मुघल बादशहाची महादजी शिंदेंना गळ – "तुम्हीच सांभाळा या साम्राज्याची सूत्रे!"..!!
महादजी शिंदे यांच्या उत्तर हिंदुस्थानातील मोहिमांमध्ये नोव्हेंबर १७८४ मधील दिल्लीतील एक भेट विशेष महत्त्वाची मानली जाते. या भेटीत मुघल बादशहा शाह आलम दुसरा यांनी महादजी शिंदे यांच्याशी अत्यंत गुप्त चर्चा केली आणि साम्राज्याची सूत्रे त्यांच्या हाती देण्याची इच्छा व्यक्त केली.
या घटनेची पार्श्वभूमी समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्या काळात शाह आलम दुसरा हा दिल्लीचा नाममात्र बादशहा होता. खरी सत्ता आणि दिल्लीचे संरक्षण मराठ्यांच्या हातात होते. मिर्झा नजफ खानच्या मृत्यूनंतर मुघल दरबारात कारस्थाने, गटबाजी आणि विश्वासघात वाढला होता. बादशहाचा स्वतःच्या सरदारांवरील विश्वास उडाला होता.
१६ नोव्हेंबर १७८४ रोजी महादजी शिंदे बादशहाच्या भेटीस गेले. दोघांमध्ये दोन-तीन घटका अत्यंत गुप्त चर्चा झाली. या बैठकीत एवढी गोपनीयता होती की मुघल शहजाद्यांनाही आत येण्याची परवानगी नव्हती.
या चर्चेत बादशहाने महादजी शिंदे यांना साम्राज्याचे रीजंट म्हणजेच साम्राज्याचे सर्वोच्च मुखत्यार आणि रक्षक पद स्वीकारण्याची विनंती केली. मुघल दरबारातील जुन्या सरदारांवर विश्वास ठेवण्यापेक्षा महादजी शिंदे यांच्या हाती कारभार सुरक्षित राहील, अशी बादशहाची धारणा होती.
ही घटना मराठा सत्तेच्या इतिहासातील मोठा टप्पा मानली जाते. एकेकाळी ज्याच मुघल दरबाराने मराठ्यांविरुद्ध मोहिमा पाठवल्या, त्याच दरबारातून आता महादजी शिंदे यांना साम्राज्याची सूत्रे सांभाळण्याची विनंती होत होती. दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचे राजकीय वजन किती वाढले होते, याचा हा महत्त्वाचा पुरावा आहे.
संदर्भ : Persian Records of Maratha History, Vol. I – Delhi Affairs (1761–1788), जदुनाथ सरकार, नोव्हेंबर १७८४, पृष्ठ १५०.

No comments:
Post a Comment