विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 26 July 2026

राजपूत आणि मराठा म्हणजे काय ?

 राजपूत आणि मराठा म्हणजे काय

राजपुत : १३-१४ व्या शतकापूर्वी राजपूत शब्द बघायला मिळत नाही. राजपुत किंवा रजपुत हे नाव संस्कृत शब्द राजन्य या शब्दावरून येते किंवा हे नाव राजपुत्रचा अपभ्रंश आहे असे दिसते. साधारणपणे मुसलमान भारतात येईपर्यंत कुठेही राजपुत हा शब्द जातिवाचक स्वरूपात येत नाही. मुसलमान भारतात येऊन शासक झाले आणि राज्यविस्तार करून त्यांनी तत्कालीन अनेक एतद्देशीय क्षत्रिय राजांची सत्ता संपुष्टात आणली, अनेकांना आपल्या पदरी चाकर, शिलेदार, मांडलिक राजे बनवून घेतले. त्यावेळी आजपर्यंत केवळ राज्यशकट क्षत्रिय हाकत पण आता जोडीस मुसलमान आल्यावर त्यांच्यापासून तथा इतर हिंदूंपासून वेगळेपण दर्शवायला म्हणून राजवंशीय व्यक्ती ती राजपुत्र/राजपुत/रजपुत म्हणवली जाऊ लागली. उत्तर भारतातील सतलज ते नर्मदेच्या मधील आणि राजस्थान ते साधारणतः बिहारपर्यंत विस्तृत प्रदेशात राहणाऱ्या जवळपास सर्वच क्षत्रिय लोकांचा राजपुत या नावात अंतर्भाव होता. सांस्कृतिक, भाषिक वैविध्य असले तरीही त्यांची केवळ क्षत्रिय आणि त्या अनुषंगाने राजपुत म्हणून ओळख होती.

मराठा : मराठी बोलणारे क्षत्रिय ते मराठा अशी सुटसुटीत व्याख्या आज महाराष्ट्रात मानली जाते (बाहेर गेल्यावर मराठी बोलणारे सर्वच हिंदू मराठा म्हणून विख्यात असतात असे निदर्शनास येईल). मुघल काळात उत्तरेत राजपुतांप्रमाणे दक्षिणेकडे क्षत्रिय लोकांना मराठा नामक जातीय ओळख प्राप्त झाली. त्यापूर्वी तद्देशीय क्षत्रियांना काही वेगळे नाव रूढ असल्याचे दिसत नाही.

स्रोत: क्षत्रिय


महाराष्ट्रात मुघल शासकांनी पाऊल टाकण्यापूर्वी इथे राजपुत ही विशिष्ट जात म्हणून मान्यता दिसत नाही. कित्येक उत्तर भारतीय क्षत्रिय जे तिकडे सरसकट राजपुत म्हणवले जात ते दक्षिणेकडे येऊन स्थानिक क्षत्रिय लोकांमध्ये दुधात साखर विरघळावी तसे विरघळले. मुसलमान येण्यापूर्वी उत्तरेत किंवा दक्षिणेकडेही क्षत्रियांना स्वतःची अशी विशेष ओळख सांगायची आवश्यकता नव्हती, क्षत्रिय एवढे नाव त्यांच्यासाठी पर्याप्त होते. त्याकारणाने मुसलमान येण्यापूर्वी उत्तर आणि दक्षिण भारतातील क्षत्रियांचे शरीरसंबंध झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याला मिळतील.

कैक क्षत्रिय घराण्यांचे मूळ दक्षिणेकडे आहे परंतु ते नंतर उत्तरेत गेले जसे राष्ट्रकूट/राठौड, चालुक्य/सोळंखी इत्यादि. तसेच आज महाराष्ट्रात किंवा दक्षिणेकडे असलेल्या पुष्कळ राजवंशांनी वेगवेगळ्या काळात दक्षिणेस आगमन केले जसे परमार/पवार, गुहिलोत/सिसोदिया, चौहान इत्यादि. तस्मात् कधीकाळी एकाच वंशातील व्यक्तीचे काही वंशज आज स्वतःस राजपुत म्हणवतात तर काही मराठा, जणू एकाच वृक्षाच्या विभिन्न शाखा. राजपुत म्हणजे केवळ उत्तर भारतीय आणि मराठा म्हणजे दक्षिण भारतीय, द्रविड आदि वैषम्यदर्शक समीकरणही पूर्णपणे आधारहीन आहे. या संदर्भात साताऱ्याच्या छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे पिढीजात लेखणीक/चिटणीस मल्हार राम चित्रे आपल्या सप्तप्रकारणात्मक बखरीमध्ये म्हणतात की "रजपूतराजवंश महाराष्ट्र देशी म्हराठे म्हणवितात."

आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मराठा साम्राज्याच्या जनकाच्या रूपाने बघतो त्यांच्या स्वतःच्या कुळाबाबत काय उल्लेख मिळतात ते इथे बघणे क्रमप्राप्त ठरते.

