विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 28 August 2026

पोर्तुगीज लढाई व सेनासाहेबसुभा येसाजी शिंदे

 


पोर्तुगीज लढाई व सेनासाहेबसुभा येसाजी शिंदे

शिंदे हे महाराष्ट्रातील प्राचीन कुळ आहे. चालुक्य व शिलाहार या काळापासून त्यांचा उल्लेख मिळतो. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले तेव्हा शिंदे कुळानेही पिढ्यानपिढ्या रणांगणात लढून स्वराज्याची सेवा केली.
त्यातीलच एक पराक्रमी सरदार म्हणजे सेनासाहेबसुभा येसाजी शिंदे. ते मूळचे तोरगेळ गावचे होते. दुसरे छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर गादी) यांच्या काळात ते सिंधुदुर्गचे किल्लेदार होते. छत्रपतींनी त्यांना सेनासाहिबसुभा हा किताब दिला होता. त्यांच्या बहिणी जिजाबाई यांचा विवाह खुद्द छत्रपती संभाजी महाराजांशी झाला होता.
इ.स. १७६३ मध्ये गोव्याच्या पोर्तुगीजांनी सिंधुदुर्गावर मोठा हल्ला केला. त्यावेळी मराठ्यांमध्ये अंतर्गत कलह सुरू होता. तरीसुद्धा येसाजी शिंदे यांनी किल्ल्यातील शिबंदी व समुद्रातील मराठा जहाजांच्या मदतीने शत्रूला तोंड दिले. सिंधुदुर्गच्या तोफखान्याचा प्रभावी वापर करून त्यांनी पोर्तुगीजांच्या जहाजांवर जोरदार मारा केला. या लढाईत चार ते पाचशे पोर्तुगीज ठार झाले. मोठे नुकसान सहन न करता पोर्तुगीजांना माघारी फिरावे लागले.
या विजयाची साक्ष म्हणजे महाराणी जिजाबाई यांनी येसाजी शिंदे यांना पाठविलेले पत्र. दिनांक २१ नोव्हेंबर १७६३ रोजी लिहिलेले हे पत्र असे आहे
श्री शंभू प्रा ||
श्री मन्माहाराज मातुश्री आईसाहेब याणी चिरंजीव राजश्री येसाजी सिंदे सुभेदार यासी आज्ञा केली यैसीजे. सु|| आर्बा सितैन मया व अलफ. तुम्ही विनंतीपत्र पाठविले प्रविष्ट होऊन लेखनार्थ श्रवण जाहला. साहेबाची आज्ञा घेऊन निघालो ते गुरुवारी तडीस राहोन जंजिरातील कारभारी व नाइकवडी भृगुवारी येऊन जंजिरा घेऊन गेले म्हणोन लिहिले. त्यावरून संतोष जाहला. फिरंगी गोमंतकाहून आरमारसुद्धा येऊन जंजिरासी मातवर युध केले. साहेबाच्या सेवक लोकींही त्याचा मार सोसून आपणाकडील जंजिराकडील तोफानी मारगिरी करून पाचच्यारसेहे फिरंगी मारून नेस्तनाबूद केला. तन्मुले फिरंगी कांही लबडी मार न सोसे यास्तव हतधैर्य होत्साता पलायेन संपादिले जंजिऱ्याच्या लोकास येश आले. मदुर्मिची सर्त जाहली. असा आकस्मात दंगा कधीही न जाहला. आणि या प्रमाणेंं गलिमाचे पारिपत्येही केले नाही. साहेबी दोनी हजार स्वर व पाच हजार हशम तयार करून खासा स्वारी सित्ध जाहाली. तो भवानजी कदम यासमागमे किलाची खुशालीची विनंती पत्रे आली. त्यावरून स्वारी तहकुब जाहली. पुढे फौजे रवाना केली आहे ती ही येऊन पावली असल. तीर्थरूप कैलासवासी माहाराज राजश्री-छेत्रपती याचा हात (?) जंजिरा आहे त्याजवरी गची व कोनाडा बांधोन नैव्यद्य व पूजा चाले सारिखी करणे. याविसी अंतर न करणे जाणिजे र|| छ १५ माहे जमादिलावल लेखन सीमा.
येसाजी शिंदे यांनी केवळ सिंधुदुर्गाचे रक्षण केले नाही, तर मराठ्यांचा सागरावरचा दबदबा अजून एकदा सिद्ध करून दाखवला. समुद्रात पोर्तुगीजांची ताकद मोडून काढून त्यांनी स्वराज्याचा झेंडा उंचावला.

No comments:

Post a Comment

ग्वाल्हेर दरबारचे सरदार जहागिरदार

  ग्वाल्हेर दरबारचे सरदार जहागिरदार ग्वाल्हेरचे जहागीरदार आणि सरदारांचा इतिहास खूप मोठा आहे. श्रीमंत महादजी शिंदे यांना ग्वाल्हेर आणि राजस्थ...