महादजी शिंदे यांची उत्तरेतील लष्करी व्यवस्था..!
उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचे वर्चस्व केवळ युद्ध जिंकून टिकले नाही, तर त्यामागे महादजी शिंदे यांनी उभी केलेली शिस्तबद्ध लष्करी व्यवस्था होती. दिल्लीपासून आग्रा, ग्वाल्हेर आणि पंजाबच्या सीमेपर्यंत मराठ्यांचा बंदोबस्त कायम राहावा, यासाठी त्यांनी आपल्या विश्वासू सरदारांकडे जबाबदाऱ्या स्पष्टपणे सोपवल्या.
जून १७९१ मध्ये महादजी शिंदे यांनी गोपाळराव रघुनाथ यांना उत्तरेतील कारभाराची मुख्य मुखत्यारी दिली. त्यांच्या दिमतीला जिवबा बक्षी यांची फौज आणि बेनॉ द बोईन यांचे युरोपीय पद्धतीने प्रशिक्षित कंपू तैनात करण्यात आले.
महादजींच्या आदेशानुसार गोपाळराव रघुनाथ यांनी लष्करी छावणीत राहून दिल्ली, आग्रा आणि ग्वाल्हेर या प्रांतांचा बंदोबस्त सांभाळावा. त्याचबरोबर रवळोजी शिंदे यांच्यासोबत फौज पाठवून पटियाल्याकडे शिखांच्या मोहिमेची व्यवस्था करावी, असे ठरविण्यात आले होते.
"राजश्री पाटीलबावांनीं राजश्री गोपाळराव रघुनाथ यांस आपल्याकडून इकडील मुखतारीचीं वस्त्रं देऊन, राजश्री जिवबा बक्षी वैगैरे देशची फौज व डिभाई यांस कंपूसुद्धां... दिल्ली, आगरा व ग्वालेर वैगैरे प्रांतचा बंदोबस्त राखावा, आणि राजश्री रवळोजी शिंदे यांजबरोबर फौज देऊन शिखांचें पारिपत्यास पटयाल्याकडे पाठवावें..."
या पत्रावरून महादजी शिंदे यांची उत्तर भारतातील लष्करी व्यवस्था किती नियोजनबद्ध आणि व्यापक होती, याची स्पष्ट कल्पना येते.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठा साम्राज्य मोठ्या संकटात सापडले होते. अशा काळात उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचा दरारा पुन्हा निर्माण करण्याचे महान कार्य महादजी शिंदे (पाटीलबाबा) यांनी केले.
युद्धकौशल्य आणि दूरदृष्टी यांच्या बळावर महादजींनी आपल्या सैन्याची नव्याने उभारणी केली. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांनी फ्रेंच युद्धतज्ज्ञ बेनॉ द बोईन (Benoît de Boigne) यांची सैनिकी सल्लागार म्हणून नियुक्ती केली. द बोईन यांनी ग्वाल्हेरचे सैन्य युरोपीय पद्धतीने प्रशिक्षित केले आणि आधुनिक युद्धसामग्रीने सुसज्ज केले.
महादजींनी आग्रा येथे तोफांचा कारखाना उभारला आणि सुमारे सात हजार बंदुकधारी पायदळाची स्वतंत्र फौज तयार केली. या आधुनिक सैन्याच्या जोरावर उत्तर भारतात मराठ्यांचा प्रभाव पुन्हा प्रस्थापित झाला. अल्पावधीतच जोधपूर, जयपूर, धौलपूर यांसारख्या प्रमुख राजपुत राज्यांना मराठ्यांचे अधिपत्य मान्य करावे लागले.
महादजी शिंदे हे धर्मसंरक्षक आणि विद्वान आश्रयदातेही होते. मथुरा मराठ्यांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. संस्कृत अध्ययनाला प्रोत्साहन देत विद्वानांना आश्रय दिला आणि शिक्षणसंस्थांची उभारणी केली.
महादजींना हिंदी, संस्कृत आणि फारसी भाषांचे ज्ञान होते. स्वतःच्या आणि राज्याच्या जमाखर्चाची नोंद स्वतः लिहिणारे ते अत्यंत शिस्तप्रिय प्रशासक होते.
संदर्भ : दिल्ली येथील मराठ्यांचीं राजकारणें (भाग २), संपादक – दत्तात्रय बळवंत पारसनीस, लेखांक ६१ (जून १७९१).


No comments:
Post a Comment