विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : भाग - ७

 संताजी घोरपडे : भाग - ७

संभाजी राजांचे सुरक्षा कवच म्हाळोजीराव पडले. आणि मोगलांनी राजेंना बंदिस्त केले. पुढील मसलत रायगडी जाऊन येसूबाईराणी साहेबांच्या सल्ल्याशिवाय शक्य नव्हती. त्यासाठी संताजी, बहिर्जी, मालोजी, घोरपडे बंधू आणि खंडो बल्लाळ दौडत निघाले. शत्रूच्या तावडीत सापडलेले संभाजी महाराज आणि पित्याच्या मृत्यूच्या आठवणीने संताजी सुन्न झाले. सूडाने पेटून उठले. रायगड अजून बऱ्याच दूर होते. तोवर मनाला आवर घालणे त्यांना अतिशय कठीण जात होते.

रायगडावर महाराणी येसूबाई, राजाराम महाराज व इतर राजघराण्यातील मंडळी होती. महाराष्ट्रभर मोगलांनी धुमाकूळ घातला होता. रायगडला वेढा पडला आणि सर्व रायगड संकटात सापडला होता. सगळे चिंताग्रस्त झाले होते. अशाच अगतिक परिस्थितीत येसूबाईंनी आपला मनसुबा जाहीर केला, राजाराम महाराजांनी गडाबाहेर काही निवडक लोकांसह निघून मोगलांच्या तावडीतून गड मुक्त करण्याचा प्रयत्न करावा. तसाच बाका प्रसंग आला तर जिंजीकडे निघून जावे. अर्थातच राजाराम महाराजांना येसूबाई व राज कुटुंब गडावर ठेवून स्वतः निघून जाणे योग्य वाटेना. परंतु महाराणीची आज्ञा डावलणेही नाही शक्य नव्हते.

छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब बादशहाच्या गुहेत जाऊन आग्र्यातून महाराष्ट्रात परत आले. पण त्यांचाच पुत्र स्वतःच्या राज्यात शत्रू कडून पकडला गेला. केवढा हा दैवदुर्विलास?

शेख निजामन संगमेश्वरावरून संभाजी राजे आणि कवी कलश यांना इतक्या वेगाने घेऊन निघाला की, विशालगडाच्या परिसरातील मराठ्यांच्या लष्करी तुकड्यांना बातमी सुद्धा लागली नाही. परिणामी, कोणीही शेख निजामला अडवण्यापूर्वीच राजबंद्यांना औरंगजेब समोर हजर केले गेले.

मोगल छावणीत संभाजी राजेंचे भवितव्य जवळजवळ निश्चित झाले होते. ते जिवंत राहणे असंभवनीय होते.

रायगडाच्या मोगली वेढ्याला गुंगारा देऊन खंडो बल्लाळ व तिघे घोरपडे बंधू गडावर पोहोचले. संगमेश्वरी घडलेली घटना ऐकून येसूबाईंच्यावर आकाश कोसळले. राजाराम चिंताग्रस्त झाले. संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजला. अशा बिकट समयी मराठ्यांच्या राणीने आपले मनोधैर्य कायम ठेवले. पहाडाएवढे वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून, आलेल्या संकटावर मात करण्यासाठी सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली. चांगोजी काटकरास हाताशी धरले. थोरल्या महाराजांनी रायगडला राजधानी बनवली. ती अशी वाऱ्यावर सोडून चालणार नव्हती. अशा कठीण प्रसंगी सर्वांनी एक दिलाने राहायला हवे. खंडो बल्लाळ, संतजींनी आपले विचार प्रगट केल्यावर, येसुबाई ठामपणे म्हणाल्या, जास्त वेळ छत्रपतीची गादी रिकामी असता कामा नये. आम्ही राजाराम महाराजांना अभिषेक करायचं ठरवले आहे. रामचंद्र पंत म्हणाले, पण संभाजी राजे हयात असताना.... प्रल्हाद निराजी म्हणाले, निदान युवराज शंभूराजेंना... महाराणी येसूबाई म्हणाल्या, केवळ स्वार्थापोटी सहा वर्षाच्या शाहूंना गादीवर बसवण्याची आमची तयारी नाही. महाराज मोगलांच्या कैदेतून सुटून येईपर्यंत राजाराम महाराज मराठ्यांचे राजे राहतील. राज्यभिषेकाला वेळ लागत असेल तर, त्यांचे मंचकारोहण तातडीने करून घ्यावे.

राजाराम महाराजांचे मंचकारोहण झाल्याची द्वाही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरवली. हिंदवी स्वराज्याचे प्रमुख म्हणून राजाराम महाराजांचे नाव घोषित केले. त्यावेळी राजाराम महाराज केवळ १९ वर्षाचे होते. वास्तविक शाहू राजांना छत्रपती म्हणून घोषित करून स्वतः राज्यकारभाराची सूत्रे येसूबाईंना आपल्या हाती सहज घेता आली असती. पण स्वराज्याचे हित समोर ठेवून अत्यंत निस्वार्थपणे स्वतः पुढाकार घेऊन राज्याची सूत्रे राजाराम महाराजांच्या हाती दिली.

रायगडला इतिक खान वेढा देऊन बसला होता. गडावर स्वराज्यातील मातबर प्रमुख मुत्सद्दी, प्रमुख सेनानी विठोजी चव्हाण, प्रमुख मुत्सद्दी खंडो बल्लाळ, धनाजी जाधव, रुपाजी भोसले, मानोजी मोरे, तिन्ही घोरपडे बंधू जमलेले होते. येसुबाई म्हणाल्या, आपण स्वतः गढ लढवू. आधीच ठरल्याप्रमाणे राजाराम महाराजांनी प्रमुख मंडळीसह गडाबाहेर पडून शत्रूशी संघर्ष चालू ठेवावा. अखेर सर्वांना मसलत मान्य करावीच लागली

अशा कठीण समयी येसूबाईंनी माहेरची मदत मिळणे शक्य नव्हते. वडील पिलाजी शिर्के आधीच वारलेले, भाऊ व चुलता मोगलांना सामील झालेले. येसूबाईंच्या सल्ल्यानुसार वागणेच क्रम प्राप्त होते.

ठरल्याप्रमाणे राजाराम महाराज, प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, खंडो बल्लाळ, खंडेराव दाभाडे ही मंडळी मोगलांच्या वेड्यातून निसटून गडाबाहेर पडली.

रायगड ते पन्हाळा अत्यंत जिकरीचा प्रवास करत मोगलांच्या सैन्याची टेहाळणी चुकवत प्रथम जावळी, नंतर प्रतापगडावर पोहोचले. पण महाराजांना प्रतापगडी धोक्याचे वाटल्यामुळे ते वासोटाकडे जाऊन नंतर साताऱ्यास पोहचले. तिथून सज्जनगडाला जाऊन समर्थांचे दर्शन घेतले. पावसाळ्याच्या सुरुवातीला पन्हाळगडावर पोहोचले.

संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

No comments:

Post a Comment

रास्ते घराण्यातील शिक्का 🚩🚩🚩

  रास्ते घराण्यातील शिक्का सदर शिक्का मोर्तब याचे महत्व त्या व्यक्तीच्या इतिहासातील कामगिरीवर लष्करी व मूलखी कारभारातील योगदानावर आधारलेला अ...