विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : भाग - १८

 संताजी घोरपडे : भाग - १८

रुस्तमखानवरचा प्रचंड विजय हा संताजीच्या युद्धनीतीचा विजय होता. आपल्या सैनिकांची अनेक तुकड्यात विभागणी करून शत्रूला आपल्या लष्करी बळाची थोडीही कल्पना येऊ न देता, एका तुकडीने घाबरवण्याचा अभिनय करून पळ काढायचा व बेसावध शत्रूवर दुसऱ्या तुकडीने हल्ला चढवायचा. शत्रू कचाट्यात सापडला की, सर्व बाजूने तुटून पडायचे, असा ते गनिमी काव्याचा वापर करायचे. संताजींची जाधवांशी भेट झाल्यावर पुढील मनसुबे ठरवण्यात आले. धनाजी म्हणाले, "संताजी, मराठ्यांची ताकद वाढते आहे. बादशहाच्या छावणीवर हल्ला करून बादशहालाच...."

"धनाजी थोडं सबुरीने घ्यावे. किती झालं तरी, मोगल बलाढ्य आहे. आपल्याला समोरासमोर लढाई पेलणार नाही. त्याची फक्त ठाणीच उध्वस्त करायची. मोगलांनी आपले घेतलेले गड किल्ले हस्तगत करायचे. त्याशिवाय म्हणावा तेवढा भक्कमपणा येणार नाही."

"बरोबर आहे संताजी. फौजेची विभागणी करून जिथे मोगल सेनेचे प्रमाण कमी आहे, त्यावर हल्ले चढवायचे. त्यांची रसद तोडावी. वाई प्रांताकडे मी बघतो."

संताजी म्हणाले, "जिकडे विजयाची आशा आहे तिकडे चढाई करायची. जर कोणी अडचणीत सापडला तर त्याच्या मदतीला धावून जावे. फौजेत सुद्धा वाढ करावी लागेल. सरकारी खजिना रिकामा आहे. तो भरण्यासाठी जेवढी लूट मिळेल तेवढी मिळवायची. मराठ्यांचे राज्य वैभव आणि ऐश्वर्याने वाढायला हवे. मोगलांचा नायनाट करून मराठेशाहीचा वृक्ष डौलाने उभा राहीपर्यंत आपण उसंत घ्यायची नाही. शंभूराजेंच्या वधाची किंमत त्यांना चुकती करावीच लागेल. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत मोगली सत्ता समूळ नष्ट झाल्यावरच महाराजांच्या आत्म्याला शांती मिळेल."

साताऱ्यामध्ये मोघलांचा पराभव करून, संताजी धनाजीने आपली विजयी घोडदौड पुढे नेटाने सुरू केली. वाईचा कोट ताब्यात घेऊन तिथला मोगली ठाणेदार खिदमत खानास कैद केले. त्यानंतर दोघांनी मागे पाहिलेच नाही. त्यांची विजयी दौड अविरत चालूच राहिली. लष्करी दृष्ट्या महत्त्वाचे किल्ले प्रतापगड, रोहिज, राजगड, तोरणा इत्यादी जिंकून घेतले. अशा प्रकारे पन्हाळापासून ते राजगडापर्यंतचा कणा मानला गेलेला सह्याद्री पर्वतांचा प्रदेश मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला.

अवघ्या मोगल सैन्यावर धनाजी, संताजींचा दरारा पसरला. साताऱ्याच्या पूर्वेस दहा-बारा मैलावर वर्धमान किल्ल्याच्या पायथ्याशी एक मराठ्यांची छावणी होती. त्या परिसरातील मोगल ठाणेदारांनी मराठ्यांची इतकी धास्ती वाटली की मराठ्यांच्या अस्तित्वानेच खटाव ठाणेदार सिद्धी दलालखानने ठाणे टाकून पळ काढला. तो पळून गेल्याचे समजताच मराठ्यांनी ते ठाणे काबीज केले. ठाणे पूर्ण लूटले. तटबंदी काढून टाकली.

तेवढ्यात बातमी आली की, खटावच्या रक्षणासाठी मोगल सरदार मरमहतखान कुमक घेऊन औंधपर्यंत आला आहे. मराठ्यांनी तिथपर्यंत त्याची येण्याची वाट न पाहताच, त्याचा समाचार घेण्यासाठी कुच केले. पण त्याने मराठ्यांशी सामना न करता तो दुसऱ्याच मार्गाने खटावकडे आला. त्याने ठाण्याची डागडुजी केली व बंदोबस्तात राहू लागला. मराठे पुन्हा खटावकडे परतले व ठाण्याला वेढा दिला. मराठे बारा दिवस ठाण मांडून बसले. ठाण्याबाहेर पडून खानास मराठ्यांचा सामना करण्याचे धाडस झाले नाही.

मराठ्यांना धडा शिकवण्यासाठी बादशहाने आपला नामांकित सरदार रणमस्त खानला खटावकडे पाठवले. तो आल्यावर लायक व्यक्ती ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यासाठी त्याने शोध घेतला. परंतु मराठ्यांच्या दहशतीने कोणीही खटावची ठाणेदारी पत्करायला तयार नव्हता. काही दिवस खान तिथे राहून बादशहाच्या हुकमाने मसुरकडे रवाना झाला. खान निघून जाताच, मराठ्यांनी खटावचा परिसर संपूर्ण उद्ध्वस्त, ओसाड व निर्मनुष्य करून टाकला.

बादशहाने पुन्हा मसुदखानास ठाणेदार म्हणून खटावला पाठवले. तो एकटा मराठ्यांचा मुकाबला करू शकणार नाही म्हणून त्याच्या मदतीला लल्फुल्ला खान या पराक्रमी सरदारास पाठवले. तो मार्गात असतांनाच म्हसवडच्या डोंगर भागात संताजी, धनाजींनी त्याला गाठले. एकसारखा पाऊस पडत असल्यामुळे खान तिथे तळ ठेवून होता. रात्रीच्या शेवटच्या प्रहरी खानाचे सैन्य गाफील असताना, संताजी व धनाजीने खानावर हल्ला केला. खानाचा मुलगा बंदूक चालवीत त्यांना समोरा आला. वरून पाऊस व समोरून गोळ्याचा वर्षाव, त्यामुळे मराठे छावणीच्या बाजारात जीव वाचवत बोळात घुसले. तोपर्यंत सरदार मसुदखान व खुदावत खान सामोरे आले. निकराची लढाई झाली.

नंतर लल्फुल्ला खान खटावकडे जायला निघाला. वाटेत डोंगरदर्‍यात पसरलेल्या मराठ्यांनी खानाला चहुबाजूने घेरले. डाफळे जवळ संताजी, धनाजी आपल्या तुटपुंजा सैन्यासह लढत होते. संध्याकाळपर्यंत घनघोर युद्ध सुरूच होते. रात्र होताच युद्ध थांबले.

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...