विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 6 September 2026

#पवार #घराण्याची #उपनावे...


 #पवार #घराण्याची #उपनावे...

प्रथम मुलूखगिरी करताना काही खिताब (पदवी) मिळाले त्या पुढे तेच खिताब आडनाव म्हणून रुजू झाले.
१) महिपतराव २) विश्वासराव ३) मुकूटराव ४) औषधराव ५)झुंझारराव ६) धारेराव ७) धारकर.. ८) सरपाटिल
१)आरफळकर - संत ज्ञानेश्वर अन संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळाचे मालक हैबतबाबा अरफळकर मूळचे धार पवार ग्वाल्हेरचे शिंदे सरदार यांच्या सोबत कामगिरीवर असणारे हैबतबाबा हे सातारा मधील आरफळ गावचे. श्रीमंत शितोळे सरकारांच्या मदतीने आजच्या पालखी सोहळ्याचे लष्करी स्वरूप सरदार हैबतबाबा अरफळकर यांनी दिले.
२) निंबाळकर - फलटणचे प्रसिद्ध असलेले राजघराणे मूळचे धार पवार आहे. मूळ पुरुष निंबराज पवार यांनी वसवलेल्या निंबळक गावावरून निंबाळकर उपनाव प्राप्त झाले. थोरल्या महाराणी सईबाईसाहेब याच निंबाळकर घराण्यातील.
३) विश्वासराव - हे शिवपूर्व व शिवकाळातील प्रसिध्द धार पवार घराणे. नगरदेवळे येथील पवार घराणे तसेच कोकणात राजापूर येथे कुरंग कोंडगे येथें तर पनवेल येथील काल्हे गावात विजयराव विश्वासराव (शिवनेरी किल्लेदार) यांची शाखा आहे. तर राजाराम महाराज यांच्या काळात बुवाजी पवार यांना विश्वासराव खितांब व विश्वसराई सरंजाम राजाराम महाराज यांनी पवार घराण्याला दिला.
४) दळवी - हे शिवकालीन धार पवार सरदार घराणे आहे. यांचे मूलस्थान कोकणात पालवणी गावात होते. मुळशी तालुक्यात आंबवणे येथील दळवी घराणे सुद्धा ऐतिहासिक आहे. दलाचे अधिपती असल्या दळवी हे आडनावं झाले.
५) ढवळे - इस १३०० च्या सुमारास अबु येथील राणा रणधवलसिंह परमार (पवार) घराण्याचा मूळ पुरुष दक्षिणेत आला. त्यांनी सातारा जिल्ह्यात ढवळ व नांदवळ गावे वसवली. ढवळचे पवार फलटणच्या निंबाळकर यांच्या पदरी सरदार होते.
६) पाणसंबळ - नाईक पानसंबळ हे आडनाव मराठ्यांच्या शहाण्णव कुळातील पवार कुळातील आहे. पानसंबळ यांचे गाव अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सडे हे असल्याचे सांगितले जाते.
)जगदाळे - श्रीमंत जगदाळे हे धारच्या पवार घरण्याची शाखा. पानिपतच्या युध्दात आपल्या पराक्रम मूळ प्रसिद्ध. बहमनी काळापासून या घराण्याला १६८ गावाचा मसूर परगणा व देशमुखी होती. मसुरे गराडे व दौंड लिंगळे येथे दिडशे गावाची सरपाटिलकी मिळाली. जगदेवराव जगदाळे हे मूळपुरुष समजले जातात.
