विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 6 March 2026

छत्रपती संभाजी महाराज...

 


छत्रपती संभाजी महाराज...

🙏🏽🚩
(इतिहासकार : वा.सी.बेंद्रे).

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाचं संपूर्ण राजकारण बदललं. एवढ्या मोठ्या कर्तृत्ववान वडिलांचा मुलगा म्हटल्यावर साहजिक दोघांच्या कर्तृत्वाची बरोबरी केली जाणार, तुलना केली जाणार. ही बरोबरी, ही तुलना करताना मोठमोठे इतिहास अभ्यासकही संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांएवढं कर्तृत्ववान होत नाहीत. माझा जेवढा काही अल्प अभ्यास आहे त्यावरून किमान मला तरी अशी डावी उजवी करणारी तुलना फारशी पटत नाही. संभाजी महाराजांना उणं पुरं ३०-३२ भेटलं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते सत्तेवर आले, म्हणजे वर्षाचं आयुष्य साधारण ९-१० वर्ष ते सत्तेत होते. त्यांचा हा संपूर्ण सत्ताकाळ एकाच वेळी अनेक शाह्यांशी युद्ध करण्यात गेला. सर्वात पहिली मोहीम तर घरातल्या फितुरांना शोधून वेगळं काढण्याची होती. अशा अस्थिर वातावरणात आशिया खंडातला सर्वात मोठा बादशहा स्वतः दक्षिणेत उतरतोय, तोही संपूर्ण ताकदीनिशी...

इतिहासाची पाने चाळली असता दिसून येतं की स्वकियांशी लढून सत्तेत आलेला हा नवखा युवराज या बाजूचा विचार करता निर्वाणीच्या युद्धालाही धीरोदात्तपणे सामोरा गेलाय. आर्थिक युद्धाचा खर्च भागवण्यासाठी जनतेवर कराचा बोजा पडू नये म्हणून संभाजी महाराजांनी बऱ्याच वेळा मुघलांच्या क्षेत्रात, पोर्तुगीजांच्या क्षेत्रात धाडसी मोहिमा केल्या. अखंड युद्धजन्य परिस्थितीमध्येही इंग्रजांशी व्यापारउदीम वाढवण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांसोबत संभाजी महाराजांचा जो तह झाला तो पाहता धामधुमीचा काळ असूनही व्यापाराकडं असलेलं त्यांचं लक्ष दिसून येतं. संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांप्रमाणे रयतेची काळजी घेतली नाही असंही म्हणता येत नाही. सदरील पुस्तकातील संभाजी महाराजांचं रयत धोरण या प्रकरणात यावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला आहे. किनारपट्टीवरील रयतेला सिद्दीचा त्रास होतो म्हणून संभाजी महाराजांनी सिद्दीवर धडक मोहीम काढलेली. ज्यात त्यांनी सिद्दीला चांगलाच चोप दिला. इंग्रजांसोबतच्या तहात गुलाम करण्याविषयी आणि धर्मांतर करण्याविषयीचे कडक निर्बंध लादले. त्या वेळेस सगळेच राजे उत्तम मोबदला मिळतो म्हणून गुलामांचा व्यापार होऊ देत. अगदी स्वतःच्या राज्यातील लोकांची देखील गुलाम म्हणून विक्री होत असेल तरी त्यांना त्याची ना नसे. पण याबाबतीत संभाजी महाराजांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून गुलामबंदीचा कायदाच केला. या खेरीज ज्यावेळी संभाजी महाराजांनी इंग्रजांना वखारी बांधायला परवानग्या दिल्या. त्यावेळी वखारी या व्यापारी कामापुरत्याच राहाव्यात याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. वखारी किती लांबी रुंदीच्या असाव्यात, तिथे किती लोकं कामाला ठेवता येतील याची नियमावली घालून दिली. इंग्रजांच्या हळूहळू वाढणाऱ्या साम्राज्यविस्ताराला मारलेली मेखच होती ती. संभाजी महाराजांकडेही शिवाजी महाराजांसारखी दूरदृष्टी होती. आणि म्हणूनच जेंव्हा त्यांना जाणवलं की औरंगजेब दक्षिणेत उतरतोय तेव्हा पुढची रणनीती काय असावी याचा विचार करून त्यांनी आधीच मुघली पेठा वसूल केल्या. जेणेकरून लादल्या गेलेल्या युद्धाच्या खर्चाचा बोजा कररूपात रयतेवर पडणार नाही...

