छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित असलेला इंग्रज वकील – हेन्री ओक्झेडंन
इ.स. १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला इंग्रजांचा प्रतिनिधी हेन्री ओक्झेडंन (Henry Oxenden) उपस्थित होता. सुरत लुटीच्या वेळी इंग्रजांच्या वखारीचे नुकसान झाल्याने त्याची भरपाई मागणे आणि मराठे–इंग्रज यांच्यात परस्परांवर हल्ला न करण्यासंबंधी तहाची काही कलमे निश्चित करणे, या उद्देशाने तो रायगडावर आला होता.
५ जून १६७४ रोजी निराजीपंतांनी ओक्झेडंनला सांगितले की, दुसऱ्या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक असल्यामुळे छत्रपतींना मुजरा करून नजराणा अर्पण करणे उचित ठरेल. ओक्झेडंनने हा सल्ला मान्य केला.
६ जून १६७४ रोजी पहाटे राज्याभिषेकाचा मुख्य सोहळा पार पडला. महाराज सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर उपस्थितांनी त्यांना "शिवराय" या नामाभिधानाने गौरविले.
त्यानंतर मुख्यप्रधान मोरोपंत पिंगळे यांनी महाराजांच्या मस्तकावर आठ हजार होन ओतून सुवर्णस्नान घातले. मुख्य हिशेबनीस निळोपंत यांनी सात हजार होन, तर इतर दोन प्रधानांनी प्रत्येकी पाच हजार होन अर्पण केले. सर्व मानकरी सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले आणि युवराज संभाजी राजे सिंहासनाच्या पायरीवर विराजमान झाले. या भव्य सोहळ्यास सुमारे २० हजार ब्राह्मण, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
राज्याभिषेकाच्या दिवशी सकाळी सुमारे ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान हेन्री ओक्झेडंन दरबारात आला. त्याने छत्रपतींना मानाचा मुजरा केला. त्याच्यासोबत त्याचा दुभाषा नारायण शेणवी होता. शेणवींनी सूर्यप्रकाशात हिरेजडित अंगठी धरल्याने तिच्या तेजस्वी परावर्तनाकडे महाराजांचे लक्ष गेले. महाराजांनी ओक्झेडंनला सिंहासनाजवळ बोलावले. त्याने ती हिरेजडित अंगठी नजर म्हणून अर्पण केली.
सिंहासनाजवळ बराच वेळ उभा राहिलेल्या ओक्झेडंनने महाराजांचे बारकाईने निरीक्षण केले आणि त्याची नोंद आपल्या लेखनात केली. तो लिहितो—
> "शिवाजी सुमारे ४७ वर्षांचा असून देखणा होता. त्याच्या चेहऱ्यावरून त्याची बुद्धिमत्ता आणि चाणाक्षपणा सहज लक्षात येत असे. त्याचा वर्ण इतर मराठ्यांपेक्षा अधिक गोरा होता. त्याची दृष्टी तीक्ष्ण, नाक सरळ व टोकाशी किंचित बाकदार होते. दाढी निमुळती आणि मिशी विरळ होती. त्याचे बोलणे स्पष्ट, ठाम आणि जलद होते."
दरबारातून बाहेर पडताना ओक्झेडंनने दरवाजाजवळ दोन सजवलेले हत्ती पाहिले. रायगडासारख्या दुर्गम किल्ल्यावर एवढे मोठे हत्ती कसे आणले असतील, याचे त्याला मोठे आश्चर्य वाटले.
हेन्री ओक्झेडंन हा रायगडावरील राजवाड्यापासून सुमारे एक मैल अंतरावर राहत होता. त्याच्या मुक्कामाबाबत डॉ. जॉन फ्रायर यांनीही नोंदी करून ठेवल्या आहेत. गडावरील डाळ–भात आणि तुपात शिजवलेल्या भोजनाचा त्याला कंटाळा आला होता. ही बाब महाराजांच्या कानावर गेल्यावर त्यांनी तात्काळ त्याच्यासाठी बकऱ्याच्या मांसाची व्यवस्था करण्याचा आदेश दिला. ओक्झेडंन आणि त्याचे दोन सहकारी मिळून दररोज जवळपास अर्ध्या बकऱ्याचे मांस खात असत. त्यामुळे गडाखालच्या खाटिकाकडे मांसाची मागणी अचानक वाढली आणि तो स्वतः गडावर येऊन हे ग्राहक कोण आहेत ते पाहून गेला.
शेवटी तहातील बहुतेक मागण्या मान्य झाल्याने हेन्री ओक्झेडंन समाधानाने आपल्या देशाकडे परतला.
संदर्भ : 'रायगडची जीवनगाथा', महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ प्रकाशित.
No comments:
Post a Comment