विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 28 August 2026

दत्ताजी शिंद्यांचा प्राणप्रिय हत्ती जवाहरगज

 


दत्ताजी शिंद्यांचा प्राणप्रिय हत्ती जवाहरगज

मराठ्यांच्या विजयी घोडदळाचे वैभव हे नेहमीच त्यांच्या पराक्रमी घोड्यांवर आधारित राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांची कृष्णा घोडी असो वा महादजी शिंदे यांची बिजली नामक घोडी, या बलाढ्य अश्वांनी संपूर्ण हिंदुस्थानभर धाव घेत मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले.
अठराव्या शतकाच्या सुरुवातीला मराठ्यांनी उत्तर भारतात आपली पकड मजबूत केली. तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून मराठ्यांनी आपल्या युद्धनीतीत काही बदल केले. त्यानुसार त्यांच्या सैन्यात हत्तींचा समावेश झाला. बल, धैर्य आणि रौद्रतेचे प्रतीक ठरलेले हे गजराज मराठ्यांच्या रणनितीत महत्त्वाची भूमिका बजावू लागले.
याच परंपरेत शिंदे घराण्याचा एक लाडका गजराज होता, ज्याचे नाव होते जवाहरगज. काळसर रंगाचा, बलदंड आणि धिप्पाड असा हा हत्ती जय्याप्पा शिंद्यांनी माळव्याच्या डोंगरात मोठ्या धाडसाने पकडला होता.
जवाहरगज जेव्हा रस्त्यावरून निघत असे, तेव्हा जणू वाटेवरचा काळा कातळच सरकत आहे की काय, असा भास व्हायचा. त्याचे पाय जमिनीवर पडताना त्याच्या गळ्यातील सोने-चांदीच्या घंटांचा आवाज सारा परिसर दणाणून सोडायचा. त्याच्या अंगावर चढवलेली जरतारी पाखर, अंबारीतील झळाळती सजावट आणि त्याच्या डोळ्यांतील तेज पाहणाऱ्याला थक्क करायचे.
राम नावाचा माहुत भल्या पहाटे उठून जवाहरगजला अगदी मायेने सजवायचा. त्याचे पाय, कपाळ आणि अंगावर सुंदर नक्षीकाम केले जाई. अंबारीतील ताम्रपट आणि मखमली सजावट सकाळच्या सूर्यकिरणात चमकून उठायची.
हा जवाहरगज दत्ताजी शिंदे यांचा अत्यंत प्राणप्रिय हत्ती होता. पानिपतच्या युद्धापूर्वी बुराडी घाटावर झालेल्या ऐतिहासिक लढाईत दत्ताजींनी याच जवाहरगजावर स्वार होऊन शत्रूशी अटीतटीचा सामना केला होता. या भीषण संघर्षात दत्ताजींना वीरमरण आले आणि रोहिल्यांनी या गजराजासह मराठ्यांची इतर युद्धसामग्री लुटली.
पण हा इतिहास इथेच संपला नाही. दत्ताजींच्या वीरमरणानंतर जेव्हा महादजींनी उत्तर भारतात पुन्हा जोरदार मोहीम काढून प्रतिशोध घेतला, तेव्हा कुंजपुरा किल्ला जिंकल्यावर हा जवाहरगज पुन्हा एकदा शिंद्यांच्या सैन्यात सुखरूप परत आला. हा हत्ती म्हणजे शिंदे घराण्याच्या वैभवाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक होता.

No comments:

Post a Comment

ग्वाल्हेर दरबारचे सरदार जहागिरदार

  ग्वाल्हेर दरबारचे सरदार जहागिरदार ग्वाल्हेरचे जहागीरदार आणि सरदारांचा इतिहास खूप मोठा आहे. श्रीमंत महादजी शिंदे यांना ग्वाल्हेर आणि राजस्थ...