८) औषधराव - वैद्यकीय ज्ञान व वैद्यकीय व्यवसाय असणाऱ्या धार पवार घराण्याची हि शाखा.औषधराव म्हणजेच वैद्य. मराठा ९६ कुळ या पुस्तकात उल्लेख. शस्त्र व शास्त्र या दोन्ही कलेत हे घराणे निपुण. छत्रपती संभाजी महाराज कालखंडात उल्लेख. मुळशी पेट्यात शेडाणी व अवळस या गावात वास्तव्य,भोर मुळशी मावळ तालुक्यात या घराण्यांचे वास्तव्य आहे.
९) धारेराव - सांगली जिल्ह्यातील रेनावी गावातील आपल्या कामगिरीच्या जोरावर पवार घरण्याला धारेराव हा खितांब.
१०) धारकर- पुणे जिल्ह्यातील वाल्हे गावातील धार पवार घरण्याला धारकर हा खितांब. छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत असणाऱ्या सरदार तुकोजीराव पवार ह्याच गावचे.
११) सोरटे - पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील हे मूळ धार पवार घराणे. आपल्या सरदारकी बरोबरच मानशिरकरी हा खितांब. दरबारात पूर्वी सोरट हा खेळला जाई. त्यात प्राविण्य असल्याने सोरटे आडनाव.
१२) वाघळकर - सुपेकर - आपल्या वतन मिळलेल्या गावात वास्तव्यामुळे धार पवार वाघाळे येथील वाघळकर तर सुपे येथील सुपेकर म्हणून ओळखले जाऊ लागले.
१३) पंडीत - कोकणात काही गावातील मंदिरात पूजेचा मान असल्या मुळे पंडित उपणाव झाले. प्रसिध्द कासोटीपटू चंद्रकांत पंडित हे ह्याच धार पवार घराण्यातील.
१४) सावंत - कोकणात असलेले हे मूळ धार पवार घराणे. आपल्या स्वकर्तुत्वाने वर आले. १७०० साली नर्मदेच्या पलीकडे जाऊन हल्ला केलेला पाहिले मराठा सरदार हे कृष्णजी सावंत हे मूळ धार पवार.
१५) झुंझारराव - रणांगणात शत्रूला कडवी झुंज देणाऱ्या अन नामोहरम करून सोडणाऱ्या धार पवार सरदारांना झुंझारराव हा खितांब..
१६) सरपाटील :- बहुसंख्य गावात आपल्या पराक्रमच्या जोरावर अनेक गांवची पाटीलकी मिळाल्याने सरपाटिल हा बहुमानाचा हुद्दा.. पुणे जिल्ह्यात कोंढवे धावडे गावात या घराण्याचे वास्तव्य.
१७) मोकाशी :- सैन्याच्या खर्च करण्याकरता मोकसा हा वतनी हुद्दा दिला जात असे. ह्यांना मोकासदार असे म्हणत. पवार घराण्याला अनेक ठिकाणी असे मोकसा वतन मिळाले. मोकासाचा अपभ्रंश होऊन मोकाशी हे उपणाम प्राप्त झाले.
१८) घुमरे - बाराव्या शतकात देवगिरी यादव यांचे सहाय्यक. पारगाव घुमरा ची जहागिरी. घुमरा गाव वरून घुमरे पवार हे उपणाम प्राप्त झाले.
१९) गूढेकर , घोसाळकर , पटेल ,बणे , गढीकर , सावंत , सरपाटिल, विश्वासराव ,जगदाळे,झुंझारराव, पंडित,घुमरे,सोरटे, कवडे, पोकळे, भरम , वाघ , धावडे, नातू , वैद्य ,कांचन,धनवडे ,धारराव, दुधाने, कान्हेकर, हि धार पवार घरण्याची उपणावे...
२०) उत्तर भारतात पणवार , परमार , पँवार , पुवार तर गॊवा भागात पोआर असा उल्लेख करतात.
श्रीमंत राजे पवार घराणे निरंतर...!!
या खेरिज आणखी पवार कुळाची उपणावे व इतिहास असल्यास कृपया कमेंट बॉक्स मध्ये सांगावा.
श्रीमंत राजे पवार घराणे

