विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 4 November 2026

आलम गीर औरंगजेब

आजचा अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश या चार देशांची लोकसंख्या, जागतिक लोकसंख्येच्या साधारण 28% आहे. अवघ्या 300 वर्षांपूर्वी हे चारही देश एकाच विशाल साम्राज्याचा भाग होते. या साम्राज्याचा महसूल, जागतिक महसुलाच्या 1/4 होता. अशा या जगातील सर्वात शक्तिशाली साम्राज्याचा सम्राट होता, “हजरत सलामत किब्ला ई दिनों दुनिया अबुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहंमद औरंगजेब आलमगीर बादशहा ई गाझी शहेनशहा ए सल्तनत ए हिंद” ..ज्याला जग आज फक्त औरंगझेब म्हणून ओळखते. त्याच्या नावाच्या पुढच्या आणि मागच्या पदव्या, त्याच्या साम्राज्यासह गळून पडल्यात
आज 4 नोव्हेंबर. आजच्याच दिवशी 1618 मध्ये मुघल सम्राट औरंगजेब याचा जन्म झाला होता.
औरंगजेबाचा जन्म 4 नोव्हेंबर 1618 रोजी दोहादमध्ये जहांगीराच्या शासन काळात झाला. औरंगजेब शाहजहाँचा तिसरा मुलगा होता. शहाजहाँची चारही मुलं मुमताज महलपासून झाली होती. औरंगजेबाला इस्लामिक धार्मिक साहित्य तसंच तुर्की साहित्यात रुची होती. इतर मुघल राजांप्रमाणे औरंगजेबाला उत्तम हिंदी बोलता येत होतं. तसंच त्याने सुलेखनशास्त्रात प्रावीण्य मिळवलं होतं.
इतिहासकार कॅथरीन ब्राउन यांनी 'डिड औरंगज़ेब बॅन म्युझिक?' मध्ये औरंगजेबाच्या बऱ्हाणपूर भेटीचा उल्लेख आहे. औरंगजेब तिथं त्याच्या मावशीला भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो बऱ्हाणपूरच्या हिराबाई जैनाबादी हिच्या प्रेमात पडला. हिराबाई एक गायिका आणि नर्तकी होती. हिराबाई झाडावरील आंबे तोडत होती, त्यावेळी औरंगजेबानं तिला पाहिलं आणि तिच्या प्रेमात पडला. औरंगजेब तिच्या इतक्या प्रेमात होता की कधीही दारू न पिण्याची शपथ मोडण्यासाठी तो तयार झाला होता. औरंगजेब दारूचा घोट घेणारच होता पण त्याला हिराबाईनंच रोखलं. हिराबाई हिंदू होती व तत्कालीन समाजधुरींणांना शहजादा औरंगजेबाने तिच्या प्रेमात पडणे धोक्याचे वाटत होते. त्यामुळे हिराबाईला विषप्रयोगाने मारल्याचे म्हटले जाते. औरंगजेब आणि हिराबाईची प्रेमकहाणी एका वर्षात संपली. हिराबाईचं दफन औरंगाबादमध्येच झालं. या घटनेनंतर औरंगजेब अधिक कट्टर धर्मांध व क्रूर झाला असे काही इतिहासकारांचे मत आहे.
