विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 27 April 2026

खिळचीपूर संस्थानाची सनद..!!


 खिळचीपूर संस्थानाची सनद..!!

रतलाम आणि सैलानाप्रमाणेच माळवा प्रांतातील खिळचीपूर हे देखील एक महत्त्वाचे संस्थान होते. या संस्थानावरही शिंदे सरकारचा मोठा प्रभाव होता. १७९३ सालापासून खिळचीपूरचे संस्थान शिंदे सरकारचे मांडलिक बनले होते आणि त्यांना नियमितपणे खंडणी भरावी लागत होती.
पुढे १८१९ मध्ये खिळचीपूरचे दिवाण दुर्जन साल यांच्या मृत्यूनंतर वारसाहक्काचा वाद निर्माण झाला, तेव्हा शिंदे सरकारच्या सांगण्यावरूनच ब्रिटिशांनी यात मध्यस्थी करून हा वाद सोडवला होता. खिळचीपूर संस्थानाकडून शिंदे सरकारला बुंदी चलनात दरसाल १३,५०० रुपये टंका म्हणजेच खंडणी देणे बंधनकारक होते.
हा टंका अनेक वर्षे थेट ग्वाल्हेरच्या खजिन्यात जमा होत असे. मात्र नंतर १८४४ साली महाराज जयाजीराव शिंदे यांच्या काळात शिंदे सरकारने हा १३,५०० रुपयांचा टंका ग्वाल्हेर लष्कराच्या देखभालीसाठी ब्रिटिशांकडे वर्ग केला. १८४४ च्या सनदेनुसार जयाजीराव शिंदेंनी खिळचीपूरचे दिवाण शेर सिंग यांना हा टंका यापुढे भोपाळच्या पोलिटिकल एजंटकडे जमा करण्याचे थेट आदेश दिले होते.
यावरून हे दिसून येते की, माळवा प्रांतातील अनेक छोटी-मोठी संस्थाने मराठशाहीच्या वर्चस्वाखाली होती आणि त्यांच्या राजकीय तसेच आर्थिक घडामोडींवर शिंदे सरकारचे थेट नियंत्रण होते.
संदर्भ-
१. सी. यू. अचिसन (C. U. Aitchison), A Collection of Treaties, Engagements and Sanads, खंड ४ (Volume IV).
२. खिळचीपूर संस्थानाची माहिती आणि सनद क्रमांक XXXV, पृष्ठ क्रमांक १०५ आणि १४८.

No comments:

Post a Comment

खिळचीपूर संस्थानाची सनद..!!

  खिळचीपूर संस्थानाची सनद..!! रतलाम आणि सैलानाप्रमाणेच माळवा प्रांतातील खिळचीपूर हे देखील एक महत्त्वाचे संस्थान होते. या संस्थानावरही शिंदे ...