विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : भाग - ९

 संताजी घोरपडे : भाग - ९

औरंगजेबने विचारले, "रायगडावरून कोण कोण मात्तबर माणसं गिरफ्तार करून आणलीस?"

"हुजूर, संभाजीची पत्नी येसूबाई व तिचा पुत्र शाहूला आणले, पण छत्रपती राजाराम हातावर तुरी देऊन निसटला."

"पळाला? कसा पळाला? तुझा वेढा एवढा सख्त असताना? कुणी गद्दारी केली?"

बादशहाने त्याला बरेच सुनावल्यावर, तो कुर्निसात करून निघून गेला.

थोड्यावेळाने बादशहाची लाडकी मुलगी झेबुन्निसा आली. औरंगजेबाने संभाजीच्या कबिल्याची व्यवस्था तिच्या स्वाधीन केली.

बादशहाने शाहू राजेंना सप्तहजारी, मनसब देऊन "राजा" किताब दिला. शिवाय खिल्लत, रत्नजडीत खंजीर, आरसी घोडा, हत्ती, ध्वज, नगारे नौबतीचा मान आणि स्वतंत्र शिक्का दिला. त्याचा इरादा शाहूंना महंमदी धर्माची दीक्षा देण्याचा होता. पण झीनतने इन्कार केल्यावर, म्हणाला, ठीक आहे. शरीराने हिंदूच राहील. पण त्याच्यावर सर्व संस्कार मुसलमान पद्धतीने करायची जबाबदारी तुझ्यावर राहील. आम्ही उत्तरेत परत जाऊ तेव्हा दख्खनच्या सुभ्यावर इस्लामी संस्कारात वाढलेला हा हिंदुराजा आमचा मांडलिक म्हणून बसवायचा आहे.

छत्रपती संभाजी राजेंना कैद झाल्यापासून संकटाच्या मालिकेचा शेवट रायगडाच्या पडावाने झाला. थोड्याश्या स्वार्थापायी सूर्याजी पिसाळच्या फितूरीने रायगड मोघलांच्या ताब्यात गेला. महाराणी येसूबाई व शंभूराजे कैद झाले.

मराठ्यांचा राजा संभाजी राजेंना हाल हाल करून मारले. राजाराम महाराज पकडला गेल्याची अफवा उठवली. स्वराज्याचे बरेचसे किल्ले मोगलांच्या ताब्यात गेले. अवघ्या आठ दहा महिन्यात शिवाजी महाराजांनी मोठ्या शर्थीने, पराक्रमाने जे स्वराज्य निर्माण केले ते जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आले होते.

औरंगजेब मनोमनी खुश झाला. त्याला वाटले, आपली दक्षिणेतील मोहिम संपली. आता मराठ्यांचे राज्य आपल्या ताब्यात आल्यासारखेच आहे. पण त्याचा लवकरच भ्रमनिरस झाला.

रामचंद्रपंतांनी धनाजी जाधवला फौज देऊन फलटणला असलेल्या रणमस्तखान व शाबुद्दीन खानच्या ठाण्यावर हल्ला करण्यास पाठवले. वाटेत संताजींची तुकडी भेटल्यावर संताजीने बादशहाच्या छावणीवर छुपा हल्ला करण्याची आपली मनीषा बोलून दाखवली. औरंग्याला वाटते, मराठे संपल्यातच जमा आहे. त्याला मराठ्यांचा हिसका दाखवायला हवा. महाराणी व शाहू राजेंची सुटका लवकरात लवकर करायची होती.

दोघांनीही बराच वेळ सल्लामसलत केली. आपण एकदिलाने राहून मोगली सत्तेला जबरदस्त हादरा देऊ. दोघांनी कडकडून गळा भेट घेतली आणि संताजी घोरपडे तुळापूर मुक्कामी असलेल्या बादशहाच्या छावणीच्या रोखाने निघाले. धनाजींनी त्यांना विठोबा चव्हाण सारखा शूर सेनानी व दोन हजार घोडदळ दिले.