Saturday, 5 September 2026

सीपीआर हॉस्पिटलला प्रमिला राजेंच्या कर्तुत्वाची चमकती किनार .

 या प्रमिला राजे म्हणजे कोण ?


सीपीआर हॉस्पिटलला प्रमिला राजेंच्या कर्तुत्वाची चमकती किनार .
सुधाकर काशीद .
या ना त्या निमित्ताने सीपीआर हॉस्पिटल चे नाव किंवा संदर्भ कोल्हापूरकरांच्या तोंडात रोज येतोच . सी.पी .आर . हॉस्पिटल म्हणजे छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल हे काहीजणांनाच माहिती आहे .कारण एखाद्या शब्दाचा अपभ्रंश झाला की मूळ शब्दच विसरला जातो. नेमके तसेच सीपीआर बाबतीत झाले आहे .
सी .पी .आर .म्हणजे छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल हे काहींना माहीत असले तरी या प्रमिलाराजे कोण हे मात्र राजघराण्याचा परिवार व नातेवाईक मंडळी यांच्या पुरतेच माहित आहे . पण या प्रमिला राजे कोण हे या नव्या पिढीला माहीत होण्याची गरज आहे. कारण राजघराण्याचा घटक म्हणून त्यांची जत सांगली, कोल्हापूर व मध्य प्रदेशातील देवासच्या इतिहासात एक खूप चांगली वेगळी अशी नोंदआहे.
प्रमिला राजे या सांगली जिल्ह्यातील जतचे रामराव उर्फ आबासाहेब डफळे यांच्या कन्या. एक ऑगस्ट 1910 रोजी त्यांचा जन्म झाला त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जत येथे झाले . त्यांचा विवाह 30 डिसेंबर 1926 रोजी युवराज विक्रमसिंह पवार देवास संस्थान यांच्याशी झाला .त्यांना चार मुले शालिनी राजे,कृष्णाजीराव,विजयाराजे व उर्मिलाराजे ही चार मुले .
1941 साली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात विक्रम सिंह महाराजांना रणांगणावर जावे लागले .त्यावेळी त्यांनी देवास संस्थानचा प्रभारी कारभार रिजंट म्हणून प्रमिला राजे यांच्यावर सोपवला .रिजंट म्हणून काम करताना त्यांनी संस्थांनच्या आर्थिक उलाढालीवर विशेष लक्ष केंद्रित केले .त्यांच्याच काळात त्यांनी आपल्या संस्थांनला कर्जमुक्त केले .1941 ते 1943 हा त्यांचा देवासच्या काळातील रिजंट असलेला काळ इतिहासात वेगळी नोंद करणारा ठरला . एक रुपयाला सात शेर गहू आणि दहा शेर ज्वारी रयतेला देण्याची जबाबदारी त्यांनी अगदी नियमीत पार पाडली .
