विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 August 2026

रायाजी_शिंदे_पाटील_यांचा #वाडा_मराठ्यांच्या_इतिहासाचा_साक्षीदार

 #





रायाजी_शिंदे_पाटील_यांचा

उत्तरेत मराठ्यांची सत्ता मजबूत करण्यात मोठा वाटा उचलणारे रायाजी शिंदे पाटील हे ग्वाल्हेरकर शिंदे सरकारांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. महादजी शिंदे यांच्या उत्तर दिग्विजयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महादजींच्या सैन्यात मोठा तोफखाना आणि बलाढ्य फौज होती. राणेखान, अंबूजी इंगळे, देवाजी गवळी, खंडेराव हरी, जीवबादादा बक्षी, लाडोजी शितोळे, डीबॉईन यांच्यासोबत रायाजी शिंदे पाटील हेही शिंदेशाहीतील प्रमुख सरदारांपैकी एक होते.
शिंदेशाहीत रायाजी पाटील यांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या. इ.स. १७८५ मध्ये आग्रा मोहिमेत त्यांनी मोठा पराक्रम गाजवला. आग्रा किल्ल्यावर जरीपटका फडकावण्याची जबाबदारी महादजींनी त्यांच्यावर सोपवली होती आणि त्यांनी ती यशस्वीपणे पूर्ण केली. याच काळात रामगड हा महत्त्वाचा किल्लाही मराठ्यांच्या ताब्यात आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मराठा-शीख संबंध, राघोगडचा विजय, बुंदेलखंड, पंजाब, दिल्ली, माळवा, ग्वाल्हेर, गोहद आणि अजमेर येथील मोहिमांमध्येही रायाजी पाटील यांनी शौर्य गाजवले,
रायाजी पाटील यांना नगर जिल्ह्यातील वारी हे गाव वतन म्हणून मिळाले होते. याच वारी गावातून पंढरपूरच्या वारीची परंपरा सुरू झाली, असे मानले जाते. नाशिक, येवला, वडनेर भैरव आणि सिन्नर येथे महादजींचे सेनापती राणेखान यांची समाधी आणि वतने आहेत. वारी गावातील हे वाडे मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाचे मूक साक्षीदार म्हणून उभे आहेत. सुमारे अडीचशे वर्षांचा काळ लोटूनही या वास्तूंचे भव्य रूप पाहणाऱ्याला थक्क करून सोडते. दगडी पाया, जाड भिंती, भाजलेल्या विटांचे मजबूत बांधकाम आणि चुन्याच्या गिलाव्याने उभारलेली ही वास्तू त्या काळातील स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
वाड्यांच्या प्रवेशद्वारावरील भव्य दगडी कमानी, लोखंडी खिळ्यांनी मजबूत केलेले विशाल लाकडी दरवाजे आणि आत असलेली प्रशस्त अंगणे आजही त्या वैभवाची साक्ष देतात. काही ठिकाणी कोरीव लाकडी खांब, चौकटी, देवड्या आणि तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. अनेक भागांची पडझड झाली असली तरी उभ्या असलेल्या भिंती आणि शिल्लक राहिलेली रचना पाहताना या वाड्यांचा पूर्वीचा डौल आणि दरारा सहज डोळ्यांसमोर उभा राहतो. शेकडो वर्षे ऊन, वारा आणि पावसाचे आघात सहन करूनही या वास्तू आजही इतिहासाची पाने जिवंत ठेवत आहेत. या वाड्यांकडे पाहिले की उत्तर भारतात मराठ्यांचा झेंडा फडकवणाऱ्या त्या पराक्रमी पिढीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

No comments:

Post a Comment

मराठा साम्राज्याचा उत्तर भारतातील विस्तार – सह्याद्रीपासून दिल्लीपर्यंत मराठा सामर्थ्याची झेप

  मराठा साम्राज्याचा उत्तर भारतातील विस्तार – सह्याद्रीपासून दिल्लीपर्यंत मराठा सामर्थ्याची झेप छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पायाभर...