विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 28 August 2026

वसईची मोहीम आणि राणोजी शिंदे

 


वसईची मोहीम आणि राणोजी शिंदे

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याचा विस्तार पुढे मराठ्यांनी उत्तर हिंदुस्थानापर्यंत नेला. या विस्ताराच्या प्रवासात मराठ्यांनी अनेक परकीय सत्तांना आपल्या पराक्रमाची जाणीव करून दिली. मराठ्यांच्या इतिहासातील अशीच एक शर्थीची लढाई म्हणजे इ.स. १७३७ ते १७३९ दरम्यान झालेली वसईची मोहीम. कोकण किनारपट्टीवर पोर्तुगीजांनी उभारलेली जुलमी सत्ता आणि स्थानिक हिंदू जनतेवर चालवलेला अत्याचार संपवण्यासाठी मराठ्यांनी ही निर्णायक मोहीम उभारली होती.
वसईचा किल्ला हा पोर्तुगीज सत्तेचा पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात बलाढ्य किल्ला मानला जात होता. समुद्राने वेढलेला, भक्कम तटबंदी आणि प्रचंड तोफखान्याने सज्ज असलेला हा किल्ला थेट हल्ल्याने जिंकणे जवळपास अशक्य मानले जात होते. मराठ्यांनी अनेक दिवस तोफांचा मारा केला, पण किल्ला दाद देत नव्हता. अखेर किल्ल्याची तटबंदी खिळखिळी करण्यासाठी जमिनीखालून भुयार खोदून सुरुंग लावण्याची योजना आखण्यात आली. हे कार्य म्हणजे अक्षरशः मृत्यूच्या दाढेत शिरण्यासारखे होते.
अशा या अत्यंत धोकादायक मोहिमेत सुभेदार राणोजी शिंदे स्वतः पुढे सरसावले. मराठ्यांनी वसईच्या तटाखाली एकूण १० ते १२ सुरुंग तयार केले होते. त्यापैकी तब्बल ५ मोठे सुरुंग राणोजी शिंद्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शत्रूच्या प्रमुख बुरुजाखाली यशस्वीरित्या लावले.
३ मे १७३९ रोजी हे सुरुंग उडवण्यात आले.स्फोटाने किल्ल्याचा बुरुज कोसळला आणि त्या भगदाडातून मराठ्यांचे सैन्य किल्ल्यात घुसले. पोर्तुगीज सैन्याचा निर्णायक पराभव झाला आणि अखेर वसईच्या किल्ल्यावर भगवा झेंडा फडकला. पश्चिम किनारपट्टीवरील पोर्तुगीजांच्या वर्चस्वाला हा मोठा धक्का होता.
राणोजी शिंद्यांच्या या शौर्याचे कौतुक स्वतः सेनापती चिमाजीअप्पांनी केले होते. वसई विजय मिळाल्यानंतर १२ मे १७३९ रोजी चिमाजीअप्पांनी छत्रपती शाहू महाराजांना पाठवलेल्या पत्रात राणोजींच्या हिंमतीचा आणि त्यांच्या पराक्रमाचा विशेष उल्लेख आढळतो.
वसईच्या मोहिमेत राणोजी शिंदे याच बरोबर शिंदे घराण्यातील इतर अनेक वीरांनीही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. साष्टीची बखरीत गुणाजी शिंदे, मोराजी शिंदे आणि महादजी शिंदे या वीरांची नावे स्पष्टपणे उल्लेखिली आहेत. हे सर्व सरदार वसई परिसरात मोर्चे लावून पोर्तुगीजांना खिंडीत पकडण्याचे काम करीत होते.
तसेच मोहिमेच्या पूर्वतयारीदरम्यान, इ.स. १७३० च्या सुमारास, कर्णाजी शिंदे यांनी माहुली आणि माहीम परिसरात केलेल्या लष्करी हालचालींचे संदर्भही पेशवे दप्तरात सापडतात.
संदर्भ-
१. वसईची मोहीम (साष्टीची बखर संदर्भ) - यशवंत नरसिंह केळकर
२.अलिजाह बहाद्दूर महादजी शिंदे (प्रकरण पहिले, पृष्ठ ६८-७१) - डॉ.पी.एन शिंदे सर

No comments:

Post a Comment

ग्वाल्हेर दरबारचे सरदार जहागिरदार

  ग्वाल्हेर दरबारचे सरदार जहागिरदार ग्वाल्हेरचे जहागीरदार आणि सरदारांचा इतिहास खूप मोठा आहे. श्रीमंत महादजी शिंदे यांना ग्वाल्हेर आणि राजस्थ...