विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 29 October 2026

भामेर किल्ल्या पायथ्याच्या वेशीवरील शिलालेख

 निष्ठावंत अधिकाऱ्यांच्या किल्ल्यावर नेमणुका केलेला भामेर किल्ल्यावरील फारुकी राजवटीचा एक महत्वपूर्ण नवीन शिलालेख!!!!!!

=====================================







भामेर किल्ल्या पायथ्याच्या वेशीवरील शिलालेख ....!!!
उपलब्धि व स्थळ:- हा शिलालेख धुळे (खानदेशातील) जिल्ह्यातील, साक्री तालुक्यातील. धुळे सुरत महामार्गावरील आलेल्या भामेर किल्ल्या पायथ्याला असलेल्या एका बुरुजावर वरील भागात कोरलेला आहे. सदर शिलालेख हा कोरीव स्वरूपाचा असून सहा ओळीचा देवनागरी लिपीतील दखणी उर्दु मराठी मिश्रित भाषेत कोरलेला आहे. शिलालेख अनेक वर्ष उघड्यावर असल्याने त्यावर वातावरणाचा परिणाम झाला असून लेखातील काही अक्षरे पुसट झाली आहेत तर काही अक्षरे झिजली असून जीर्ण होत आहेत. शिलालेखाचा खडूचा छाप घेतला असता त्यावरील मजकूर अथक परिश्रम घेऊन वाचता येतो..
======================================
शिलालेखाचे वाचन :
१. मलीक मुलुक अस्करी मलीक
२. सैद अलीजी साहेब इमारत धारा-
३. गीर संवद[त] १६३४ वरषे माघा-
४. हो मास तेरघ[ख] ७ दलपती का-
५. सत २ षाईम दुवागीर कार-
६. षाना लीषत पुंजु सीलावट
अर्थ : मलिक-उल-मुल्क व अस्करी मलिक या उच्च पदस्थ पदव्या व बिरूद असलेल्या धारागीर येथील फारूखी अधिकारी सैयद अलीजी साहेब व दलपती कायस्थ या दोघां निष्ठावंताना भामेर किल्ल्यावरील कारखान्यावर (मुख्य कामावर) कायम रुजू केले किंवा त्यांची नेमणूक करण्यात आली शिलालेखात संवत १६३४ अशी कालनोंद असून, माघ महिन्याच्या ७ व्या दिवशी, म्हणजेच १५जानेवारी १५७७ बुधवार ते ३१ डिसेंबर १५८७ मंगळवार, या दरम्यान याची नेमणूक झाल्याची नोंद आढळते. या शिलालेखाच्या अखेरीस 'पुंजु सिलावट' यांचा उल्लेख असून, त्यांनी या शिलालेखाचे कोरीव काम अथवा बांधकामाशी संबंधित शिल्पकार्य केल्याचे स्पष्ट होते.
======================================
शिलालेखाचे महत्व :- भामेर किल्ल्यावर उपलब्ध हा शिलालेख फारूखी राजवटीच्या उत्तरकालीन प्रशासन, स्थापत्य व्यवस्था आणि किल्ल्यांच्या व्यवस्थापनाचा अत्यंत महत्त्वाचा समकालीन ऐतिहासिक पुरावा आहे. शिलालेखात मलिक-उल-मुल्क आणि अस्करी मलिक या उच्च प्रशासकीय पदव्या व बिरुदांचा उल्लेख आढळतो. यावरून तत्कालीन फारूखी प्रशासनात उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना विशिष्ट बिरुदे बहाल करण्याची परंपरा अस्तित्वात होती आणि शासनव्यवस्था पदानुक्रमानुसार कार्यरत होती, हे स्पष्ट होते.
शिलालेखात धारागीर येथील फारूखी अधिकारी सैयद अलीजी साहेब आणि दलपती कायस्थ या दोन निष्ठावंत अधिकाऱ्यांची भामेर किल्ल्यावरील कारखान्यावर नेमणूक झाल्याची नोंद आहे. मध्ययुगीन प्रशासनात कारखाना हा शब्द केवळ उत्पादन केंद्रासाठी नव्हे, तर किल्ल्यावरील बांधकाम, दुरुस्ती, शस्त्रसाठा, सामग्री व्यवस्थापन आणि विविध शासकीय कामकाज पाहणाऱ्या विभागासाठी वापरला जात असे. त्यामुळे या लेखातून भामेर किल्ल्यावरील प्रशासकीय रचना, अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि शासनाची कार्यपद्धती यांचा महत्त्वपूर्ण उलगडा होतो.