शिवाजी महाराजांप्रमाणे त्यांनीही स्वराज्यातला प्रत्येक गड जागता ठेवला. याची कितीतरी कागदोपत्री उदाहरणं सापडतात. आणि त्याचाच परिणाम म्हणजे संभाजी महाराजांच्या हयातीत आणि नंतर देखील औरंगजेबाला एक एक किल्ला घेण्यासाठी आकाश पाताळ एक करावं लागलं. प्रचंड पैसा, अफाट सेनासागर खर्ची घालूनही औरंगजेबाला आयुष्याचा संपूर्ण शेवट दक्षिणेत वणवण भटकावं लागलं. मराठ्यांशी लढता लढता अगतिक शापित अश्वत्थाम्यासारखी औरंगजेबाची गत झाली. यात संभाजी महाराजांनी दिलेल्या लढ्याचं श्रेय नाही असं म्हणणं म्हणजे इतिहासाची केलेली प्रतारणाच होईल. औरंगजेबाविरुद्ध दक्षिणी शाह्यांची एकजूट व्हावी हा शिवाजी महाराजांचा विचार संभाजी महाराजांनी पुढे नेला आणि आदिलशाही, कुतुबशाही वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला. शहाजी महाराजांप्रमाणे, शिवाजी महाराजांप्रमाणे दक्षिणेतील नायकांशी संभाजी महाराजांनी मैत्रीचे संबंध ठेवले. ज्याचा फायदा पुढे छत्रपती राजाराम महाराजांना झाला. संभाजी महाराजांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत जे निर्णय घेतले ते पाहता त्यांनी शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या कोणत्याही नियमाला हरताळ फासलाय असं अजिबात दिसून येत नाही...

● संभाजी महाराजांच्या या राजकारणाविषयी त्यावेळेस गोव्यात असलेला फादर ऑरलिन्स जानेवारी १६८५ ला लिहितो,
"संभाजी राजा आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल ठेऊन राज्यकारभार करत आहे. त्यांनी हिंदुस्तानातील राजांना वसूली भरपूर अन्नधान्य, संपत्ती साठवली आहे. ते सध्या इतका सामर्थ्यवान आहे की त्यांनी स्वतःला अल्पवयीन आदिलशहाचा पालक म्हणून नेमून घेतलं आहे. त्यांनी मुघलांवर आणि पोर्तुगीजांवर मोठे हल्ले केले आहेत..."

संभाजी महाराजांचे चरित्र म्हणजे अखंड धगधगतं अग्निकुंड होतं. संभाजी महाराजांच्या चरित्रांचा अस्सल साधनांतून अभ्यास केला असता शिवाजी महाराजांप्रमाणे त्यांचं चरित्रही समाजाला प्रेरणाच देईल यात वाद नाही. शिवाजी महाराजांप्रमाणे रयत आणि राष्ट्र डोळ्यासमोर ठेवून संभाजी महाराजांनी राज्यकारभार केला. राष्ट्रासाठी त्यांनी असीम त्याग केला. त्यांनी न डगमगता हौतात्म्य पत्करलं पण औरंगजेबाला स्वराज्याच्या चाव्या स्वाधीन केल्या नाहीत. युगपुरूष शिवछत्रपतींचा उत्तराधिकारी म्हणून ते कुठेही कमी पडले नाहीत. हे सगळं लक्षात आल्यावाचून राहत नाही. गरज आहे ती फक्त डोळस वाचनाची...!

―――――――――――――
#इतिहासकर्ते_महराट्टे #छत्रपतीशिवाजीमहाराज
#छत्रपतीसंभाजीमहाराज #गडवाटप्रवाससह्याद्रीचा
#गडकिल्ले_महाराष्ट्राचे #रणमार्तंड_महराट्टे 

No comments:

Post a Comment

तळेगावच्या लढाईत मराठ्यांचा इंग्रजांवर दणदणीत विजय..!!

  तळेगावच्या लढाईत मराठ्यांचा इंग्रजांवर दणदणीत विजय..!! अठराव्या शतकात मराठे आणि इंग्रज यांच्यात सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला होता. मुंबईतील ...