेंनी पायथ्याशी असलेल्या आझमच्या सैन्याचा फडशा पाडला.

तेवढ्यात शेख निजाम पन्हाळ्यावर चालून येत असल्याची वार्ता आल्याबरोबर, संताजी घोरपडेंच्या क्रोधाचा उद्रेक झाला. संभाजी राजेंचा आणि आबांच्या वधाचा सूड घेण्यासाठी ते आवेशाने चालून गेले. यानेच संभाजी राजेंना घोड्यावर घालून बादशहासमोर हजर केले होते. संताजी, धनाजी दोघे वीर शेख निजामवर तुटून पडले. घनासाम युध्द झाले. बरेचसे मोगल सैन्य गारद झाले. भरपूर लूट मिळाली. पण शेख निजाम निसटला. दहा हजार फौज घेऊन दोन्ही वीर स्वराज्यभर संचार करून मोगलांना त्रस्त करू लागले.

संभाजी राजेंचा अतिशय क्रूरपणे पाशवी वध झाल्याचे कळताच संपूर्ण महाराष्ट्र हादरला. सर्वच हवालदिल झाले. अवघा महाराष्ट्र शोक सागरात बुडाला. दुःखाचे व भीतीचे सावट पसरले. मोगलांच्या अत्याचाराखाली मराठी प्रजा भरडली जाऊ लागली.

संताजी घोरपडेंची घुसमट होऊ लागली. संभाजी राजे व पिता म्हाळोजीच्या बलीदानाचा बदला घेण्यासाठी ते विश्वासू माणसे गोळा करू लागले. मोगलांचा महाराष्ट्रभर धुमाकुळ चालू होता. तिकडे रायगडाचा वेढा अधिकच घट्ट होत चालला होता. मोगलांचा सर्वत्र विजय होतसे पाहून, स्वराज्यातील काही किल्लेदार, ठाणेदार शरण जाऊन किल्ले त्यांच्या स्वाधीन करू लागले. वतनदार आपले वतन अबाधीत राहावे म्हणून, बादशहा कडून सनदपत्र मिळविण्याच्या उद्योगाला लागले होते.

अशा परिस्थितीत रायगडाची परिस्थिती मोठी शोचनीय झाली.

एवढ्यात आलेल्या बातमीने रायगडावरील लोकांचे धैर्य खचले. बातमी होती की, राजाराम महाराज कर्नाटक कडे जात असताना तुंगभद्रेच्या काठी मोगलांशी झालेल्या चकमकीत पकडले गेले आणि त्यांना आणण्यासाठी हमीउद्दीन खान या सरदाराला रवाना केले आहे. रायगडावरचे काही सरदार फितूर होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. रायगड शत्रूच्या स्वाधीन करावा का या विचारापर्यंत मजर गेली.

वास्तविक रायगड अत्यंत दुर्दम्य. कितीही शत्रू चालून आले तरी गडावरील मोजके सैन्य त्यांना प्रतिकार करण्यास सक्षम होते. त्या दृष्टीने वेढा मोडून काढण्याचे त्यांचे प्रयत्न चालू होतेच.

पण वाईच्या वतनाच्या लोभाने, स्वार्थापोटी सूर्याजी पिसाळ फितूर होणार हे लक्षात येताच, गड शत्रूच्या ताब्यात गेल्यास आपणाला अब्रूने वागवल्या जाणार नाही, हे लक्षात आले. येसूबाईंनी झुल्फीकारखानाशी वाटासाठी सुरू केल्या. राज कुटुंबास प्रतिष्ठेने वागवले जाईल असे वचन घेऊन, महाराणी येसूबाई, युवराज शाहू राजे गडावरील सहकाऱ्यांसह मोगलांच्या स्वाधीन झाल्या.

छावणीतील खाशा बादशीही डेर्‍यात लोडाला टेकून हातात तसबीहाचे मणी सरकवत, बादशहा एकटाच बसला असता, बाबा मुसलमानाने एक खलिता त्याच्या हाती दिला. खलिता वाचताच औरंगजेब खुश झाला. तेवढ्यात वजीरे आझम आसदखान, झुल्फिकार खानने प्रवेश करून कुर्निसात केला व अदबीने उभा राहिला, "वाऽऽ, वाऽऽ झुल्फिकार बेटा! फार मोठी कामगिरी केली. रायगड आपल्या ताब्यात घेतला. मराठ्यांचे राज्य खतम केलेस. शाब्बास!"

"जी हुजूर! आपकी मेहरबानी....."

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

No comments:

Post a Comment

रास्ते घराण्यातील शिक्का 🚩🚩🚩

  रास्ते घराण्यातील शिक्का सदर शिक्का मोर्तब याचे महत्व त्या व्यक्तीच्या इतिहासातील कामगिरीवर लष्करी व मूलखी कारभारातील योगदानावर आधारलेला अ...