विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 26 July 2026

रघूजीराजें भोसले यांच्याबरोबर नागपूर प्रांतात गेलेली मराठा सरदार घराणी :



 रघूजीराजें भोसले यांच्याबरोबर नागपूर प्रांतात गेलेली मराठा सरदार घराणी :

कर्नाटकवरील स्वारी संपवून श्रीमंत रघूजी राजे भोसले सेनासाहेब सुभा हे ज्या वेळीं नागपुरास येऊ लागले, त्यावेळीं त्यांनीं आपल्याबरोबर बरेच मराठे आणिले. कारण, मराठ्यांची खरी मर्दुमकी दृष्टोत्पत्तीस येण्यास त्यांस ही लढाई म्हणजे एक अवर्णनीय लाभच असें म्हणावयास हरकत नाहीं.
कर्नाटकांत जें सैन्य गेलें होतें त्यात राजाकडील, पेशव्यांकडील, प्रतिनिधीकडील, फत्तेसिंग भोसल्यांकडील व इतरहि मराठे सरदारांकडील शिपाई गडी होते. त्या सर्वांची मर्दुमकी अनायासेंच रघूजी राजांनीं पाहिली होती. म्हणून त्यांनी शौर्यवीर्यसंपन्न मराठ्यांची घराणी बरोबर आणिलीं. प्रथम ज्यावेळीं रघूजीराजे वऱ्हाडांत आले, त्यावेळीं त्यांनी आपल्याबरोबर कोणती मंडळी आणिली होती त्याचा तपशील या मागें दिला आहे.
त्यांपैकीं मराठ्यांचीं घराणीं म्हणजे बाबाजी घाडगे झुंझारराव, संभाजी शिर्के, जानराव गुजर, नरोजी जाचक, आनंदराव वाघ, त्रिंबकराव कान्होजी मोहिते व इतर ह्या सर्वांचे वंशज आज नागपुरांत व आसपास आहेत. ह्या मंडळीखेरीज कर्नाटकाच्या स्वारीवरून परत येतांना जी शहाण्णव कुळींच्या मराठ्यांची घराणीं इकडे आणिलीं त्यांपैकीं कांहीं नावें खालीं देत आहों.
देहगांव जि० सातारा येथील नाईक निंबाळकर रिसालदार, लिंबुदचे काकडे, बारमतीचे काटे, लोणीचे भापकर, निमसाकरचे रणनवरे, मसूरचे माने, फुलंब्रीचे घाडगे, चंदीचंदावरचे भोसले, सासवाडचे जगताप, कोरेगांवचे बर्गे, तरडगांवचे गायकवाड, देऊरचे कदम, लिंबुटी माहुलीचे जाचक, कुडाळ जिल्हा सातारा येथील दत्ताजी शिंदे व खंडेराव शिंदे, या खेरीज मोहिते, खंडागळे, बागल, जाधव, बाबर, साळुंखे, चोर, खळतकर, चव्हाण, पवार, नलोडे, किरदत, बारवकर, भांडवलकर , खराडे, यादव, शिर्के, काटकर, वीर, जगदाळे, घारगे, निकम, पाटोळे, इंगळे, पोळ, पाटणकर, सनस, मानुलकर, देवकर, भोईटे वगैरे आडनावांची शूरमंडळी राजांबरोबर आली.
त्यांनीं बंगालवरील स्वाऱ्यांत अवर्णनीय पराक्रम केलेला आहे. पण दुर्दैवानें त्यांच्या स्वतंत्र मर्दुमकीचीं कागदपत्रें अस्तित्वांत नसल्यामुळे नाइलाज आहे.
आज ह्या वरील घराण्यांतील वंशज नागपूर, वर्धा, रायपूर, धमतरी, चांदा, भंडारा, जबलपुर, वऱ्हाड, बिलासपूर वगैरे जिल्ह्यांत कोणी मोकासदार, तर कोणी मालगुजार आहेत. कित्येकांस पोलिटिकल पेन्शनहि मिळत आहेत.
आमच्या माहितीप्रमाणें खळतकर ह्या घराण्यांतील श्री. रा. सा. भाऊसाहेब खळतकर व त्यांचे इतर भाऊबंद नागपूर जिल्ह्यांत आहेत. घाटगे झुंझारराव यांचे वंशज श्री. दाजीसाहेब घाटगे ऑनररी मॅजिस्ट्रेट हेहि नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत.
दत्ताजी शिंदे यांचे पुत्र खंडेराव शिंदे यांचे वंशज श्री. बापुसाहेब शिंदे हे नागपुरास असून ते पोलिटिकल पेन्शनर आहेत. त्यांच्या पूर्वजांकडे मौजा पिपरीनजीक हिंगणघाट हा गांव मोकासाहि होता. देहगांव नाईक निंबाळकर यांचे वंशज नागपूर जिल्ह्यामध्ये असून त्यांचें साताऱ्याकडील जहागिरीचें उत्पन्न त्यांस अद्यापहि मिळत आहे. नरोजी जाचक यांचे वंशज वर्धा जिल्ह्यामध्ये आहेत, गुजर घराण्यांतील श्रीमंत सरदार व्यंकटराव गुजर व श्रीमंत यशवंतराव गुजर हे एका घराण्यांतील दोन शाखांचे वंशज अस्तित्वांत असून त्यांजकडे बरीच गांवें मोकाशांचीं चालत आहेत.
श्री. अहिलोजीराव अहीररावांचें एक प्रमुख घराणें असून त्यांजकडेहि बरींच गांवें चालत आहेत.
याखेरीज झेंडेवाले नाईकांचें घराणें, लोणारचें नाईक घराण्याचे वंशज श्रीमंत गणपतराव नाईक मापारी, देशमुखांपैकीं श्रीमंत माणिकराव भोसले वगैरे बरींच घराणीं नागपुरांत आहेत.
भोसल्यांच्या बंगालवरील स्वारीच्या वेळीं जे मराठे स्वारीवर गेले होते, त्यांपैकीं बरींच घराणीं रायपूर जिल्ह्यामधील धमतरी येथें आहेत.
जगताप, बाबर, गायकवाड, किरदत वगैरे बऱ्याच घराण्यांचे मराठे येथें मालगुजारी गांवें खरेदी करून आहेत. हे मध्यप्रांतामध्ये आलेले मराठे बहुतेक सातारा, पुणें, कर्नाटक, तंजावर वगैरे भागाकडील आहेत.
बुलढाणा व वऱ्हाड भागांतीलही बरींच मराठ्यांचीं व ब्राह्मणांचीं घराणीं येथें आलेलीं आहेत.
ही सर्व मंडळी व राणोजी भोसले यांचे भाऊ संताजी भोसले व कान्होजी भोसले यांसह महाराजांच्या परवानगीनें रघूजी राजे आपल्याबरोबर घेऊन आले.
सेनासाहेब सुभे साताऱ्याहून निघाले त्यावेळीं शाहू महाराजांनीं त्यांस “सरदेशमुखीचे बाबदीची व मोकाशाची गोंडवण झाडी तहात कटक याची माफ़ी करून दिली.”

No comments:

Post a Comment

मराठ्यांच्या गनिमी काव्याने हादरलेला मुघल बादशाह

  मराठ्यांच्या गनिमी काव्याने हादरलेला मुघल बादशाह इ.स. १६८१. मुघल सम्राट औरंगजेब स्वतः जवळपास पाच लाखांच्या प्रचंड सैन्यासह दख्खनमध्ये उतरल...