त्यांचे पती विक्रम सिंह महाराजांना 1947 ला कोल्हापूर संस्थानात दत्तक घेण्यात आले . व त्यांचे नामकरण शहाजी महाराज झाले . दत्तक विधान समारंभानंतर प्रमिला राजेही कोल्हापूर संस्थांच्या महाराणी बनल्या .मात्र त्यांनी त्यानंतर ही काही काळ देवास संस्थांनचे रिजंट म्हणून कारभार पाहिला .दत्तक विधानामुळे कोल्हापूर संस्थांनच्या महाराणी बनलेल्या प्रमिला राजेंना त्याच वेळी देवास संस्थांनचाही कारभार पाहण्याचा मान मिळाला .
अतिशय धार्मिक व प्रेमळ वृत्तीच्या प्रमिला राजे यांनी 1961 मध्ये शहाजी महाराजांच्या सोबत आफ्रिका,युरोप,अमेरिका,जपान या देशांचा दौरा केला .1962 ला शहाजी महाराज व प्रमिला राजे यांनी नागपूरकर भोसले घराण्यातील दिलीपसिंह यांना दत्तक घेतले व त्यांचे नामकरण शाहू असे केले .हेच आत्ताचे आपले खासदार श्रीमंत शाहू छत्रपती .
प्रमिला राजे यांचे माहेर जत (जिल्हा सांगली ) येथील डफळे घराण्यातील .त्यांना विजयसिंह भाऊसाहेब व भैय्यासाहेब हे तीन भाऊ विजयसिंह लष्करात लेफ्टनंट कमांडर होते . भैय्यासाहेब हे भारतीय नौसेनेत अधिकारी होते .व निवृत्तीनंतर राज्य परिवहन मंडळाचे प्रमुख अधिकारी होते .
प्रमिला राजे या अतिशय विनम्र स्वभावाच्या होत्या .सेवकांनाही हो असा मान देऊन त्या बोलत होत्या .मुलींच्या शिक्षणाबद्दल त्या फार आग्रही होत्या . महाराणी इंदुमती देवीनी स्थापन केलेल्या मुलींच्या शाळेच्या कारभारात त्या लक्ष घालत होत्या .त्यांच्या वेगळ्या अशा कामगिरीचा अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल म्हणजेच कोल्हापूरच्या सरकारी दवाखान्याला छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल असे नाव देण्यात आले .आणि प्रमिला राजेंना गौरविण्यात आले . मात्र हळूहळू छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल या नावाचा शॉर्टकट "सीपीआर हॉस्पिटल "असा झाला .आणि नव्या पिढीने तर प्रमिलाराजे या कोण हे समजून घेण्याचा प्रयत्न अगदी फार थोडा केला .
आता काही दिवसापूर्वी या हॉस्पिटलचे जतन व संवर्धन अतिशय कौशल्याने केले आहे छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटलची ही वास्तू पुन्हा नव्या दिमाखाने उभे आहे . त्यानिमित्ताने प्रमिला राजे हॉस्पिटल हे नाव लोकांच्या जरूर तोंडात आहे .पण या प्रमिला राजे कोण हे नव्या पिढीपर्यंत पोहोचल्यास प्रमिला राजे हॉस्पिटलला एक नव्या ओळखीची किनार आपोआपच जोडली जाणार आहे .

