विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 6 March 2026

छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजीच्या वास्तव्यात झालेल्या महाराष्ट्रातील हालचाली....

 


छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजीच्या वास्तव्यात झालेल्या महाराष्ट्रातील हालचाली....

🚩

महाराष्ट्रिकांना इस्लामी सत्तांच्या वागणुकीचा अनुभव होता. त्या सत्तांत महाराष्ट्रिकांना राज्यव्यवहारात वाव नव्हता. तो मालोजी व शाहाजी महाराजांच्या काळात झगडून साध्य करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या काळात "हिंदवी स्वराज्या"ची उभारणी केली गेली. मोगलांनी याला विरोध केला, परंतु शिवाजी महाराजांच्या व संभाजी महाराजांच्या काळात या विरोधाला यशस्वीपणे तोंड दिले गेले. परंतु या झगड्यांत मोगली सत्तेखाली हिंदूंचे सामाजिक व धार्मिक बाबतींत कसे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात होते. व जिजिया कर, देवदेवळाच्या निःपाताचे सत्र कसे चालू होते याची प्रजेस जाणीव झाली. त्यामुळे स्वराज्यात स्वातंत्र्य उपभोगलेल्या कर्त्या मानवांना तीव्र संवेदना होऊ लागल्या. परंतु राष्ट्रद्रोही कटांनी केलेल्या उठावाने औरंगजेबाला न आवरणारा शत्रू म्हणजे संभाजी महाराज यांना पकडून कैद करणे सोपे गेले. दुष्काळामुळे व प्लेग व इतर रोगांनी मोगली सेनेला फार मोठा धक्का बसला होता तरी औरंगजेबाच्या अफाट सैन्यापुढे राष्ट्रद्रोही कटवाल्यांनी द्रव्य व सैन्य यांचा पाठपुरावा न केल्यामुळे त्यांच्या अभावी, अवघ्या सहासात महिन्यात, गड, कोट व परगण्यांचे हवालदार सुभेदार हवालदील झाले. त्यामुळे त्यांच्या या परिस्थितीचा फायदा घेऊन मोगलाने त्यास कौल देऊन आपल्या चाकरीत मिळविले. त्यामुळे शिवाजी संभाजीचे सर्व "हिंदवी स्वराज्य” औरंगजेबाला पादाक्रांत करता आले. मात्र स्वार्थासाठी मोगली चाकरीत गेलेल्यांना व स्वराज्यावर निष्ठा बाळगणाऱ्यांना मोगली सत्तेखाली वावरण्यात फार अपमानकारक वाटत होते. स्वराज्यनिष्ठेवर व स्वराज्यातील सामाजिक व धार्मिक स्वातंत्र्याला भुकेले लोक होते त्यांनी राजाराम महाराज जिंजीला जाताच, रामचंद्रपंतांवर विश्वास नसल्याने, थेट जिंजीपर्यंतचा प्रवास स्वीकारला व महाराजांकडून मोगलाने घेतलेला मुलूख परत मिळविण्याच्या कार्यात स्वतंत्रता मिळविली व जमावाच्या साह्यासाठी आपली जुनी इनामे परत घेतली....

छत्रपती राजाराम महाराजांनी ती दिली इतकेच नव्हे तर त्यांना अधिक उत्तेजित करण्याकरिता त्यांनी केलेल्या वसूलीचा विषयही त्यांनी राजाचे बक्षिस म्हणून घ्यावे असे सांगितले. ही मंडळी देशी येऊन मोगली सत्ता उधळू लागली. मोगलाच्या अफाट सैन्याला तोंड देण्याचा संभाजीमहाराजांनी घालून दिलेला धडा पुढे चालू केला आणि मोगली जबरदस्त सैन्याची जरब येताच दूर पळून जावे, लुटालूटीत किंमतवान माल लपवून ठेवावा व सैन्य परतताच पुन्हा आपला मुलूख कबज करून घ्यावा असा क्रम सुरू केला. या उपक्रमाला यश येते असे पाहून मोगली चाकरीत शिरलेले सरदार हवालदारादिही आपल्या जहागिरी आपल्या ताब्यात ठेवता येतील असे समजून मोगली चाकरी सोडून राजाराम महाराजांच्या सेवेत येऊ लागले. स्थानिक लोकांच्या या बंडाळीला आपल्या सैन्याकडून पायबंद घालणे अशक्य होऊन बसल्याची जाणीव औरंगजेबास झाली. तरी देखील प्रदेश घेणे, गड कोट किल्ले कबज करणे शक्य होईल या आशेने त्याने गडकोट घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा विचार पुढे येईलच. या स्थानिक लोकांच्या हालचालीने राजद्रोही कटवाल्यांचे प्राबल्य कमी झाले...

