विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : भाग - ५

 संताजी घोरपडे : भाग - ५

छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रयासाने एक एक जोडलेला माणूस अशाप्रकारे नाहीसा झाल्यामुळे राज्याचे अपरिमित नुकसान झाले. जुनी जाणती मंडळी आपल्या विरोधात आहे अशी संभाजी राजेंची खात्री झाल्याने त्यांनी कवी कलशला हाताशी धरले. त्यावेळी संभाजी राजेंना नुसत्या घरच्याच कटकारस्थानाला तोंड द्यावे लागत नव्हते, तर जंजिर्‍याचा शिद्दी, गोव्याचा पोर्तुगीज, मोगल बादशहा असे अनेक शत्रूनाही तोंड द्यावे लागत होते.

रायगडावरचा कट निपटून काढल्यावर, राजेंनी मोहिमा हाती घेतल्या. त्याचवेळी तुंगभद्राच्या परिसरात पठाण, बेरड व इतर जमातींनी उठाव केला. संभाजी राजे कर्नाटकावर स्वारी करण्यास निघाले. पावसाळी दिवस. परका मुलुख. नदी नाले तुडुंब भरलेली. फौजेची दमछाक झाली. अशा वेळी बेडर, पठाणांनी अचानक हल्ले करून संभाजी राजेंच्या फौजेचे बरेच नुकसान झाले. त्यांनी तातडीने संताजीला खलिता घडला. खलिता घेऊन संताजी पिता म्हाळजींच्या दालनी गेले व आलेला खलिता त्यांच्या हाती दिला. संताजी मला तर गडावरुन हलता येत नाही. आधीच मोगलांच्या डोळ्यात पन्हाळा खूपतो आहे. सेनापती हंबीररावही रायगड सोडून येऊ शकत नाही. वडील विचारात पडलेले पाहून, संताजी म्हणाले, आबा, मला फक्त आशीर्वाद द्या. राजांच्या मदतीला मी जातो. अरे पण, कुमक ?आबा चिंता नको. जाताना वाटेत फौजा सामील होतील.

संताजी मोहिमेवर निघण्यास तयार झाले. द्वारकाबाईंनी त्यांचे औक्षण केले. तेवढ्यात सोयराबाईही लहानग्या राणोजीला घेऊन आल्या. राणोजीला जवळ घेऊन त्याचे कोड कौतुक केले. दोघांकडे कटाक्ष टाकून संताजी घोड्यांवर स्वार होऊन कोप्पल प्रदेशात अडचणीत असलेल्या संभाजी राजेंच्या सहाय्यास निघाले. त्यांची प्रतीक्षा करीत असलेली फौज हर हर महादेवच्या घोषणा देत त्यांच्याबरोबर दौडत निघाली. ही एकट्या संताजीच्या नेतृत्वाखालील पहिली मोहीम होती.

पावसाची सतत धार सुरू होती. भर पावसात संताजी सेनेसह कोप्पलकडे एखाद्या झंजावातासारखे सरकत होते. नद्या, मोठे नाले पुरामुळे दुथडी वाहत होते. संताजी त्यांना पार करून बारा हजाराची फौज घेऊन घोडदौड करत होते. संभाजींच्या गोटात खबर मिळताच सैन्यात उत्साह संचारला. आवेश निर्माण झाला. ते दुप्पट जोमाने लढू लागले. संताजींनी गनिमी काव्याचा अवलंब केला. त्यांनी मुख्य सैन्याला बाजूला ठेवून, मोजके सैन्य घेऊन शत्रूवर चालून गेले. संताजी सारखा महान योद्धा तुटपुंज्या सैन्यानिशी रणांगणावर लढायला आलेला पाहून बेरड, पठाणांना चेव चढला. लढाईला जोर चढताच आपला पराभव झाल्याचे दर्शवून संताजींनी रणातून पळ काढला. आपल्याला जय मिळाल्याच्या धुंदीत शत्रूने त्यांना जिवंत पकडण्यासाठी पाठलाग केला. पुढे संताजी, पाठीवर शत्रू, अशी घोडदौड करत, संताजींनी आपली मुख्य फौज झाडीत लपवून ठेवली होती. तिथे पोहोचले. शत्रू जवळ येताच लपून असलेली फौज अचानक प्रगट झाली. आणि चारही बाजूने शत्रूला घेराव घातला. भीषण युद्ध सुरु झाले. बेरड, पठाण खाली कोसळू लागले. शत्रूचा पराभव झाला. संताजी ने सतत तीन महिने युद्ध करून कोप्परच्याही पुढे तुंगभद्रापर्यंतचा मुलुख काबीज केला आणि कित्येक ठाणी सर केली.