भोपाळची लढाई

 

भोपाळची लढाई

Bajirao besieged the Nizam at Bhopal and defeated him. Treaty of Bhopal led to concession of Malwa
(७ जानेवरी) दिल्लीवरील स्वारीनंतर माघारी फिरणाऱ्या मराठ्यांचा मार्ग रोखण्यासाठी बादशहाने निजामाकडे मदत मागितली; परंतु बाजीरावाने भोपाळ येथे निजामाला वेढा घातला आणि त्याचा पराभव केला. भोपाळच्या तहामुळे माळव्याचा (नर्मदा आणि चंबळ नद्यांमधील प्रदेश) ताबा मराठ्यांना मिळाला; उत्तरेकडील प्रदेशाच्या रूपाने मराठ्यांची ही पहिलीच औपचारिक प्रादेशिक मिळकत ठरली.

हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्य - चरणी तत्पर जवळकर घराणे निरंतर

 


हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्य - चरणी तत्पर जवळकर घराणे निरंतर

🚩
सिंहगड म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेतील सर्वात जुना साक्षीदार. या किल्ले सिंहगडाच्या घेऱ्यामध्ये असंख्य घराण्यांनी आपल्या पराक्रमाने हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्य अशी अविरत सेवा केली.
छत्रपती शहाजीराजांच्या काळापासून या परिसरातील अनेक घराण्यांचे उल्लेख विविध गावांच्या महजरांमधून आढळतात. यातीलच एक पुरातन आणि मानाचे घराणे म्हणजे मौजे खानापूर येथील जवळकर घराणे.
१. खानापूरचे जवळकर - एक पुरातन वतनदारी
खानापूर येथील जवळकर घराण्याची वतनदारी ही पुरातन काळापासून आहे. येथील पाटीलकी परंपरेने जवळकर घराण्याकडे आहे.
ऐतिहासिक महजरांमधून संताजी पाटील जवळकर यांचा उल्लेख शिवकालीन कागदपत्रांमध्ये स्पष्टपणे आढळतो. तसेच खानापूरमधील जाधव घराण्यासोबतही या घराण्याचा निकटचा संबंध महजरांमधून दिसून येतो. सिंहगड परगण्याच्या महसूल आणि संरक्षण व्यवस्थेत या घराण्याचे योगदान अनन्यसाधारण आहे.
२. थोरल्या शाहू महाराजांकडून इनाम आणि सरंजाम
छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या काळात एकनिष्ठपणे सेवा केल्याबद्दल सरदार अंतोजीराव जवळकर यांना खास इनाम देण्यात आले. याबाबतचे मूळ मोडी दस्तऐवज आज आमच्या संग्रहात उपलब्ध झाले आहेत.
शिवाय अंतोजीराव जवळकर यांना लष्करी सरंजाम देखील बहाल करण्यात आला होता, याचेही पुरावे त्या कागदपत्रांमधून मिळतात.
३. ऐतिहासिक मोडी पत्र - थेट पुरावा
आम्हाला प्राप्त झालेल्या मोडी पत्रातील मजकूर पुढीलप्रमाणे -
"अंतोजी जवलकर यांची येकनिष्ठ पण सेवा करीत आहे त्यास मौजे आलंदी का. कडूस प्रांत पुणे येथे जमिन पड चावर येक ईनाम दिले पाहिजे."
मोडी लिप्यंतर : मा. श्री. शुभमराव भोसले (लऊळकर)
या एका ओळीवरून दोन महत्त्वाचे निष्कर्ष निघतात :
अ) जवळकर घराण्याचे मूळ गाव खानापूर असून त्यांना चोराची आळंदी (ता. खेड, प्रांत कडूस) येथे इनाम मिळाले.
ब) खानापूर आणि आळंदी येथील जवळकर हे एकाच भाऊबंदकीतील आहेत हे यावरून सिद्ध होते.
४. पुढील संशोधन
किल्ले सिंहगडाच्या घेऱ्यातील असंख्य घराण्यांचा अज्ञात इतिहास अजूनही बाहेर येणे गरजेचे आहे. या घराण्याकडे असलेली सरंजामी आणि इनामाची कागदपत्रे आम्हाला सापडली असून सदर सरंजामीमध्ये कित्येक गावांचा समावेश आहे. त्याची सविस्तर माहिती आम्ही लवकरच पुराव्यासह प्रसिद्ध करू.
तळटीप;-:-
या निमित्ताने सिंहगडाच्या पायथ्याशी स्वराज्यासाठी झटणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात वीरांना मानाचा मुजरा.
याबद्दल ऐतिहासिक मोडी कागदपत्रे आपल्या कडे उपलब्ध आहेत
विशेष आभार :- अक्षयराव जाधव खानापूरकर
आपला,
संतोष झिपरे
संस्थापक - राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद, महाराष्ट्र राज्य
९०४९७६०८८८

वीरजी व्होरा - शिवरायांनी केलेल्या सुरत लुटीचे सर्वात मुख्य टार्गेट असलेला हा असामी

 


वीरजी व्होरा - शिवरायांनी केलेल्या सुरत लुटीचे सर्वात मुख्य टार्गेट असलेला हा असामी.हा व्यापारी म्हणजे तत्कालीन भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी केंद्रातील सर्वात श्रीमंत माणूस होता.तेव्हाचा बिल गेट्स म्हणा हवं तर.

