औरंगजेब पुढे म्हणाला, "संताजीने पोरवया पासूनच शिवाजीचा गनिमी कावा उचलला. शिवा जाऊन इतकी वर्ष झाली तरी, या भूमीतली चिमूटभर माती सुद्धा हाती लागत नाही."
संताजी घोरपडे दिवस-रात्र मोगलांच्या मागावर धावत होते. बिदनुर मध्ये मोगलांचा पराभव करून संताजी घोरपडे विशाळगडावर असलेल्या ताराबाईंना भेटायला जाताना कापशीला मुद्दाम मुक्काम केला. बहिर्जी व मालोजीही आले होते. बहिर्जीला गजेंद्र गडाची जहागिरी मिळाल्यामुळे त्याचा ओढा तिकडे होता. मालोजीही दत्तवाडला स्थायिक होण्याच्या विचारात होते. संताजी येताच तिन्ही बंधूंची खलबते सुरू झाली.
त्याचवेळी नारोचेही लग्न संताजींनी मोठ्या थाटात करून दिले. लक्ष्मी बहिरेवाडीच्या वाड्यात नांदायला आली. नारोचे लग्न होताच, बहिर्जी गजेंद्रगडला व मालोजी दत्तवाडला स्थायिक झाले. कापशीला घोरपडे वाड्यात फक्त त्यांच्या दोन पत्नी सोयराबाई, द्वारकाबाई आणि राणोजीचेच वास्तव्य होते.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास संताजीराव विशाल गडी पोहोचले. हुकूमतपनाह रामचंद्र सदरेवरच होते. त्यांना मुजरा करताच पंतांनी उठून त्यांना अलिंगन दिले. धनाजी जाधव ही तेथेच होते. संताजींनी बिदनूरच्या मोहिमेची सविस्तर माहिती रामचंद्र पंतांना दिली. शंकराजी म्हणाले, दक्षिणेतल्या सर्व मांडलिक राज्यांना स्वतःची जाणीव करून दिल्यामुळेच ते लढायला तयार झाले. कुमक कशी जमवली हे सांगून, संताजीराव म्हणाले, "राणी चन्नम्मा देवीचे मराठ्यांवर फार उपकार आहेत. महाराजांना तर सुरक्षित जिंजीला पोहोचवलेच, परंतु जान निसार खान विरुद्ध लढण्यासाठी आपली बंदूकधारी तुकडी आमच्या मदतीला पाठवली."
धनाजी जाधव म्हणाले, "बंदूक चालवणारे ५००० सैन्य, पायदळ असा फौजफाटा घेऊन बादशहाने सर्जाखानला साताऱ्यावर चाल करायला पाठवले. संताजीचं कर्नाटकच्या लढाईतून लक्ष काढण्यासाठी व स्वतःच्या फौजेचा बचाव करण्यासाठीच ही मोहीम आखली असावी."
रुस्तमखान साताऱ्यावर चालून आल्याची वार्ता कळताच, सेनापती संताजी आपल्या सेनेसह ते रुस्तमखानवर चालून गेले. बरोबर धनाजी जाधव, रामचंद्रपंत, शंकराजी नारायणही होते. रुस्तमखान्याने आपला मुलगा गरीब खानला ५००० सैन्य देऊन, त्याला सैन्याच्या आघाडीवर ठेवले. मोगल सैन्याच्या आघाडीला हत्ती होते. युद्धाला धडपणे तोंड लागायच्या आतच मराठ्यांच्या बंदूकधारी सैन्याने आघाडीच्या मोगल सैन्यावर गोळीबार सुरू केला. आघाडीवर असलेल्या हत्तींवर गोळ्यांचा वर्षा होताच, ते मागे फिरले व आपल्याच सैन्याला पायाखाली तुडवू लागले. हे पाहून, रुस्तमखान पुढे धावला. इतक्यात मराठ्यांच्या गजदलाने हल्ला चढवला. त्यामुळे मोगल स्वारांचे घोडे उधळले. ते काही केल्या आवरले जात नव्हते. तशाही परिस्थितीत रुस्तमखान मराठ्यांशी शौर्याने लढत होता. त्याने सर्व शक्तीनिशी मराठ्यांच्या एका तुकडीवर हल्ला केला.
या तुकडीत नेमके संताजीराव होते. मोगलांच्या हल्ल्याने मराठे सैन्य पळून जाऊ लागले. अर्थात मोगलांना चकवण्याची संताजींनी आखलेली ही गनिमी काव्याच्या चालीचा एक भाग होता. मोगलांनी पळून जाणाऱ्या मराठ्यांचा पाठलाग सुरू करताच, मराठ्यांच्या राखीव दुसऱ्या तुकडीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात अनेक मोगल सैनिक जखमी झाले. मोगली घोडे हस्तगत केले. त्यामुळे चिडलेल्या रुस्तमखाने आपला हत्ती मराठ्यांच्या अंगावर घातला. गोळीबारामुळे रुस्तमच्या कपड्यांनी पेट घेतला. रुस्तमखान बाणाने आणि गोळीबाराने जखमी अवस्थेत बेशुद्ध होऊन खाली पडला. मराठा सरदार मानाजी मोरेंनी रुस्तमला आपल्या छावणीत नेले.
रुस्तमखानचा मुलगा गरीबखानने मराठ्यांवर हल्ला केला. पण तोही काही वेळातच जखमी होऊन खाली कोसळला.
रुस्तमखानच्या छावणीत मराठ्यांची एक तुकडी घुसून त्याची मुले, बायकांना पकडून सातारच्या किल्ल्यात कैद केले. बादशहाला बातमी कळताच, त्याने तात्काळ गाझीउद्दीनखान, बहादूरखान व दिलेरखान यांना साताऱ्याला वेढा घालायची आज्ञा दिली. आणि हेही कळवले की, रुस्तम व त्याच्या दोन बायका आणि मुले मराठ्यांच्या ताब्यात आहे. त्याने आपला गुर्जबदार मीर हसनला पालखी आणि चार घोडे देऊन रुस्तमच्या बायका मुलांना आणण्यास पाठवले. त्याचबरोबर रुस्तमास निरोप पाठवला की, तुझ्या दोन्ही बायका व मुले छावणीत पोचली आहेत. तसेच तुझ्या सुरक्षेसाठी फौज तैनात करण्यात आली आहे.
इकडे रुस्तमखान १६ दिवस मराठ्यांच्या कैदेत होता. त्याच्या ४००० घोडे व आठ हत्तींचा पाडाव झाला. शिवाय एक लाख रोख रक्कम दंड द्यावा लागला. या सर्व बातम्या बादशहाला कळल्या तेव्हा, तो अतिशय चिंत्ताक्रांत झालाय. मराठ्यांच्या सेनापती संताजीने मोकळीस आलेल्या हिंदवी स्वराज्यास वाचवण्यासाठी मोगली सरदारांना पराभूत केले औरंगजेबाची झोप उडाली.....
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख
नमोस्तुते!
No comments:
Post a Comment