श्रीमंत सुभेदार राणोजी शिंदे..!!
मराठा साम्राज्याच्या इतिहासात अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले. त्यापैकी एक तेजस्वी नाव म्हणजे श्रीमंत सुभेदार राणोजी शिंदे. शिंदे घराण्याचे संस्थापक, उत्तरेतील मराठा सत्तेचे आधारस्तंभ आणि आपल्या स्वकर्तृत्वाने मोठे झालेले हे थोर सेनानी. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेली प्रेरणा हीच शिंदे घराण्याच्या पराक्रमाची प्रेरणा होती. उंबरणी आणि चंदगडच्या लढायांमध्ये शिंदे वीरांनी स्वराज्यासाठी रक्त सांडले आणि हीच परंपरा पुढे अठराव्या शतकात राणोजी शिंदे यांनी समर्थपणे पुढे नेली.
इ.स. १७१६ मध्ये अवघ्या सतराव्या वर्षी राणोजी शिंदे मराठा सैन्यात दाखल झाले. छत्रपती शाहू महाराजांच्या बाजूने उभे राहून त्यांनी आपल्या शौर्य, निष्ठा आणि कर्तृत्वाच्या बळावर मराठा लष्करात मानाचे स्थान मिळवले. पुढे आपल्या लष्करी कौशल्य, मुत्सद्देगिरी आणि धाडसी मोहिमांमुळे ते मराठा साम्राज्यातील विश्वासू सरदार म्हणून ओळखले जाऊ लागले.
मराठा सरकारने त्यांच्यावर माळवा प्रांतातील चौथाई वसुलीची जबाबदारी सोपवली. मल्हारराव होळकर आणि उदाजी पवार यांच्या सोबत त्यांनी मोगल सुभेदार गिरीधर बहाद्दरचा पराभव करून माळव्यात मराठा सत्तेचा पाया अधिक भक्कम केला. इ.स. १७३५ मध्ये त्यांनी उज्जैन येथे आपले लष्करी मुख्यालय स्थापन केले. उज्जैनच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. महाकालेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार, घाटांची उभारणी आणि अनेक धार्मिक व लोकोपयोगी कामे त्यांच्या काळात झाली. पुढे राजधानी ग्वाल्हेरला गेली असली, तरी शिंदे घराण्याचा पाया उज्जैनमध्येच रचला गेला.
इ.स. १७३४ मध्ये मराठे आणि दिल्लीच्या बादशहामध्ये झालेल्या तहात बाजीराव पेशवे आपला शब्द पाळतील, याची खात्री म्हणून बादशहाने राणोजी शिंदेंवर विश्वास ठेवला होता. निजामासोबतच्या तहातही त्यांना जामीन म्हणून स्वीकारण्यात आले. मराठा सरकारच्या शिक्क्यांची जबाबदारीही त्यांच्या हाती होती. यावरून राणोजी शिंदे हे केवळ रणांगणातील शूर सेनानी नव्हते, तर विश्वासू आणि कुशल मुत्सद्दीही होते.
इ.स. १७४५ च्या १९ जुलै रोजी मध्य प्रदेशातील शुजालपूर येथे आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय अवघे ४६ वर्षे होते. त्यांच्या निधनानंतर पेशव्यांनी त्यांच्या पत्नी निमाबाई यांना सांत्वनपर पत्र पाठवले. पुढे त्यांचे ज्येष्ठ पुत्र जयप्पा शिंदे यांनी उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या तीरावर त्यांच्या स्मरणार्थ भव्य छत्री उभारली.
राणोजी शिंदे यांनी उत्तरेत मराठा साम्राज्याचा मजबूत पाया घातला. त्यांनी जिंकलेला प्रदेश, उभी केलेली व्यवस्था आणि मिळवलेला विश्वास यावरच पुढे जयप्पा शिंदे, दत्ताजी शिंदे, जनकोजी शिंदे आणि विशेषतः महादजी शिंदे यांनी मराठा सत्तेचा विस्तार केला. उत्तर हिंदुस्थानातील शिंदे घराण्याच्या वैभवाची सुरुवात राणोजी शिंदे यांच्या कर्तृत्वातूनच झाली.
सातारा जिल्ह्यातील कण्हेरखेड येथील ऐतिहासिक स्मारके आजही त्यांच्या स्मृती जपून उभे आहे. त्यांच्या कार्याचा इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
श्रीमंत सुभेदार राणोजी शिंदे यांना त्रिवार मानाचा मुजरा..!

No comments:
Post a Comment