- डच रेकॉर्ड्स प्रमाणे हा तत्कालीन जगातील सर्वात श्रीमंत माणूस होता.याची वैयक्तिक संपत्ती ८० लक्ष (तत्कालीन) रुपये होती,तर व्यापारी उलाढाल काही कोटींमध्ये होती. (तेव्हाचे १ कोटी आताचे सुमारे ७५०० कोटी )
- मराठा साम्राज्याचे तत्कालीन उत्पन्न १५-२० लाखांच्या आसपास होती, यावरून वीरजी व्होरा च्या प्रचंड संपत्तीचा अंदाज येतो.
- भारतात आग्रा, सुरत, भडोच, कोकण, गोवलकोंडा, म्हैसूर, मद्रास तर सुरतेमधून जाण्यार्या एकूण महसुलापैकी लाखो रुपयांचा महसूल केवळ वीरजी व्होरा एकटा भरत असे.सुमारे ७ देशांमध्ये याच्या व्यापारी शाखा होत्या.
- इस्ट इंडिया कंपनीला याने जवळपास १० लाख रुपये व्यापारासाठी दिले होते, तसेच मोगल, पर्शियन, आर्मेनियन, फ्रेंच, डच, हबशी, पोर्तुगीज, अफगाणी, इराणी व्यापार्यांना याने सावकारी कर्ज दिले होते.
- संपूर्ण भारत ४ वर्ष वापरू शकेल इतकी चांदी याच्या गोदामात असते, असे वीरजी व्होरा बद्दल बोलले जाई.
- शिवरायांनी वीरजी व्होरा आणि अन्य ४ व्यापार्यांना संरक्षणाची हमी दिली व सुरत वर हल्ला करणार नाही अशि ग्वाही दिली होती,परंतु वीरजीने हि मागणी मग्रुरीने धूडकावली आणि याचे परिणाम त्याला भोगावे लागले.
- सुरत लुटीच्या वेळी मराठ्यांनी त्याची सगळी गोदामे आणि पेढ्या फोडून साफ केल्या. त्या दिवशी सोने, चांदी, मोती, रत्ने वगळून सुमारे ३०० ते ५०० हशम हातात प्रत्येकी २ पोती घेऊन शामियान्यात दाखल झाले होते. वीरजी व्होराच्या घरातून सुमारे ६००० किलो सोने, २८ पोती भरून मोती, हिरे आणि माणके, सुमारे ५० लाख रुपये रोख असा भरमसाठ ऐवज... ऐवज कसला, साक्षात कुबेराचा खजिनाच जणू प्राप्त झाला होता.
- सुरत च्या लुटीमध्ये सर्वात मोठे नुकसान वीरजी व्होराचेच झाले,यातून सावरायला काही वर्ष गेली तोच शिवरायांनी सुरत वर दुसर्यांदा हल्ला केला यातून मग वीरजी सावरला नाही आणि अंथरुणाला खिळला.
- जगातील सर्वात शक्तिशाली मुघल साम्राज्याला कर्ज देणारा हा व्यापारी शिवाजी महाराजांनी दिलेल्या तडाख्यामुळे धुळीस मिळाला आणि याच धक्क्यात १६७५ साली मृत्यू पावला.
संदर्भ - इस्ट इंडिया कंपनी रेकॉर्ड्स.

माचनूरची माती सांगतेय इतिहास… औरंगजेबाची छावणी आणि संताजी घोरपडेंच्या पराक्रमाची साक्ष

 






माचनूरची माती सांगतेय इतिहास… औरंगजेबाची छावणी आणि संताजी घोरपडेंच्या पराक्रमाची साक्ष