शाहजहाँच्या चारही मुलांना कमी वयातच सिंहासन मिळवण्याची ओढ लागली होती. त्याकाळात मध्य आशियातल्या पद्धतीनुसार सर्व भावांचा सत्तेवर समान हक्क असायचा. मुघल शासकसुद्धा या परंपरेचं पालन करत होते. दारा शुकोह उत्तराधिकारी व्हावा, अशी शाहजहाँनची इच्छा होती. तर औरंगजेबाच्या मते मुघल साम्राज्याचा योग्य वारस तो स्वतः होता. 1658 ला औरंगजेब आणि लहान भाऊ मुराद यानं आग्र्याच्या किल्ल्याला घेरलं होतं. त्यावेळी शाहजहाँ किल्ल्याच्या आतच होता. औरंगजेबानं किल्ल्याचा पाणीपुरवठा तोडला. काही दिवसांतच शाहजहाँनं किल्ल्याचे दरवाजे उघडले आणि स्वतःला औरंगजेबाकडे सोपवलं.यावेळी साम्राज्याची 5 भागांत विभाजन करण्याचा प्रस्ताव शाहजहाँनं ठेवला. चार भावांना चार हिस्से आणि एक हिस्सा औरंगजेबाचा मोठा मुलगा मोहम्मद सुलतान याला देण्याचा प्रस्ताव होता. तो औरंगजेबानं धुडकावला.1659 ला औरंगजेबानं दारा शुकोहला पकडून दिल्लीला आणलं. नंतर दारा आणि त्याचा 14 वर्षांचा मुलगा सिफीर शुकोह यांना खरूज झालेल्या हत्तीच्या पाठीवर बांधून दिल्लीच्या रस्त्यावरून फिरवलं.दाराचं शव हुमायूनच्या मकबऱ्यात दफन करण्यात आलं. पण, याच औरंगजेबनं नंतर स्वतःची मुलगी जब्दातुन्निसाचं लग्न दाराचा मुलगा सिफीरशी करून दिलं. औरंगजेबानं शाहजहाँला आग्र्याच्या किल्ल्यात कैदेत ठेवलं होतं. यावेळी औरंगजेबाची बहीण जहाँआरा शाहजहाँची साथ देत होती. बापाला कैदेत ठेवण्याचा फार मोठा फटका औरंगजेबाला बसला. मक्केच्या शरीफांनी औरंगजेबाला भारताचा कायदेशीर शासक मानण्यास नकार दिला. तसंच पुढे अनेक वर्षं औरंगजेबानं पाठवलेल्या भेटी मक्केत नाकारल्या जात होत्या. औरंगजेब 1679 ला दिल्ली सोडून दक्षिणेत आला. तो नंतर उत्तर भारतात परत आला नाही. शहजादा अकबर सोडून त्याचं सारं कुटूंब या काफिल्यात होतं. औरंगजेबाच्या गैरहजेरीत दिल्लीची रयाच गेली होती.
अत्यंत कर्तृत्ववान, खंदा लढवैय्या, उत्कृष्ट प्रशासक, उत्कृष्ट सैन्य संचालक, व्यक्तिगत नैतिकतेचा वस्तुपाठ, चिवट, स्वतःच्या तत्वांशी आणि हाती घेतलेल्या कार्याशी अत्यंत प्रामाणिक, दिर्घद्योगी, माणसांची प्रचंड पारख असलेला, न्यायनिष्ठुर, प्रचंड धार्मिक, काटकसरी .पण तरी या औरंगझेबाच्या कपाळी इतिहासाने काही मोठी पापं गोंदवून ठेवलीत. त्यातलं सगळ्यात मोठं पाप आहे, त्याच्या दक्खन स्वारीच्या काळात घडून आलेल्या मनुष्यहत्येचे. साधारण अंदाजानुसार औरंगझेब आणि त्याचे विरोधक दोघांचे मिळून, बारा ते पंधरा लाख सैनिक या काळात मृत्युमुखी पडले. यात जितके लढून मेले त्याहूनही अधिक विविध रोगांच्या साथीत, कधी उपासमारीने मेले.बहुदा जितके सैनिक मेले त्याच्या काही पट, नागरिक मेले असावे. दुष्काळाने, उपासमारीने, लुटालुटीने मुलुख वैराण झाला. साम्राज्य पोखरून निघालं.
एका शब्दात सांगायचं तर औरंगझेब हा राजा नव्हता, एका प्रचंड मोठ्या साम्राज्याच्या सम्राटाकडे हवा असणारा दिलदारपणा, क्षमाशीलता, औदार्य, मोकळेपणा, दया, विवेक यापैकी कोणताही गुण औरंगझेबाच्या ठायी नव्हता. औरंगझेब कदाचित उत्कृष्ट वझीर, निजाम होऊ शकला असता पण तो अत्यंत वाईट शहेनशहा होता. औरंगझेबाच्या धार्मिक कट्टरतेने त्याच्या राज्याला, त्याच्या प्रजेपासून, ज्यात त्याचे सैनिकही होते, दूर नेले. औरंगझेबाच्या धार्मिक निष्ठा या त्याच्या राजकीय निष्ठांपेक्षा बलवत्तर ठरल्या आणि मोगल साम्राज्य ज्या आधारावर तोलले होते तो आधारच खचला.
