रोहिल्यांचा निर्वंश-पाटील बाबांची प्रतिज्ञा
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी मराठ्यांनी उत्तर हिंदुस्थानात आपल्या पराक्रमाची शर्थ केली. मात्र, या प्रवासात मराठ्यांना अनेक क्रूर परकीय आक्रमकांचा आणि अंतर्गत फितुरीचा सामना करावा लागला. पानिपतच्या रणसंग्रामापूर्वी दिल्लीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करणारा रोहिल्ला अफगाण सरदार नजीब उद्दौला (नजीबखान) याने मराठ्यांशी तीव्र वैर निर्माण केले होते. त्याच्याच आमंत्रणावरून अहमदशहा अब्दालीने भारतावर आक्रमण केले, ज्याच्या परिणामातून पानिपतचे भीषण युद्ध घडले आणि सव्वा लाख मराठ्यांना वीरमरण आले. या महासंहाराच्या वेळी महादजी शिंदेंनी शपथ घेतली होती की, नजीबखानाचा निरवंश करीन आणि त्याची राजधानीवरून गाढवाचा नांगर हाकीन.
नजीबखानाचा हाच मराठाद्वेषाचा वारसा पुढे त्याचा नातू गुलाम कादिर (गुलाम कादर रोहिला) याने चालू ठेवला. १७८८ च्या सुमारास गुलाम कादिरने दिल्लीवर ताबा मिळवून दिल्लीत प्रचंड धुमाकूळ घातला. त्याने लाल किल्ल्यात घुसून अमानुष अत्याचार केले, मुघल राजवाडा लुटला आणि राजघराण्यातील स्त्रियांवर अनन्वित अत्याचार केले. इतकेच नव्हे, तर त्याने वृद्ध मुघल बादशहा शाह आलम (दुसरा) याला कैद करून त्याचे डोळे काढले आणि त्याला अंध केले. गुलाम कादिरने आपल्या फितुरीला पाठिंबा मिळवण्यासाठी शाह आलमला गादीवरून हटवून अहमदशहाचा नातू बेदारबख्त याला दिल्लीच्या तख्तावर बसवले. गुलाम कादिरच्या या अमानुष क्रौर्याने संपूर्ण दिल्ली शहर थरथरले होते.
जेव्हा या भीषण अत्याचाराची बातमी मराठ्यांचे उत्तरेतील प्रमुख आधारस्तंभ आणि रणशूर सरदार महादजी शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांनी दिल्लीवर प्रचंड लष्करी चढाई केली. महादजी शिंदेंच्या फौजेने गुलाम कादिरच्या रोहिल्ला सैन्याचा पुरता बिमोड केला आणि त्याला जिवंत कैद केले. पाटील बाबांनी पानिपतच्या युद्धातील सव्वा लाख मराठ्यांच्या बलिदानाचा आणि दिल्लीतील अमानुष कृत्यांचा वचपा काढण्याचे निश्चित केले. गुलाम कादिरने बादशहाचे डोळे काढून जे जे क्रूर कृत्य केले होते, तशीच कठोर शिक्षा पाटील बाबांनी त्याला दिली. त्याचे डोळे काढण्यात आले, त्याचे अवयव छाटले गेले आणि शेवटी त्याची कातडी सोलून त्याचे मृत शरीर दिल्लीच्या वेशीवर टांगण्यात आले. नजीबखानाच्या राजधानी पात्थरगड जमीन दोस्त करून महादजींनी त्याचा वंश धुळीस मिळवला आणि पानिपतचे उसणे फेडले.
गुलाम कादिरच्या मृत्यूनंतरही त्याचे फितुरीचे अवशेष दिल्लीतून समूळ नष्ट करण्यात आले. गुलाम कादरने ज्या बेदारबख्तला तात्पुरते तख्तावर बसवले होते, त्याला आणि त्याच्या भावाला (मिर्झा हिंगा) पुढे बादशहा शाह आलम आणि मराठ्यांचे कारभारी यांच्या आदेशाने तोफेच्या तोंडी देन्यात आले आणि लाल किल्ल्यातच पुरून टाकले, जेणेकरून भविष्यात हा वंश पुन्हा डोके वर काढणार नाही.
पुढे १७९० च्या दशकात, जेव्हा मिर्झा इस्माईल बेगने मराठ्यांविरुद्ध बंड करून राजपुतांशी आणि अफगाणांशी संधान बांधले आणि त्यालाही मराठा फौजेने जेरबंद केले, तेव्हा दिल्लीच्या दरबारात पुन्हा एकदा गुलाम कादिरच्या प्रकरणाची आठवण काढली गेली. बादशहा शाह आलमची अशी तीव्र इच्छा होती की, ज्याप्रमाणे महादजी शिंदेंनी गुलाम कादिरचा कठोर बिमोड करून त्याची भयानक तंभी केली होती, तशीच कठोर शिक्षा या नव्या फितुरांनाही दिली जावी. पाटील बाबांचा हा दरारा आणि त्यांनी घेतलेला हा भीषण प्रतिशोध मराठेशाहीचे हिंदुस्थानातील वर्चस्व अधिक भक्कम करणारा ठरला.
संदर्भ:
१. दिल्ली येथील मराठ्यांचीं राजकारणें (भाग २, लेखांक १८, २९ व ३०) - हिंगणे दप्तर
२. पानिपताचा रणसंग्राम - सेतूमाधवराव पगडी





No comments:
Post a Comment