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले माचनूर हे आज एक शांत गाव म्हणून ओळखले जाते. मात्र, या परिसराच्या मातीत मराठा-मुघल संघर्षाच्या काळातील अनेक ऐतिहासिक आठवणी दडलेल्या आहेत. सुमारे सतराव्या शतकाच्या अखेरीस दख्खन जिंकण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत आला होता. सोलापूर परिसरात त्याचा प्रदीर्घ मुक्काम राहिला आणि माचनूर परिसरात मुघल सैन्याची महत्त्वाची छावणी उभारण्यात आली होती.
मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे मुघल सैन्याला मोठा त्रास सहन करावा लागत होता. सरसेनापती संताजी घोरपडे आणि सेनापती धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य अचानक हल्ले करून मुघलांची रसद आणि सैनिकी व्यवस्था विस्कळीत करत असे. माचनूरचा किल्ला आणि त्याच्या आसपासचा परिसर हा या संघर्षाचा महत्त्वाचा साक्षीदार ठरला. भीमा नदीच्या दोन्ही तीरांचा वापर करत मराठे रात्रीच्या वेळी अचानक छावणीवर धडक देत आणि पुन्हा सुरक्षितपणे माघारी परतत असल्याचे स्थानिक ऐतिहासिक संदर्भांत नमूद केले जाते.
या काळात संताजी घोरपडे हे मुघलांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरलेले मराठा सेनापती होते. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत त्यांनी धनाजी जाधवांसह मुघलांविरुद्ध प्रभावी लढा दिला. त्यांच्या वेगवान हालचाली, अचानक हल्ले आणि गनिमी काव्याच्या युद्धपद्धतीमुळे मुघल सैन्यावर मोठा दबाव निर्माण झाला होता. मराठी विश्वकोशातही संताजी घोरपडे यांच्यासह मराठा सरदारांनी मुघलांविरुद्ध केलेल्या संघर्षाचा उल्लेख आहे.
संताजी घोरपडे यांच्या आयुष्याचा शेवट मात्र अत्यंत दुःखद झाला. इ.स. १६९६ मध्ये त्यांची हत्या झाली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे शिर बादशहाकडे नेण्यात आल्याचे विविध ऐतिहासिक संदर्भांत नमूद आहे.
माचनूर परिसराशी जोडली जाणारी एक स्थानिक ऐतिहासिक परंपरा अशीही सांगते की, संताजींच्या मृत्यूनंतर त्यांचे शिर औरंगजेबाच्या छावणीच्या परिसरात आणण्यात आले होते. मात्र, हे नेमके माचनूर येथेच घडले, याबाबत उपलब्ध प्रमुख ऐतिहासिक स्रोतांमध्ये स्पष्ट आणि निर्विवाद नोंद आढळत नाही.

अंबोजी इंगळे यांचा गोसाव्यांवर विजय...!!

 


अंबोजी इंगळे यांचा गोसाव्यांवर विजय...!!

डिसेंबर १७९१ मध्ये महादजी शिंदे यांचे सरदार अंबोजी इंगळे यांचा मुक्काम चित्तोडगडजवळ होता. त्याच वेळी चित्तोडचे सुमारे पाच ते सात हजार गोसावी एकत्र जमून त्यांनी मराठा फौजेवर अचानक चाल केली.
दोन्ही बाजूंमध्ये तुंबळ लढाई झाली. या लढाईत मराठ्यांनी गोसाव्यांचा पराभव केला. सुमारे पाचशे गोसावी जखमी व ठार झाले, तर उरलेले शिकस्त खाऊन पळून गेले.
"चितोडकर गोसावी पांच सात हजार जमा होऊन, अंबोजी इंगळे यांजवर चालोन आले. परस्परें लढाई जाली. पांचशें गोसावी जखमी व ठार जाले. तदनंतर शिकस्त खाऊन पळोन गेले. इंगळेमजकुराचे फौजेचा मुक्काम चितोडगडनजीक आहे."
राजपुतान्यात मराठ्यांच्या फौजेला सतत अशा लढायांना सामोरे जावे लागत होते, याची ही समकालीन नोंद आहे.
संदर्भ : दिल्ली येथील मराठ्यांचीं राजकारणें (भाग २), संपादक – दत्तात्रय बळवंत पारसनीस, लेखांक ७३ (डिसेंबर १७९१).

महादजी शिंदे आणि दिल्ली दरबारातील मान...!!