रामचंद्रपंतांकडील सचिवपद दूर होऊन कारभाराचे क्षेत्रही मर्यादित केले गेले. उलट शंकराजी नारायणाला पुन्हा सचिवपद मिळाल्याने व मोठे दगदगीचे क्षेत्र त्याच्या ताब्यात दिले गेल्याने त्याने स्वराज्याचा फार मोठा भाग मोगली सत्तेखालून लोकसाह्याने सोडविला, मात्र जिंजीचे राज्य विना-लढा मोगलाचे हवाली करून राजाराम महाराजांस महाराष्ट्रांत परतावे लागले व आपल्या कारभारातील वागणुकीत इष्ट असा फेरबदल करणे भाग झाले...

आतापर्यंत जी देशी व परदेशीय साधने उपलब्ध झालेली आहेत त्यावरून तत्कालीन समय हालचालींचा तपशील मिळत नाही हे जरी खरे असले तरी ती तत्कालीन वास्तवबोधी चित्राची कल्पना देण्यास समर्थ आहेत. कित्येकांनी स्वराज्य निष्ठेने आपल्याच हिंमतीवर भर देऊन मोगलास तोंड दिले तर कित्येकांनी जहागिरी इनामती परत खर्चासाठी मिळवून त्यांच्या साह्याने जमाव करून आपला इनामी प्रदेश सोडवून घेतला, तर कित्येकांनी आपणहून जाऊन इतरांना मदत करून स्वराज्यनिष्ठा विशेषत्वाने दाखविली. या हालचालींत कित्येकांना प्राण गमवावे लागले आणि राजाराम महाराजांना त्यांच्या बायकामुलांच्या जीवनासाठी तरतूद करून द्यावी लागली. सरकारचे बाजूने सेनापती संताजी धनाजी यांनी लढे दिले व मोगलास हटविले. परंतु त्यांना चंदीपर्यंतचा ससैन्य प्रवास दोनदा करावा लागल्याने त्यांच्या कार्यात बराच कालक्षेप झाला आणि ज्या चंदीच्या राज्यासाठी त्यांनी अट्टाहासाने लढा देऊन मोगलास हटविले होते ते राज्य त्यांच्या गैरहजेरीत सहजासहजी मोगलांचे हवाली झाले...

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रत्यक्ष सांस्कृतिक शिकवणुकीवरून स्वराज्याची संघटना व त्यामुळे प्राप्त झालेल्या धार्मिक व सामाजिक व्यक्तिस्वातंत्र्याच्या ओढीने महाराष्ट्रातील जनता आपल्या लोकशाही राज्याच्या पुनर्घटनेचा प्रयत्न केवळ स्वेच्छेने करू लागली. अशी नि:स्पृह जागृतीचा फायदा घेणारी राज्य बंधारणा दुर्दैवाने महाराष्ट्रात राहिली नव्हती, तरी देखील या लोक राज्याच्या स्फूर्तीने मोगली सत्ता नामशेष होण्याच्या मार्गाला लागली. “हिंदवी स्वराज्या"ची कल्पना जाऊन मर्यादित देशीय राज्याची कल्पना वाढू लागली आणि या कल्पनेला संकुचित रूप देवून “देवा ब्राहाणांच्या राज्या"ची संघटना म्हणून प्रचार झाला. नंतर तिला जातीय स्वरूप आल्याने राज्यसंघटना पुष्कळ विस्कळीत झाली. त्यामुळे परकीय सत्तांना पुन्हा हिंदवी प्रदेश त्यांच्या साम्राज्यांत गोवून घेता आला. या सर्व आंदोलनाला छत्रपती राजारामराजे कालीन राजकारणी मंत्रीच जबाबदार होते...

• इतिहासकार : वा.सी.बेंद्रे.
• आर्टिस्ट : शेखर शिंदे.
―――――――――――――
#इतिहासकर्ते_महराट्टे #हिंदवी_स्वराज्य
#छत्रपतीशिवाजीमहाराज #छत्रपतीसंभाजीमहाराज
#छत्रपतीराजाराममहाराज #छत्रपतीथोरलेशाहूमहाराज

No comments:

Post a Comment

तळेगावच्या लढाईत मराठ्यांचा इंग्रजांवर दणदणीत विजय..!!

  तळेगावच्या लढाईत मराठ्यांचा इंग्रजांवर दणदणीत विजय..!! अठराव्या शतकात मराठे आणि इंग्रज यांच्यात सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला होता. मुंबईतील ...