याच पन्हाळ्याने अजून एका छत्रपतींनी अनुभवला..
१६८९ शिवछत्रपतींच्या नावाने केलेली ही प्रथम लढाईत प्रचंड यश आले म्हणून तिन्ही घोरपडे बंधू सप्टेंबर १६८९ ला किल्ले पन्हाळ्यावर छत्रपती राजाराम महाराजांना मुजरा करण्यासाठी हजर झाले. संताजी घोरपडेंना ममलकतमदार म्हणजे राज्याचा आधार, त्यांचे बंधू बहिर्जी घोरपडेंना हिंदुराव तसेच मालोजी घोरपडेंना अमीरुल-उमराव व विठोजी चव्हाण ह्यांस हिंमतबहाद्दर किताब दिला. तो पर्यंत मराठ्यांची दुसरी फौज धनाजी जाधवांच्या नेतृत्वाखाली शंभूमहादेवाच्या डोंगर परिसरात रणमस्तखान व शहाबुद्दीन खान ह्यांना फटकवत होती, त्यांच्यावर यश मिळवून ते सुद्धा पन्हाळ्यावर राजारामांच्या दर्शनास आले. त्यांना जयसिंगराव हा किताब दिला. शंभूराजांच्या हत्येनंतर मराठेशाही संपली असे क्षणभरच औरंगजेबाला वाटले असेल पण मुळांत परिस्थिती उलट होती. मराठे आता त्वेषाने लढत होते आणि विजय मिळवीत होते. पन्हाळ्यावरून सूत्र हलत होती आणि म्हणूनच मुघल फौजा पन्हाळ्यावर चालून आल्या व गडाला वेढा पडला. इतिहासात हा वेढा खूप कमी लोकांना माहीत आहे...
पन्हाळा पुन्हा एकदा शत्रूच्या वेढ्यात सापडला. ह्यात एकच पर्याय होता तो म्हणजे राजाराम महाराजांनी जिंजीकडे जाऊन तिथून राज्य करावे पण प्रवास धोक्याचा होता कारण दक्षिणेत सर्वत्र मुघलांचे प्राबल्य होते. तरीसुद्धा जर राजाराम महाराज तिथे गेले तर औरंगजेबाला महाराष्ट्रात व कर्नाटकात दोन्हीकडे संघर्ष मोहिमा चालवाव्या लागतील ज्या खर्चिक व वेळकाढूपणाच्या ठरतील आणि त्याचा फायदा मराठ्यांना नक्कीच होईल. अशा बऱ्याच गोष्टी साध्य होणार होत्या...
राजाराम महाराजांचा जिंजीचा प्रवास सुरू झाला आणि बहिजींचे स्वतंत्र कर्तृत्वही लक्षात येण्याजोगे सुरू झाले. पन्हाळा ते जिंजी हा सुमारे ५०० मैलांचा प्रवास अत्यंत खडतर होता. अनेकदा मोगलांच्या फौजा चुकवण्यासाठी अधिक अवघड मार्गातून जावे लागले. वाटेत वेष बदलून काही प्रसंगी पायी प्रवास करणे भाग पडले. डोंगर, जंगले, नद्या, नाले, पाऊसपाणी, यातून वाट काढीत राजाराम महाराज आणि त्यांच्या बरोबरचे सहकारी गेले. तेव्हा कोणत्याही प्रसंगी त्यांच्यावर संकट कोसळेल अशी अवस्था होती. पण बरोबर जीवास जीव देणारे सहकारी आणि निवडक मंडळी असल्यामुळे महाराज त्या बिकट प्रवासातून निभावून जिंजीला पोहोचले. त्या निवडक मंडळीत बहिर्जी हिंदूराव यांचा महाराजांना जास्तीत जास्त उपयोग झाला...
आर्टिस्ट शेखर शिंदे.
फोटोग्राफी राहुल तारे.
―――――――――――――


No comments:
Post a Comment