शिलालेखात संवत १६३४ अशी कालनोंद दिली असल्यामुळे या नियुक्तीचा काल निश्चित करण्यासाठी भक्कम आधार मिळतो. त्यामुळे भामेर किल्ल्याचा इतिहास, त्यावरील प्रशासनातील बदल आणि फारूखी राजवटीच्या उत्तरकालीन घडामोडींचा कालक्रम निश्चित करण्यास या लेखाची मोठी मदत होते.
या लेखाच्या अखेरीस 'पुंजु सिलावट' या शिल्पकाराचे नाव नोंदविण्यात आले आहे. सिलावट हा दगडी बांधकाम आणि शिल्पनिर्मितीत प्राविण्य असलेल्या कारागिरांचा समाज होता. त्यामुळे शिलालेखात शिल्पकाराचे नाव स्पष्टपणे नोंदविले जाणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. यामुळे तत्कालीन शिल्पकारांना मिळणारे स्थान, त्यांच्या कौशल्याची दखल आणि बांधकाम प्रक्रियेत त्यांचे योगदान अधोरेखित होते.
या शिलालेखातून फारूखी राजवटीतील प्रशासकीय पदनामे, अधिकाऱ्यांची नेमणूक, किल्ला व्यवस्थापन, बांधकाम विभागाची रचना, कालगणना, शिल्पकारांची परंपरा आणि तत्कालीन स्थापत्यव्यवस्थेची माहिती मिळते. त्यामुळे हा शिलालेख केवळ एका नियुक्तीची किंवा बांधकामाची नोंद नसून, फारूखी राज्यव्यवस्था, किल्ले प्रशासन, स्थापत्य इतिहास आणि मध्ययुगीन सामाजिक-प्रशासकीय रचनेचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत मौल्यवान आणि विश्वसनीय प्राथमिक ऐतिहासिक स्रोत म्हणून विशेष महत्त्वाचा ठरतो.
=====================================
गावाचे नाव :- मु.पो.भामेर ता. साक्री ,जिल्हा- धुळे
जी.पी.एस. :- N-२१.०६४५६०,E..७४.३३६००३
शिलालेखाचे स्थान :- किल्ल्या पायथ्याला असलेल्या एका बुरुजाच्या शिळेवर कोरलेला आहे
अक्षरपद्धती :- कोरीव स्वरूपाचा लेख आहे
लिपी व भाषा :- देवनागरी – लिपी , मराठी फारसी मिश्रित भाषा
प्रयोजन :- : निष्ठावंत अधिकाऱ्यांची किल्ल्याच्या कामावर नेमणूक केल्याची स्मृती जपणे.
.मिती / वर्ष :- सवंत १६३४ माघ ७ पार्थिव संवत्सर - उत्तर भारत
काळ वर्ष :- सोळावे शतक -शु ७ - १५ जानेवारी १५७७ बुधवार,व ७ - ३१ डिसेंबर १५७८ मंगळवार
राजा /कारकीर्द:- फारुकी राजवट
ग्राम नाम:- धारागीर
देवता नामः-
व्यक्तीनाम :- सैयद अलिजी, दलपती कायस्थ, पुंजू सिलावट
शिलालेखाचे संशोधक :- श्री. प्रशांत वर्मा
शिलालेखाचे वाचक :- . श्री. अनिल किसन दुधाणे.अथर्व पिंगळे ,
संक्षेप :- .पातशाह-बादशहा , आळमगीर-आलमगीर ,अमळ-अंमलदार फउजदारी-फौजदार , गोरी-घोरी , येक –एक , नउद-नव्वद
संदर्भ १.(IE V- ३५७-३५८
टीप :- सदर शिलालेख संशोधन वाचन कार्यात डॉ. शैलेंद्र भांडारे, सत्येन वेलणकर याचे विशेष सहकार्य लाभले.
=====================
@©माहिती व संकलन :- श्री अनिल किसन दुधाणे.

No comments:

Post a Comment

सवाई माधवराव पेशवा

  सवाई माधवराव पेशवा (१८ एप्रिल १७७४–२७ ऑक्टोबर १७९५). मराठेशाहीच्या पडत्या काळातील बाल पेशवा, बाळाजी बाजीरावच्या खून झालेल्या नारायणराव या ...