श्री काळभैरव मंदिर उज्जैन आणि सुभेदार राणोजी शिंदे
उज्जैन नगरीत असलेलं काळ भैरव मंदिर प्राचिन आणि श्रद्धेचं ठिकाण आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार मराठेशाहीच्या काळात राणोजी शिंदे यांनी केली. त्यांनी या मंदिराचा विस्तार करून मजबूत दगडी बांधकाम केले आणि हे एक भव्य धार्मिक स्थळ म्हणून उभे केले. उत्तर भारतात मुघलांचे वर्चस्व संपवून मराठ्यांनी आपला धर्म आणि संस्कृती राखली, त्याचेच हे एक उत्तम उदाहरण आहे.
राणोजी शिंदे यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर उज्जैन नगरीला तिचे जुने वैभव पुन्हा मिळवून दिले. मुघलांच्या काळात दुर्लक्षित झालेल्या या पवित्र भूमीचा त्यांनी कायापालट केला. राणोजींनी श्री काळ भैरव मंदिरा सोबतच जगप्रसिद्ध श्री महाकालेश्वर मंदिराचाही भव्य जीर्णोद्धार केला. या धार्मिक कार्यासोबतच त्यांनी उज्जैनमध्ये प्रसिद्ध सिंहस्थ कुंभमेळा पुन्हा सुरू केला, ज्यामुळे या नगरीला संपूर्ण भारतात पुन्हा एकदा धार्मिक आणि सांस्कृतिक राजधानीचे स्थान मिळाले. शिंदे सरकारांनी उज्जैनमध्ये पाण्याचे घाट,मठ आणि अन्नछत्रे सुरू करून मोठ्या प्रमाणावर दानधर्म केला.
या सर्व कार्यामुळे आज संपूर्ण उज्जैन नगरीवर मराठ्यांच्या स्थापत्यकलेची आणि संस्कृतीची स्पष्ट छाप पाहायला मिळते. काळ भैरव मंदिराचे संपूर्ण बांधकाम याच मराठा शैलीत झालेले असून ते खूप सुंदर आणि देखणे आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पाहिले की लगेच लक्ष वेधून घेते. मोठे काळे दगड वापरून तयार केलेले हे द्वार एखाद्या बळकट किल्ल्याच्या दरवाजासारखे वाटते. या दरवाजाच्या दगडांवर बारीक कोरीव काम केलेले असून, त्यातून त्या काळातील कारागिरांचे कसब दिसून येते.
प्रवेशद्वारातून आत गेल्यावर देखण्या दीपमाळा पाहायला मिळतात. दिव्यांच्या रांगा लावण्यासाठी या दीपमाळांवर खास जागा कोरलेली असून त्यांचे उंच बांधकाम खूप सुंदर दिसते. मंदिराच्या प्रांगणात पायऱ्या चढून वर गेल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. मंदिराचे छत, भिंती आणि खांब यांचे बांधकाम खूप मजबूत आहे. कुठेही बडेजाव किंवा चकचकाट न करता, साधेपणातून आलेला भारदस्तपणा या वास्तूत पाहायला मिळतो. भक्कम दगड, सरळ रेषांचा वापर आणि गडद रंगछटा यांमुळे मंदिराला एक वेगळाच डौल आला आहे.
उज्जैनमध्ये काळ भैरव यांना नगरचे सेनापती मानले जाते. अनेक भाविक येथे येऊन देवाकडे प्रार्थना करतात. या ठिकाणी आल्यावर मनातील वाईट विचार दूर होतात आणि भक्तांना एक नवी मानसिक ऊर्जा मिळते, अशी लोकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर मराठ्यांच्या पराक्रमाचे आणि स्थापत्य कलेची मोठी साक्ष आहे. राणोजी शिंदे यांनी घेतलेल्या कष्टांमुळे आणि मराठ्यांच्या धार्मिक कार्यामुळेच हे मंदिर उज्जैनच्या इतिहासात आजही अतिशय मानाचे स्थान राखून उभे आहे.
#काळभैरव #मराठ्यांचा_इतिहास #राणोजी_शिंदे
#उज्जैन #महाकाल #इतिहासकर्ते #मराठा_साम्राज्य

No comments:
Post a Comment