संताजींच्या पराक्रमावर खुश होऊन, संभाजीराजेंनी राज्याचा चौथाई मुलुख इनाम दिला. संताजींना शिवाजी महाराजांची तीव्रतेने आठवण झाली. त्यांना वाटले, आज ते हयात असायला हवे होते. आजचा माझा पराक्रम पाहून विश्रामगडावरचा रोष मावळला असता आणि हर्षभरीत होऊन, पाठीवर शाबासकीची थाप मारली असती. एवढ्या आनंदी क्षणी सुद्धा संताजीचे मन दुःखी झाले. लगेच स्वतःला सावरत मनाशी म्हणाले, महाराज हयात नाही म्हणून काय झाले? माझे इनाम छत्रपतींच्या गादीशी आहे.

कोप्पलीची मोहीम यशस्वी करून संताजी परतले. त्यापूर्वीच त्यांचा पराक्रमाची वार्ता म्हाळोजींना मिळाली होती. आपल्यासारखाच आपला पुत्र स्वराज्यासाठी लढतो हे पाहून त्यांना धन्यता वाटली. संभाजी राजेंनी स्तुती केली. रामचंद्रपंतासारख्या जाणत्या मुत्सद्याने संताजींच्या कार्याचे योग्य मूल्यमापन केले. राज्यातील प्रतिष्ठित लोक स्वार्थासाठी मोगलांना जाऊन मिळाले. पण संताजीच्या मनातही विचार आला नाही. उलट शत्रूच्या सरदारांना जशी संधी मिळेल तसे नेस्तनाबूत करू लागले.

पन्हाळगडावर घोरपडे कुटुंबाच्या छत्रछायेत नारो लहानाचा मोठा झाला. म्हाळोंजींच्या हाताखाली त्याला शिपाईगिरीची उत्तम तालिम मिळाली. मुळातच बुद्धिमान! शौर्य आणि बुद्धी यांची उत्तम सांगड जमली. आर्जवी स्वभावामुळे तो सर्वांचाच आवडता झाला. संताजीप्रमाणे छत्रपतींबद्दल त्याचेही मनात अत्यंत आदर भाव होता.

संभाजी राजेंनी हिरजीराजे महाडिक, श्यामजी पुंडे, जेताजी काटकर, दादाजी वाकडे यांना कर्नाटकच्या व्यवस्थेसाठी पाठवले. ते सर्व जिंजीला पोहोचताच संभाजी राजेंच्या आदेशाप्रमाणे श्यामजी नाईकांना कैद करवली. हिरजी राजेंनी कर्नाटकात चांगला जम बसवला. काही दिवसांनी श्रीरंगपट्टण व त्रिचनापल्लीच्या सत्ताधीशांचा वाद सुरू झाला. हिरजी राजेंनी त्रिचनापट्टणकरांची बाजू घेऊन श्रीरंगपट्टणच्या राजकुमाराला कैद करून दोन हजार घोडे ताब्यात घेतले.

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

No comments:

Post a Comment

रास्ते घराण्यातील शिक्का 🚩🚩🚩

  रास्ते घराण्यातील शिक्का सदर शिक्का मोर्तब याचे महत्व त्या व्यक्तीच्या इतिहासातील कामगिरीवर लष्करी व मूलखी कारभारातील योगदानावर आधारलेला अ...