हिरजीराजे महाडिकने कर्नाटकातील जिंजी प्रांतात प्रभूत्व मिळवले. महाडिकने एक प्रकारे स्वतंत्र राज्यच निर्माण केले. संभाजी राजेंना कळल्यावर, त्यांच्या बंदोबस्तासाठी केसो त्रिंबक व संताजीस पाठवले. कर्नाटकात औरंगजेब आपला अंमल बसवत आहे त्याला पराभूत करून, कर्नाटकचे रक्षण करावे अशी ताकीद राजांनी दोघांनाही दिली.
त्याचवेळी औरंगजेबाने अफाट सैन्य कासिमखान बरोबर देऊन बेंगलोरवर हल्ला करण्यास पाठवले. तो पोहोचण्याआधी संताजी घोरपडेंनी बंगलोरवर कब्जा केला. मागोमाग कासिमखान ससैन्य पोहचला. म्हैसुर राजा चिक्कदेवने कासीमला मदत केली. कासीम आणि चिक्कदेवच्या सैन्याचा सामना करणे संताजीला शक्य नव्हते. म्हणून त्यांनी आपला मोर्चा कर्नाटकातील इतर शहरांकडे वळवला. कासिमने बेंगलोर शहर काबीज केले. आणि तीन लाख होन घेऊन चिक्कदेवास विकले.
केसोपंतांनी हिरजी महाडिकचे अधिकार काढून घेतले. अधिकार गेल्याचे वैषम्य वाटल्यामुळे केसोपंतांनी मदत करण्याऐवजी विरोधच केला. चिक्कदेवच्या ताब्यात बेंगलोर येताच त्यांनी हिरजी राजेंना मदतीला बोलावले. हिरजी राजे तिकडे गेले.
इकडे औरंगजेबने गोवळकोंडा व विजापूर या दोन पातशह्या खालसा केल्यावर दक्षिण हिंदुस्तानात फक्त मराठेच त्यांच्या विरोधात राहिले. त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी आपल्या विश्वासू सरदारांना सातारा, सज्जनगड, प्रतापगड, पन्हाळा वगैरे मराठ्यांच्या प्रमुख ठाण्याच्या रोखाने रवाना केले. विजापूरचा सरदार रुस्तम मोगलांच्या चाकरीत आला. त्याला सातारा काबीज करण्यास व शेख निजाम विजापूरी याला मुकर्रबखान पदवी देऊन पन्हाळ्याच्या रोखाने पाठवले.
रुस्तमार खान उर्फ सर्जाखान वाई प्रांतावर चालून गेला. तिथे हंबीरराव मोहित्यांबरोबर घनासाम युद्ध झाले. सर्जाखानाचा पराभव झाला. मराठ्यांना भरपूर लूट मिळाली पण स्वराज्याच्या दुर्दैवाने हंबीररावांना गोळा लागून ठार झाले. स्वराज्याची मोठी हानी झाली.
पन्हाळा गडावर बातमी पोहोचताच संभाजी राजेंना फार दुःख झाले. काळ कोणासाठी थांबत नाही. महादजी पानसांबळेची सेनापतीपदी नेमणूक करण्यात आली. संताजी कर्नाटकाच्या मोहिमेवरून परत आले होते. हंबीररावांच्या निधनानंतर बहिर्जी व मालोजी दोघे बंधू पन्हाळ्यावर परतले.
तिघेही बंधू गप्पा, मसलत करु लागले. विचारांती छत्रपती संभाजी राजेंनी विशाळगडावर राहणेच योग्य ठरले. कोकणात शिर्केंनी स्वराज्यविरुद्ध उठाव केला. इकडे मुकर्रबखान यायला निघालाय. मोगलांचा रायगडापेक्षा पन्हाळगडाकडे जास्त रोख आहे.
मोगलांच्या कारवायांनी महाराणी येसूबाई धास्तावल्या असल्या तरी तिथे सूर्याजी पिसाळ आहेत. ते शूर आहेत, पण ते कचखाऊ असून त्यांच्या ओढा शिर्क्यांकडे जास्त आहे. रायगड स्वराज्याची राजधानी. तिथला किल्लेदार सुद्धा तितकाच तडफेचा हवा. अशा अडचणीच्या वेळी त्यांना बदलणे पण धोक्याचे ठरू शकते. त्यात महाराज राजाराम महाराजांना युद्धाचा जास्त अनुभव नाही. रायगडावर असलेल्या राणीवसाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
तिघेही घोरपडे बंधू स्वराज्याच्या हिताच्या व संरक्षणाच्या गोष्टी करत असतांनाच म्हाळोजी बाबा येऊन म्हणाले, छत्रपती संभाजी राजे कोकणातला शिर्क्यांचा उठाव मोडून रायगडी जाण्याचा निर्णय घेतला. सोबत तुम्हा तिघा भावांना घ्यायचे म्हणाले. पन्हाळा, सेनापती पानसांबळे महादजी सांभाळतील.
छत्रपती संभाजी राजे कवी कलश आणि म्हाळोजी घोरपडे एका तुकडीसह संगमेश्वरी आले. या तुकडीत संताजी, बहिर्जी, मालोजी घोरपडे बंधू होते. कोकणातील शिर्केचे परिपत्य करण्यासाठी संभाजी राजे कोकणात आल्याचे कळताच, शिर्केंनी मोगलांकडे मदत मागितली. औरंगजेबला आयतीच चांगली संधी मिळाली. त्याने शेख निजाम बरोबर मोठी फौज देऊन शिर्क्यांच्या मदतीला पाठवले. त्याचे काही सैन्य प्रभावळी प्रांती थांबवले आणि काही सैन्य घेऊन शिर्क्यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वराच्या जवळ पोहोचले. संभाजीराजेंना बिलकुल कल्पना नव्हती. शेख निजामने आघाडीला फारच थोडी फौज पाठवली. इतक्या कमी फौजेचा समाचार घेण्याइतपत सैन्य म्हाळोजींच्या तुकडीत होते. स्वतः संभाजी राजेंनी संगमेश्वर पासून दीड मैल अंतरावर असलेल्या मोगलांच्या तुकडीवर हल्ला केला. तेवढ्यात शेख निजामने मागे ठेवलेले अफाट सैन्य एकदम पुढे आणले. प्रसंग मोठा आणीबाणीचा होता. एवढ्या अफाट सैन्यापुढे म्हाळोजी घोरपड्यांच्या सैन्याचा टिकाव लागणे शक्य नव्हते. तरीसुद्धा त्यांनी मोठ्या निकराने लढा जारी ठेवला. मराठी सैनिक खाली कोसळू लागले. कवी कलश घोड्यावरून खाली पडले. राजांना चिन्ह ठीक न दिसल्यामुळे माघार घेतली.
राजे संगमेश्वरी आपल्या मुक्कामाच्या वाड्यावर परतले. तसे निजामाला कळवण्यात आले. त्याने वाड्याला वेढा घातला. राजेंनी बराच प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण एवढ्या सैन्यापुढे ते हतबल झाले. म्हाळोजींनी त्यांना संरक्षण देण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली. शेवटी शत्रूच्या तलवारीच्या वाराने धारातीर्थी कोसळले.
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख
नमोस्तुते!
No comments:
Post a Comment