विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : भाग - १०

 संताजी घोरपडे : भाग - १०

अशा कडेकोट बंदोबस्त असलेल्या बादशहाच्या तख्ताला हादरा देण्यासाठी संताजी घोरपडे त्याच्या छावणीपासून काही अंतरावर झाडीत लपून संधीची वाट पाहत बसले होते. धो धो कोसळणारा पाऊस थोडा कमी झाल्यावर, सशस्त्र तयारी करून विठोजी चव्हाण, बहिर्जी, मालोजी घोरपडे आणि निवडक सैन्य सोबत घेऊन बाकीच्या सैन्यांना काही सूचना देऊन, सैन्याला तिथेच थांबवायला सांगून दख्खनचा वाघ झाडीतून बाहेर पडला. मध्यरात्र झाली होती. सगळीकडे काळोख पसरला होता. निरनिराळ्या वेशात संताजी आपल्या माणसांबरोबर पुढे सरकत होते. छावणी पासून अलीकडे तीन कोसावर छबिनांच्या स्वारांची व त्यांची गाठ पडली तेव्हा बादशहाच्या लष्करातील हिंदू सरदार शिर्के व मोहिते यांच्या पथकातील आम्ही असल्याची बतावणी करून, पहारा बदलल्यामुळे आम्ही परत येत असल्याचे सांगून छावणीत प्रवेश मिळवला.

त्यानंतर निरनिराळ्या ठिकाणी अशाच थापा मारून, खूण पटवून देऊन, "गुलालबार" या बादशहाच्या तंबुकडे जाण्याचा मार्ग मोकळा करून घेतला. पहारा चुकवत युक्तीने मुख्य गोटात शिरले.

संताजीने तंबू फाडून बादशहाला शोधायचा प्रयत्न केला पण तिथे तो नव्हता. पेंगुळलेल्या सरदारांना यमसदनास पाठवत, संताजी दोन बंधू व विठोजी चव्हाण मध्यभागी उठून दिसणार्‍या बादशहाच्या तंबुकडे गेले. पण त्यांची निराश झाली. औरंगजेब तिथेही नव्हता. इतके प्रयत्न करूनही बादशहा गवसला नाही याची संताजींना खंत वाटली. पण आपण येऊन गेल्याची, आपण मारलेली धडक बादशहाला समजावे म्हणून, तंबुचे तणाव तोडले. त्याबरोबर सारा शामियाना खाली चिखलात कोसळला. तंबुवरील सोन्याची कळस, शिक्के, कट्यार हस्तगत केली. चौघांच्याही तलवारी सपासप वार करू लागल्या. या अल्लाऽऽ...या अल्लाऽऽ च्या आर्त किंकाळ्या निनादू लागल्या. तंबुचे तणाव कापल्यामुळे त्याखाली मोगल सैनिक दबल्या गेले. वरून मराठ्यांच्या तलवारीचे वार. रक्तमासाच्या चिखलाने तंबू भरला गेला. चौघांनीही बादशहाच्या शयनगृहात प्रवेश केला. पण बादशहा तिथे न दिसल्याने त्यांची निराशा झाली.

संताजींना अतिशय वाईट वाटले. त्यांना संभाजी राजे आणि वडिलांच्या वधाचा बदला घ्यायचा होता. त्याच्या शैयेवर भाला खूपसुन प्रतिज्ञा केली... हा संताजी घोरपडे, आपल्या कुलदेवतेची आण घेतो... जशी आमच्या राजाची दिंड काढून हाल हाल करून मारले, तसेच हाल तुझे करणार आहे.

