गिरवीचे हत्तीवाले कदम सरदार घराणे....
महाराष्ट्राच्या इतिहासात स्वराज्य उभे राहत असताना अनेक मराठा घराणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यात सहभागी झाली. पुढे स्वराज्याचा विस्तार झाला आणि मराठा सरदारांची घोडदौड महाराष्ट्राबाहेर पोहोचली. याच काळात अनेक घराण्यांनी आपल्या पराक्रमाने आणि स्वामिनिष्ठेने मराठेशाहीत स्थान निर्माण केले. फलटण तालुक्यातील गिरवीचे कदम घराणे हे त्यापैकीच एक.
फलटण तालुक्यातील गिरवी हे हत्तीवाले कदम(ग्वाल्हेर)घराण्याचे मूळ गाव. गिरवी गावची पाटीलकी कदम घराण्याकडे होती. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळातील एका मजहरात गिरवी गावच्या पाटीलकीच्या वडीलपणाबाबत निवाडा झाल्याचा उल्लेख आहे.
गिरवीच्या याच कदम घराण्यातील भगवानराव कदम पुढे शिंदे सरकारांच्या सोबत उत्तर हिंदुस्थानात गेले. पानिपतच्या मोहिमेत तसेच माळवा आणि उत्तर हिंदुस्थानातील मराठ्यांच्या मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्यासोबत त्यांचे दोन पुत्र आप्पाजीराव आणि मानजीराव हेही होते.
मराठ्यांची सत्ता उत्तरेत वाढत असताना शिंदे घराण्याच्या मोहिमांमध्ये गिरवीकर कदमांचाही सहभाग राहिला. पुढे गुलाम कादिरविरुद्धच्या मोहिमेत भगवानराव कदम आघाडीच्या मोहिमेत होते. त्यांच्या कामगिरीनंतर त्यांना इलाहाबाद येथे जहागीर मिळाली. पुढे इ.स. १८०० च्या दरम्यान उज्जैन येथे भगवानराव कदम यांचे निधन झाले.
भगवानरावांच्या पश्चात त्यांचे पुत्र आप्पाजीराव कदम यांनी घराण्याची परंपरा पुढे चालवली. दौलतराव शिंदे यांच्या काळात आप्पाजीरावांना सरदारकीची वस्त्रे मिळाली. त्यामुळे गिरवीच्या कदम घराण्याचा संबंध पुढे ग्वाल्हेरच्या शिंदे दरबाराशी अधिक दृढ झाला.
ग्वाल्हेरमध्ये कदम घराण्याच्या दोन शाखाआहेत. एक डंकेवाले कदम, ज्यांची शाखा इंदरोजी कदम साप, कोरेगाव. दुसरे म्हणजे फलटण तालुक्यातील गिरवीचे कदम. या गिरवीकर कदमांना हत्ती, पालखी आणि इतर मान मिळाल्यामुळे त्यांची ओळख पुढे हत्तीवाले कदम अशी झाली.
त्या काळात सरदार घराण्याला हत्ती आणि पालखीचा मान मिळणे ही मोठी गोष्ट होती. शिंदे सरकारांच्या पदरी असलेल्या गिरवीकर कदमांना हा मान मिळाला आणि पुढे हत्तीवाले कदम हेच त्यांच्या घराण्याचे नाव रूढ झाले.
फलटणच्या मातीतून उत्तर हिंदुस्थानापर्यंत आपल्या पराक्रमाची छाप उमटविणाऱ्या गिरवीकर कदमांचा हा इतिहास मराठेशाहीतील अनेक अपरिचित घराण्यांच्या योगदानाची आठवण करून देतो.
संदर्भ:- तवारीख ए जहागीरदारान
फोटो:- १) ग्वाल्हेर येथील वाडा द्वार
२) गिरवी फलटण येथील वाडे व समाधी
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
No comments:
Post a Comment