सुभेदार राणोजी शिंदे म्हणजेच शिंदे घराण्याचे संस्थापक. ते अत्यंत कर्तबगार आणि शूर सेनानी होते. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात त्यांनी स्वतःच्या बळावर बलाढ्य सैन्य उभारले आणि त्यांच्याच पराक्रमामुळे उत्तर भारतात एक प्रबळ राज्यकर्ते म्हणून शिंदे घराणे उदयास आले.
दुर्दैवाने राणोजी शिंदे यांना केवळ ४६ वर्षांचे अल्पायुष्य लाभले. मराठेशाहीत अशा अनेक महान राज्यकर्त्यांना आणि योद्ध्यांना खूप कमी आयुष्य लाभले, जे पुढे जाऊन मराठा राज्याच्या ऱ्हासाचे एक मोठे कारण ठरले. अशा वेळी मनात नेहमी विचार येतो की, जर राणोजीसारख्या पराक्रमी पुरुषांना आणखी काही वर्षांचे आयुष्य लाभले असते, तर या देशाचा इतिहास नक्कीच काहीतरी वेगळा आणि अधिक सुवर्णमय असता.
थोरले बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा यांच्या अकाली निधनाचा खूप मोठा धक्का राणोजींना बसला होता. तरीही त्या दुःखातून सावरून पुढे नानासाहेब पेशव्यांच्या काळात त्यांनी मराठादौलतीची सेवा चालूच ठेवली आणि अनेक महत्त्वाचे राजकीय निवाडे केले. पुढे शुजालपूर परगण्यातील सुलतानपूर येथे मोहिमेवर असताना, आजारपणामुळे १९ जुलै १७४५ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधन तारखेबद्दल इतिहासकारांमध्ये काही मतभेद असले, तरी ही दुःखद बातमी कळताच पेशव्यांनी कण्हेरखेड येथे असणाऱ्या त्यांच्या थोरल्या राणीसाहेब निमाबाई यांना २१ जुलै १७४५ रोजी सांत्वन करणारे पत्र पाठवले.
त्याच तारखेच्या आणखी एका ऐतिहासिक पत्रानुसार, श्रीमंत राणोजींचे ज्येष्ठ पुत्र जयाप्पा यांनी वडिलांच्या स्मारकाबद्दल काही महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सुलतानपूर येथे, जिथे राणोजीरावांचे निधन झाले, तिथे एक सुंदर स्मारक चबुतरा बांधण्यात आला. त्यानंतर त्यांची रक्षा अत्यंत आदराने उज्जैनला आणण्यात आली. तिथे पवित्र क्षिप्रा नदीच्या काठावर सर्व धार्मिक विधी करून राजघाटावर वडिलांचे भव्य आणि देखणे स्मारक उभारण्यात आले. हे कार्य पूर्ण करून जयप्पा शिंदे स्वतः घराण्याचा कारभार पाहू लागले. या मोठ्या धक्क्याच्या अवघ्या एक वर्षानंतर,राणोजींच्या मातोश्री द्वारकाबाई यांचेही कण्हेरखेड येथे निधन झाले.
आपल्या संपूर्ण आयुष्यात राणोजींनी केवळ तलवारीच्या जोरावर मुघलांचे वर्चस्व संपवले नाही, तर उत्तर भारतात हिंदू धर्म आणि संस्कृतीचे रक्षण केले. त्यांनी माळवा आणि बुंदेलखंडच्या मोठ्या मोहिमा यशस्वी करून मराठ्यांचा दरारा निर्माण केला. पराक्रमासोबतच त्यांनी धार्मिक कार्याला मोठे प्राधान्य दिले. मुघलांच्या काळात दुर्लक्षित झालेल्या उज्जैन नगरीचा कायापालट करून त्यांनी,श्री ज्योतिबा मंदिर कोल्हापूर, श्री महाकालेश्वर मंदिर आणि काळभैरव मंदिराचा भव्य जीर्णोद्धार केला, तसेच तिथला ऐतिहासिक सिंहस्थ कुंभमेळा पुन्हा सुरू केला. उज्जैनमध्ये पाण्याचे घाट, विहिरी आणि अन्नछत्रे सुरू करून त्यांनी मोठा दानधर्म केला. आज क्षिप्रा नदीच्या काठावर उभी असलेली ही छत्री उत्तर भारतात मराठेशाहीचे वैभव आणि संस्कृती रुजवणाऱ्या एका महान आणि धर्मरक्षक संस्थापकाची जिवंत साक्ष आहे.





No comments:
Post a Comment