बापसे बेटा सवाई..
मराठा साम्राज्य केवळ रणांगणातील पराक्रमावर उभे नव्हते, तर कुशल मुत्सद्दी, वकील, चिटणीस आणि फडणवीस यांच्या बुद्धिमत्तेवरही तेवढेच भक्कम उभे होते. परराज्यांच्या दरबारात मराठ्यांची बाजू समर्थपणे मांडणारे अनेक निष्ठावान अधिकारी या साम्राज्याला लाभले. त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे गुलगुले घराणे.
महादजी शिंदे सरकारांचे बुंदी आणि कोटा येथील पहिले वकील बाळाजी यशवंतजी गुलगुले होते. आपल्या मुत्सद्देगिरी, दूरदृष्टी आणि राजकीय कौशल्याच्या बळावर त्यांनी त्या प्रदेशात शिंदे सरकारांचा मोठा प्रभाव निर्माण केला.
पुढे त्यांनी आपली वकिली आणि फडणविशीची जबाबदारी दत्तक पुत्र लालाजी गुलगुले यांच्याकडे सोपवली आणि स्वतः कामविसदार म्हणून कारभार पाहू लागले.
लालाजी गुलगुले यांनी अनेक वर्षे आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राजकारण, प्रशासन आणि दरबारी व्यवहार यांचे बारकावे आत्मसात केले होते. त्यामुळे जबाबदारी त्यांच्या हाती आल्यानंतर त्यांनी संपूर्ण कारभार अत्यंत कुशलतेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने सांभाळला. त्यांच्या कार्यकाळात शिंदे सरकारांच्या प्रशासनात कोणतीही उणीव जाणवू दिली नाही.
आपल्या चातुर्य, मुत्सद्देगिरी आणि निष्ठेमुळे लालाजी गुलगुले यांनी अल्पावधीतच शिंदे सरकारांच्या दौलतीत मानाचे स्थान मिळवले. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी वडिलांचा लौकिक अधिक उंचावत "बापसे बेटा सवाई" ही म्हण अक्षरशः खरी करून दाखवली.

No comments:
Post a Comment