  • उत्तरेतून खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून महाराष्ट्रात आलेले आणि छत्रपतींना भेटलेले कवी भूषण आपल्या काव्यात लिहितात राजत है दिनराज को बंस अवनी अवतंस । जामे पुनि पुनि अवतरे कंसमथन प्रभू अंस ।। महावीर ता बंस मे भयौ एक अवनीस । लियौ बिरद सिसौदियौ दियौईस को सीस ।। ता कलमे नृपवृंद सब उपजे बखत बिलंद । भूमिपाल तिनमे भयौ बडौ माल मकरंद ।। म्हणजे या भूमिस आभूषण ठरणारा हा असा तुझा श्रेठ वंश पृथ्वीस शोभतो, कंसमर्दन करणाऱ्या त्या प्रभूचा अंश परत परत तुझ्या कुळात अवतार घेतो. महावीरांच्या या वंशात एक पृथ्वीपती जन्माला आला. त्यास सिसोदिया असे बिरूद मिळाले. कारण ईश्वरास त्याने आपले शिरकमल वाहिले होते. या कुळातील नृपनरेश अतिशय भाग्यवान होते त्या कुळात मालोजी नावाचा एक मोठा राजा झाला.
  • शहाजीराजे भोसले ख्रिस्ताब्द १६५६ च्या पत्रात स्वतःचा उल्लेख रजपूत असा करतात "तरी आपण रजपूत लोक अजी तलग पेशजीही दोघो चौ पादशाहित खिदमत केली."
  • शहाजीराजे भोसल्यांचा दरबारी आणि समकालीन विद्वान जयराम पिंड्ये राधामाधवविलास चंपू या ग्रंथात शहाजीराजांचे आडनाव भोसले असून वंशनाम शिसोदिया आहे असे नमूद करतो. शहाजीराजांचे उपनाम भोसले, वंश शिशोदे, वर्ण क्षत्रिय उर्फ रजपूत, गोत्र कौशिक अशी नोंद करतो.
  • शिवचरित्र अभ्यासताना विश्वसनीय मानल्या जाणाऱ्या आणि प्रत्यक्ष छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेने लिहिलेल्या सभासद बखरीतील नोंदीनुसार मिर्झाराजे जयसिंह शिवाजी महाराजांकडे निरोप पाठवताना त्यात नमूद करतात "तुम्ही शिसोदे रजपूत. आम्ही तुम्ही एकाचे एकच आहोत. तुम्ही भेटीस येणे." तसेच असेही म्हटले आहे की "राजियांचे वंशाचा शोध करिता राजे शुद्ध क्षत्रिय शिसोदे उत्तरेकडून दक्षिणेस एक घराणे आले. तेच राजीयांचे घराणे असे शोधिले."
  • सप्तप्रक्ररणात्मक चरित्रातील नोदींनुसार "शिवाजी महाराज हे उदयपूरच्या राणाजींच्या घराण्यातील शिसोदे कुळातील वंशज, पुरुष पिढ्या लावून या प्रांती हिंदुस्थानातून आले. रजपूतराजवंश महाराष्ट्र देशी म्हराठे म्हणवितात." याच बखरीनुसार स्वतःची वंशावळ आणायला शिवछत्रपतींनी स्वतः आपले लेखणीक/चिटणीस बाळाजी आवजी चित्रे यांना उदयपूरास पाठवले होते.
  • आगराच्या कैदेत असताना महाराजांना भेटलेले आंबेरचे राजपूत आंबेरच्या मंत्री कल्याणदास सिंघवीस महाराज 'खरोही राजपूत' असल्याचे सांगतात.
  • समकालीन राजज्योतिषानेही महाराजांची पत्रिका मेवाडच्या राजपूत लोकांमध्ये ठेवले आहे.
  • एका पत्रात प्रत्यक्ष छत्रपती शाहू महाराज बाजीरावांना उदयपुरच्या महाराणांशी आपला संबंध दर्शवतात.

महाराष्ट्रातून १८ व्या शतकात उत्तरेत गेलेल्या राणोजी शिंद्यांची दुसरी पत्नी आणि सुप्रसिद्ध सरदार माधवराव/महादजी शिंद्यांची आई चिमाबाई ही राजपुत होती ज्यावरून हे स्पष्ट होते की याकाळापर्यंत या उभय जातींमध्ये भिन्नतेचा भाव प्रखर नव्हता. किंबहुना आजही याच शिंदे कुळाच्या सुकन्या, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे स्वतःचा उल्लेख राजपुतांची कन्या, जाटांची सून, गुज्जरांची विहिण 

असा करतात.

इत्यर्थ एवढे स्पष्ट की राजपुत आणि मराठे हे मूलतः क्षत्रियच असून वांशिक दृष्ट्या वेगळे नाहीत. स्थलकालपरत्वे नानाविध कारणांनी त्यांना आजची ही राजपुत आणि मराठा अशी आपापसात विभागणारी जातीय ओळख मिळाली आहे. आज या जातीद्वयी विभक्त असल्याचे सांगण्याचा काही लोक जो प्रयत्न करतात त्यात काही राम नाही.

तळटीपा

[1] राजपूताने का इतिहास भाग 1 | Hindi Book | Rajputane ka Itihas Bhag 1 - ePustakalay

[2] शिवराज भूषण : Free Download, Borrow, and Streaming : Internet Archive

[3] Shivcharitra Sahitya, Vol. I, II : Bharat Itihas Sanshodhak Mandal : Free Download, Borrow, and Streaming : Internet Archive

[4] राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)

[5] Sabhasad_bakhar.pdf

[6] मराठ्यांच्या इतिहासातील दुर्मिळ १२ बखरींचा संच १ | BookVishwa

[7] Selections from the Peshwa Daftar, Vol. IX- Affairs of Northern India: Peshwa Madhavrao I., 1761-1772 : Sardesai, Govind Sakharam : Free Download, Borrow, and Streaming : Internet Archive

[8] Caste politics rules the roost in Rajasthan assembly elections 2018

No comments:

Post a Comment

मराठ्यांच्या गनिमी काव्याने हादरलेला मुघल बादशाह

  मराठ्यांच्या गनिमी काव्याने हादरलेला मुघल बादशाह इ.स. १६८१. मुघल सम्राट औरंगजेब स्वतः जवळपास पाच लाखांच्या प्रचंड सैन्यासह दख्खनमध्ये उतरल...