दिल्लीचा किल्लेदार मराठा सरदार खंडेराव हरी
______________________________________
एकेकाळी मराठ्यांचे अस्तित्व संपवू पाहणारी हीच दिल्ली,आज मराठ्यांच्या ताब्यात आली होती.
खंडेराव हरीसारख्या पराक्रमी सरदाराच्या हाती दिल्लीचा किल्ला देऊन महादजी शिंदेंनी खऱ्या अर्थाने ‘दिल्लीवर मराठा सत्ता’ प्रस्थापित केली.
चंद्रचूड दप्तरातील हकीकत
"राव मशारनिल्हे खंडेराव हरी दिल्लीस चंद्र ६ तारखेस दाखल झाले. पादशाहांची मुलाजमत शाहाजींनी केली व चंद्र २१ तारखेस राजश्री खंडेराव हरी ह्यांनी हजरतांची मुलाजमत केली. सा पार्चे खिलत, जेगा, शिरपेच, मोत्यांची माळ येणेप्रमाणें मशार निल्हेची व हमराई लोकांची मुलाजमत झाली. त्यांस चवदा खिलत, चार चार पार्चे इनायत जाले. राव मशारनिल्हेंनीं व लोकांनी नजरा पादशाहांस केल्या. नंतर किल्यांत चौकी पाहन्याचा बंदोबस्त करून नाजरच्या हवेलींत राहिले. किल्लेदारी यांजकडे जाल्याने पादशाहांस मोठी खुशी जाली. खंडेराव हरी सांनी दिल्लीच्या किल्याचा बंदोबस्त करून तेथे आपल्या वतीनें भवानीकुंवर यास किल्लेदारीचे काम पहाण्यास ठेविलें."
राव मशारनिल्हे खंडेराव हरी चंद्र ६ तारखेला दिल्लीला पोहोचले. पादशहाची भेट (मुलाकात) आधी शाहाजींनी घेतली आणि नंतर चंद्र २१ तारखेला खंडेराव हरी यांनी पादशहाला भेट दिली. दरबारात त्यांना सन्मान म्हणून खिलत (राजवस्त्र), जेगा (चादर), शिरपेच (मुकुट) आणि मोत्यांची माळ देण्यात आली. खंडेराव हरी व त्यांच्या सोबत्यांना एकूण १४ खिलत आणि ४–४ वस्त्र संच दिले गेले. त्यानंतर त्यांनी पादशहाला नजर (भेट) दिली.
त्यानंतर खंडेराव हरी यांनी लाल किल्ल्यात चौक्या लावून बंदोबस्त केला आणि नाजर हवेलीत वास्तव्यास राहिले. किल्ल्याची जबाबदारी खंडेराव हरी यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांनी आपल्या वतीने भवानीकुंवर याला किल्लेदार म्हणून नेमले.
महादजी शिंंदेनी नामधारी मुघल पादशहाला गादीवर ठेवून मराठ्यांनी दिल्लीचा कारभार आपल्या हातात घेतला होता. खंडेराव हरी यांच्यासारख्या विश्वासू सरदाराच्या हाती दिल्लीचा किल्ला देऊन महादजींनी राजधानीचा बंदोबस्त मजबूत केला. किल्ला आणि दरबार दोन्ही मराठ्यांच्या ताब्यात होते.
हीच दिल्ली आता मराठ्यांच्या अधिपत्याखाली आली होती...!!
संदर्भ:- चंद्रचूड दप्तर
इतिहाससंग्रह - द ब पारसनीस
.jpg)
No comments:
Post a Comment