वाठारकर नाईक निंबाळकर घराणे
श्रीमंत नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास आणि त्यांच्या वैभवाची साक्ष देणारा वाठार निंबाळकर येथील ऐतिहासिक वाड्यांचा परिसर खरोखरच थक्क करणारा आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असणाऱ्या या गावाला भेट दिली, की कुशाजीराव नाईक निंबाळकरांनी बांधलेली भव्य उत्तराभिमुख वेस आणि देखणी प्रवेश कमान पाहूनच या घराण्याच्या राजेशाही वैभवाची प्रचिती येते. फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याचे मूळ पुरुष निंबराज पवार हे मूळचे उत्तर हिंदुस्थानातील धारानगरीचे होते. पुढे ते दक्षिणेत आले आणि त्यांनी निंबळक गाव वसवून तिथे कुलदैवत निंबजाई/निमजाई देवीची स्थापना केली.
म्हाकोजीराव हे वाठारकर नाईक निंबाळकर घराण्याचे मूळ पुरुष.म्हाकोजीरावांनंतरच्या काळात या शाखेत कुशाजी बिन संताजी नाईक निंबाळकर हा अत्यंत कर्तृत्ववान पुरुष उदयास आला.मराठेशाहीच्या उत्तरकाळातील या मातब्बर सरदाराने आपल्या राजकारणाने आणि सावकारीच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात धनसंचय केला होता. त्यांनी तत्कालीन श्रीमंत पेशवे सरकार, होळकर सरकार, पंतसचिव आणि दौलतराव महाराज शिंदे यांना लाखो रुपयांची कर्जे दिली होती. इ.स. १८०० मधे भोरच्या पंतसचिवांना मदत केल्याबद्दल त्यांनी कुशाजींना शिरवळ परगण्यातील भादे गाव इनाम दिले होते. कुशाजींच्या वंशजांनी हे वैभव आणखी वाढवले. इ.स. १८३२ च्या ताळेबंदानुसार या घराण्याच्या शिलकेमध्ये तब्बल २ अब्ज ४८ कोटी रुपयांची नोंद होती, यावरून त्यांच्या अथांग श्रीमंतीची कल्पना येते.





.jpg)



No comments:
Post a Comment