इतिहास हा नेहमी, सामाजिक आणि राजकीय प्रवाहांच्या संदर्भात अभ्यासला पाहिजे. व्यक्तींपेक्षा असा प्रवाहांचा अभ्यास जास्त वास्तववादी आणि दिशादर्शक असतो. सतराव्या शतकात, भारतीय राजकारणात दोन मोठे प्रवाह आढळतात. एक छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि दुसरा आलमगीर औरंगझेबाचा. छत्रपतींचे राजकारण एक विवेकवादी, समंजस पण तरीही खंबीर निष्ठांचे स्वरूप घेऊन समोर येते. या प्रवाहात व्यक्ती मोठी नाही तर त्या व्यक्तीने रुजवलेल्या श्रद्धा मोठ्या असतात. याच श्रद्धा सामान्य मराठी प्रजेला सत्तावीस वर्ष जगातील सर्वशक्तिमान साम्राज्याशी लढण्याचे बळ देतात. नैतृत्वापेक्षाही समाजाची जीवनमूल्ये महत्वाची मानण्याची, तानाजी पडला तरी कोंढाणा न सोडण्याची सवय, याच श्रद्धा रुजवतात. दुसरीकडे औरंगझेबाचा प्रवाह हा अतिरेकी धार्मिक निष्ठा, स्वकेंद्रित विचारसरणी, धर्मग्रंथावरील फाजील विश्वास, स्वतःच्या समजुतींभोवती फिरवत ठेवलेली मूल्यव्यवस्था या गुणांभोवती घुटमळत राहतो, स्वतःबरोबरच समाजाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरतो.आजही हे दोन्ही प्रवाह समाजात वाहत आहेत. बऱ्याचदा ते एकमेकांत मिसळून जातात, तर कधी एकमेकांच्या साथीने, समांतर वाहतात. व्यक्ती महत्वाची नसतेच, प्रवाह महत्वाचा असतो. आपण कोणत्या प्रवाहाला बळ द्यावं हे आपल्याला ठरवावं लागेल, त्यावरच आपलं आणि आपल्या पिढ्यांच भवितव्य अवलंबून आहे.
आपल्या आयुष्यातील शेवटची सत्तावीस वर्ष औरंगझेबाने, ज्या मराठी वादळाचा पाठलाग करण्यात घालवली, त्या वादळाने संपूर्ण भारत व्यापला. औरंगझेबाच्या मृत्यूनंतराचा इतिहास वाचल्यास, औरंगझेब हा प्रचंड हताश, दयनीय आणि हरलेला सम्राट वाटतो. गूढ, रहस्यमयी तितकेच साधे आयुष्य जगलेल्या औरंगजेबाचे गुप्तहेर खाते प्रबळ होते.
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर सूंर्ण दख्खन आपल्या ताब्यात घेण्यासाठी सन १६८१मध्ये औरंगजेब दक्षिणेकडे निघाला. नोव्हेंबर १६८३मध्ये तो नगरला आला. त्याच्या मोहिमेची सुरुवात खर्‍या अर्थाने येथूनच झाली. विजापूर, गोवळकोंडा काबीज केल्यानंतर बादशाहने आाला मोहरा पुन्हा मराठ्यांकडे वळवला. छत्रपती संभाजीराजांनी त्याला कडवी झुंज दिली. दुर्दैवाने राजे पकडले गेले. त्यांना हौतात्म्य आले. पण शूर मराठ्यांनी हार पत्करली नाही. गनिमी कावा वापरत धनाजी, संताजी व इतर मराठे सरदारांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले. औरंगजेबाची दक्षिणेतील मोहीम लांबल्याचा फायदा घेऊन उत्तरेत तंटे-बखेडे वाढले. रजपूत, शीख व जाटांनी बंड केलं. औरंगजेबाची मुले, नातू दिल्‍लीच्या तख्तासाठी आसुसले होते. सरदार व शिपाईही सततच्या लढायांना कंटाळले होते. घरी कधी परततो असे त्यांना झाले होते. अखेर बादशाहने परत फिरण्याचा निर्णय घेतला. ज्या नगरमधून २३ वर्षाापूंर्वी अवाढव्य सैन्यानिशी औरंगजेब मोठ्या उमेदीने बाहेर पडला होता, तो इथे परत आला तो हतबल होऊन ! दिवापूर, पेडगाव बहादूरगडमार्गे तो २० जानेवारी १७०६ रोजी नगरला आला. भिंगारच्या पूर्वेला शाही फौजेचा डेरा पडला. बादशाह असला, तरी औरंगजेब किल्ल्यात किंवा कुठल्या महालात राहिला नाही. सैन्याच्या मध्यभागी त्याचा तंबू होता. त्याचे वय तेव्हा ८८ वर्षे होते. वार्धक्याच्या जोडीला आजाराने ग्रासले होते. त्याची पत्नी उदेपुरी बेगम व अविवाहित मुलगी झिनत-उन-निस्त त्याच्याबरोबर होत्या. 
