जगन्नाथ पुरी रथयात्रा आणि मराठे...!!
ओडिशामधील पुरीचे जगन्नाथ मंदिर हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. मात्र या मंदिराचा आणि मराठ्यांचा एक महत्त्वाचा ऐतिहासिक संबंध आहे, याची अनेकांना माहिती नाही.
इसवी सन ११९८ मध्ये सम्राट अनंगभीमदेव यांनी हे मंदिर बांधले. पुढील अनेक वर्षे येथे नियमित पूजा आणि रथयात्रा होत होती. मात्र १५०९ मध्ये हुसेन शहा आणि १५६८ मध्ये काळापहाड यांच्या आक्रमणांमुळे मंदिराचे मोठे नुकसान झाले. या परिस्थितीमुळे पुढे अनेक वर्षे जगन्नाथाची रथयात्रा बंद राहिली.
१७५१ नंतर नागपूरकर भोसले घराण्याचे रघुजीराजे भोसले यांच्या ताब्यात ओडिशा आला. त्यांनी जगन्नाथ मंदिराच्या संरक्षणाची व्यवस्था केली. मंदिराच्या देखभालीसाठी दरवर्षी २७,००० रुपयांची तरतूद केली.
याच काळात अनेक वर्षे बंद असलेली जगन्नाथाची रथयात्रा पुन्हा सुरू करण्यात आली. रथ तयार करणे, यात्रेची व्यवस्था करणे आणि यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी मराठा प्रशासनाने आवश्यक व्यवस्था केली.
भोसले घराण्याच्या काळात जगन्नाथाला #मोहनभोग नावाचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली. ही परंपरा आजही पुरीच्या जगन्नाथ मंदिरात सुरू आहे.
मराठ्यांच्या कारकिर्दीत पुरीच्या जगन्नाथ मंदिराला संरक्षण मिळाले आणि अनेक वर्षे बंद असलेली रथयात्रा पुन्हा सुरू झाली. त्यामुळे जगन्नाथ मंदिराच्या इतिहासात मराठ्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.
ओडिशातील कोणार्कच्या सूर्य मंदिरासमोरील ऐतिहासिक अरुण स्तंभही मराठ्यांच्या कारकिर्दीत पुरीच्या श्रीजगन्नाथ मंदिराच्या सिंहद्वारासमोर आणून पुन्हा प्रतिष्ठापित करण्यात आला. हा स्तंभ आजही मराठ्यांच्या धर्मरक्षणाची साक्ष देत उभा आहे. जिथे जिथे मराठ्यांचा घोड्यांच्या टापा पोहचल्या, तिथे तिथे त्यांनी धर्माचे संरक्षण केले.हाच मराठ्यांच्या महान राष्ट्रशक्तीचा खरा परिचय आहे.

No comments:
Post a Comment