त्यावेळी राजाराम महाराज पन्हाळ्यावर असल्यामुळे, मोगलांना इतरत्र गुंतवून ठेवणे आवश्यक होते. महाराजांच्या पाठलागावर असलेल्या मोगल शत्रूस वाटेत अडवून त्याचे खच्चिकरण करणे जरुरीचे होते. धनाजी, संताजी गनिमी काव्याचा उपयोग करून मोगल फौजेची लांडगेतोड करत होते. धनाजीची फौज बारामती भागात तर संताजी आपले बंधु बहिर्जी, मालोजी व इतर फौजफाटा घेऊन शंभू महादेवाच्या डोंगरावर आले. मनोभावे महादेवाचे दर्शन घेतले व जेजुरी गाठली. कुलस्वामी खंडेरायाचे दर्शन, मल्हारीचा आशीर्वाद घेऊन संताजीने दिवा घाट उतरून गर्द झाडीत मुक्काम केला. तिथून संताजीने बादशहाच्या तंबुतील व्यवस्थेची, त्याच्या झोपण्याच्या वेळा, पहारा बदलण्याच्या वेळा ही सर्व इत्थंभूत माहिती गोळा केली.

औरंगजेबचा तंबू छावणीच्या मध्यभागी असून त्याच्या तंबूभोवती जाड कापडाचे कुंपण होतं. तंबूच्या प्रवेशद्वारापासूनच आतील भागाचे चार विभाग पाडले होते. पहिल्या भागात नगारखाना, दुसऱ्यात सभागृह, तिसऱ्यात बादशहाच्या सरदारांसाठी व भेटीसाठी हा खास उंची शामियाना होता. चौथ्या भागात त्याचे विश्रांती स्थान होते. पाठीमागच्या भागात राजघराण्यातील वृद्ध स्त्रिया व बाहेरील बाजूच्या मागील अंगास राजघराण्यातील इतर स्त्रीयांच्या निवासाची जागा होती. अशा या छावणीच्या भोवती सर्व बाजूंनी अष्टौप्रहर सशस्त्र सैनिकांचा कडक पहारा होता.

बादशहाच्या तंबुसमोर काही अधिकारी व त्यांचे कार्यालय विखुरले होते. एका बाजूस एक मुख्य प्रवेशद्वारा लागत दाराला लागून घोड्यांच्या पागा व पिलखाना, दुसऱ्या बाजूस शस्त्रांचा साठा, मोठमोठे गाडे, पायदळ, घोडदळाचे अधिकारी आणि त्यांच्या निवासाच्या जागा होत्या. तिथून काही अंतरावर मोठमोठ्या सरदारांचे तंबु होते. मंत्री, शहजादे यांचे देखील थोड्या अंतरावर निवासस्थान होते. त्या भोवती संरक्षण दल होते.

बादशहाच्या मुख्य तंबुचे द्वार सभागृहाकडे होते. तिथे अवजड तोफखाने ठेवले होते. अशी ही छावणी म्हणजे एक चालते फिरते शहरच होते. बादशहाचे शहजादे, नातु, यांच्या तंबुला तांबडा रंग तर, मोठे मोठे सरदार, वजीर मंत्री न्यायाधीशांच्या तंबूला पांढरे पट्टे दिले होते.

बादशहाच्या मुख्य तंबूला "गुलालबार" म्हणून ओळखले जात असे. तंबूच्या भोवती खोल खंदक खणलेले होते. आणि या बादशहाच्या तख्त्याला हादरा देण्यासाठी संताजी निघाले होते...

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

No comments:

Post a Comment

रास्ते घराण्यातील शिक्का 🚩🚩🚩

  रास्ते घराण्यातील शिक्का सदर शिक्का मोर्तब याचे महत्व त्या व्यक्तीच्या इतिहासातील कामगिरीवर लष्करी व मूलखी कारभारातील योगदानावर आधारलेला अ...