नगर आपला अखेरचा टप्पा आहे, हे बादशहाला कळून चुकले होते. मार्च १७०६मध्ये त्याची बहीण गौरह-आरा बेगम मरण पावली आणि चौदा भावंडापैकी एकटा औरंगजेब उरला. त्याच वर्षी मेमध्ये त्याची मुलगी मिहीर उन्निसा व जावई इजित बख्त, नातू बुलंदही अल्‍लाला यारा झाला. सन १७०७मध्ये त्याची आणखी दोन नातवंडे मरण पावली. या धक्वयांनी औरंगजेब पुरता खचला. मराठ्यांनी बादशाहला शेवटार्यंत स्वस्थ बसू दिले नाही. तो इथे आल्यावर चार-पाच महिन्यांनीच मराठ्याचे सैन्य नगरवर चालून आलं. नगरपासून ४ मैलांवर तुंबळ लढाई झाली. बादशाह नगर मुक्कामी असताना त्याच्या मृत्यूची अफवा उठली. रयतेत गहजब उडाला. गलितगात्र औरंगजेब तशाही अवस्थेत लोकांना शांत करण्यास सरसावला. काही अघटित घडलेले नाही याची खात्री पटावी यासाठी मंगलवाद्ये वाजवण्याचा आदेश त्याने दिला, पण त्याच वेळी त्याला आापल्या मृत्यूनंतर काय घडणार याची कल्पना आली.
जानेवारी १७०७च्या अखेरीस बादशाहची प्रकृती पार ढासळली. पण त्याने पुन्हा स्वत: कारभार पााहण्यास सुरुवात केली. आपल्या मुलांमध्ये तख्तासाठी भांडणे होणार हे ओळखून मृत्यूआधी काही दिवस म्हणजे ९ फेबुवारीला त्याने कामबक्षला विजाापूरचा सुभेदार म्हणून नेमलं, तर १३ फेबुवारीला महंमद आजमला माळव्याला पााठवलं. या दगदगीत औरंगजेबाची तब्येत आणखी बिघडली. तरीही त्याने दरबार भरवला. पााचही नमाज मशिदीत पढण्याचा हट्ट धरला. २० फेबुवारीला (तारखेबाबत संभम आहे. औरंगजेब शुक्रवारी गेल्याचे मानले तर तारीख २१ येते.) सकाळी बादशाह उठला. नमाज पढण्यासाठी जवळच्याच मशिदीत गेला. नमाज आटोपला आणि त्याची शुद्ध हरपू लागली. तो तिथेच कलंडला. हातात जपमाळ होती. सकाळी ८ वाजता बादशाहने अखेरचा श्वास घेतला.
त्याच्या इच्छेप्रमाणे वेरुळजवळच्या खुलताबाद इथं अवलिया शेख जैनुद्दिन यांच्या कबरीशेजारी त्याचं दफन झालं. बादशाहला जिथे स्नान घालण्यात आलं त्या भिंगार येथील आलमगीर परिसरात नंतर कबर बांधण्यात आली. तटबंदी असलेल्या आलमगीरमध्ये सध्या मदरसा आणि दुर्मिळ पुस्तकांचे ग्रंथालय आहे. औरंगजेबाच्या मुलीची कुराणाची प्रत तिथे आहे. जगातील एका मोठ्या सामाज्याचा प्रमुख असलेल्या बादशाहची नगरच्या भूमीत अशी अखेर झाली.
ना.स.इनामदार यांनी औरंगजेबावर ‘शहंनशाह’ नावाने कादंबरी लिहिली आहे. ही त्यांची 9 वी कांदबरी होती. त्याच्या आधीच्या 6 कादंबर्‍या छत्रपती शिवाजी महाराज तर 2 छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर लिहिल्या होत्या.
- योगेश शुक्ल ९६५७७०१७९२

आलम गीर औरंगजेब

आजचा अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश या चार देशांची लोकसंख्या, जागतिक लोकसंख्येच्या साधारण 28% आहे. अवघ्या 300 वर्षांपूर्वी हे चा...