कुणाची तरी चाहूल लागली आणि संताजी भानावर आले. त्यांनी सोन्याचा कळस, शिक्का, कट्यार शेल्यात व्यवस्थित बांधून घेतले. आणि बहिर्जीला योग्य सूचना देऊन, तुकडीला छावणी बाहेर काढायला सांगितले. नंतर विठोजी चव्हाणसह संताजी आपल्या तुकडीसह छावणीतून बेमालूम निसटले. मागे राहिले फक्त विव्हळणारे मोगल सैनिक. आणि रक्त मासाचा सडा. त्या चिखलात लोळलेल्या शामियाना. ज्या कोणी संताजीचा पाठलाग करायचा प्रयत्न केला, तो परत जाऊ शकला नाही.

त्याच रात्री संताजी आपल्या तुकडीसह सिंहगडाच्या पायथ्याशी आले. गडाचा किल्लेदार होता, प्रतापराव गुजर पुत्र सिंधोजी गुजर. तो संताजीस भेटण्यास गडाखाली आला. दोघांनी गळा भेट घेतल्यावर, संताजींनी तुळापूरच्या मोहिमेबद्दल सविस्तर हकिकत सांगितली. शाब्बास संताजीऽऽ! मराठ्यांचे नाव राखले.

कसले कौतुक करता? आम्ही संभाजी राजेंचे रक्षण करू शकलो नाही. त्यांना वाचवतांना आमचे पिताश्री घरातीर्थी पडले. छत्रपतींच्या राज्याचे रक्षण हेच आमचे कर्तव्य आहे. यवनी सत्ता धुळीस मिळेपर्यंत आम्ही तलवारीला उसंत देणार नाही. विठोजी चव्हाण म्हणाले! बादशहाच्या छावणीवर हल्ला म्हणजे साक्षात मृत्युशीच सामना होता.

त्याचवेळी गडावरून रसद आणि हकीम आले. भर पावसात सगळ्यांची त्रेधा उडत होती. संताजींच्या डोळ्यासमोर रायगडावर डौलाने फडकणारा जरी पटका, भगवा साद घालत होता. ज्या सिंहासनासमोर अवघ्या महाराष्ट्राने नतमस्तक व्हावे, ते शिवरायांचे सिंहासन फोडले गेले. संताजी आपल्या सैनिक तुकडीसह रायगडाकडे दौडत निघाले.

घाट उतरून इतिकखानवर कोसळले. खानाची मुबलक लुट आणि पाच हत्ती हस्तगत केले आणि आपल्या सैनिकांसह सातारला आले. वाटेत धनाजीची चौकशी करत पन्हाळावर पोहोचले.

महत्त्वाचे किल्ले मोगलांच्या ताब्यात गेल्याने स्वराज्याची अवस्था आभाळ फाटल्यागत झाली होती. संताजी घोरपडे तुळापुरवर यशस्वी हल्ला करुन पन्हाळावर येत असल्याची खबर आधीच पोहचली होती. संताजींची यशस्वी मोहिम, अमर्याद लूट मिळाल्याने मराठी फौजेंचा उत्साह दुणावला होता.

छत्रपती राजाराम महाराजांनी पन्हाळगडावरच्या राज महालात दरबार भरवला. राजाराम महाराज व ताराबाईंचा दरबारात प्रवेश होताच, सर्व दरबार उभा राहिला. मुजरे झडू लागले. सगळे आसनस्थ होत नाही तोच नौबती, शिंग, तुतारी वाजू लागल्या. ताराबाईंनी विचारले, पंत, अशा कठीण प्रसंगी हे दरबारी माननरातब कशाला हवेत? जागोजागी फितूरांचा सुळसुळाट असताना, स्वामी गडावर आहे हे नौबती पिटून जाहीर करण्यातला धोका तुमच्या लक्षात आला नाही का पंत?

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

No comments:

Post a Comment

रास्ते घराण्यातील शिक्का 🚩🚩🚩

  रास्ते घराण्यातील शिक्का सदर शिक्का मोर्तब याचे महत्व त्या व्यक्तीच्या इतिहासातील कामगिरीवर लष्करी व मूलखी कारभारातील योगदानावर आधारलेला अ...