 




महादजी शिंदे आणि दिल्ली दरबारातील मान...!!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक घटना मराठा इतिहासात विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण त्या घटनांनी स्वराज्याची पायाभरणी केली आणि मुघल सत्तेला मोठे आव्हान दिले. पुढे याच स्वराज्याचा विस्तार मराठा साम्राज्यात झाला. त्या विस्तारातील अनेक घटना महत्त्वाच्या असल्या, तरी १८ नोव्हेंबर १७७१ रोजी मुघल बादशहा शाह आलम (दुसरा) यांच्या दरबारात महादजी शिंदे यांना मिळालेला मान हा मराठा साम्राज्याच्या उत्तर हिंदुस्थानातील वर्चस्वाचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. कारण या प्रसंगातून दिल्लीच्या राजकारणात मराठ्यांचे स्थान किती उंचावले होते, हे स्पष्ट दिसते.
या घटनेचे महत्त्व समजून घेण्यासाठी पानिपतनंतरची परिस्थिती पाहणे आवश्यक आहे. १७६१ च्या पानिपत युद्धानंतर मराठ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अनेकांना मराठ्यांची ताकद संपली असे वाटत होते. पण पुढील दहा वर्षांत महादजी शिंदे यांनी उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचा प्रभाव पुन्हा निर्माण केला. दिल्लीतील राजकारणात त्यांचे महत्त्व वाढले आणि मुघल बादशहा शाह आलम दुसरा पुन्हा दिल्लीच्या गादीवर आला. त्या काळात बादशहा गादीवर असला, तरी दिल्लीची सत्ता आणि कारभार मराठ्यांच्या प्रभावाखाली चालत होता.
१८ नोव्हेंबर १७७१ रोजी शहजादा अकबर आणि मुघल लष्करातील मोठे सरदार स्वतः महादजी शिंदे यांच्या छावणीत त्यांचे स्वागत करण्यासाठी गेले. त्यानंतर शहजाद्याच्या नेतृत्वाखाली महादजी बादशहाच्या दरबारात हजर झाले. शाह आलम यांनी त्यांचे प्रेमाने आलिंगन केले आणि त्यांच्या पराक्रमाची भरभरून प्रशंसा केली. ही भेट साधी दरबारी भेट नव्हती. ती मराठा सामर्थ्याची उघड कबुली होती.
मुघल दरबाराची एक ठरलेली परंपरा होती. सिंहासनावर फक्त बादशहा बसत असे. बाकी सर्व राजे, नवाब, सरदार आणि सेनापती उभे राहूनच दरबारात उपस्थित राहत. बादशहाच्या तख्ताजवळ बसण्याचा अधिकार फार मोजक्या व्यक्तींना मिळत असे. हा दरबार शिस्त, मानमरातब आणि राजकीय स्थान यासाठी ओळखला जात होता.
याच दरबारात महादजी शिंदे यांना बादशहाच्या सुवर्ण तख्ताच्या जवळ बसण्याचा विशेष मान देण्यात आला. हा सन्मान एखाद्या सरदाराला दिला जाणारा नेहमीचा मान नव्हता. दिल्लीतील मराठ्यांचे वाढलेले वर्चस्व, महादजी शिंदे यांचा दरारा आणि मुघल सत्तेने स्वीकारलेले त्यांचे स्थान याचे हे स्पष्ट प्रतीक होते.
या प्रसंगाचा विचार करताना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण अपरिहार्य ठरते. एक काळ असा होता की हाच मुघल दरबार स्वराज्य संपवण्यासाठी मोहिमा पाठवत होता. आग्र्यात शिवाजी महाराजांना कैद करण्यात आले, स्वराज्यावर सतत आक्रमणे झाली आणि मराठ्यांचे अस्तित्व संपवण्याचे प्रयत्न झाले. पण शंभर वर्षांच्या आत चित्र पूर्ण बदलले. त्याच मुघल दरबारात शिवरायांच्या स्वराज्याचा शिलेदार महादजी शिंदे सन्मानाने तख्ताजवळ बसला आणि मराठेशाहीची मोहर हिंदुस्तानाच्या राजकारणावर उमटली.
या घटनेचा परिणाम केवळ दरबारापुरता मर्यादित नव्हता. दिल्लीतील राजकारणात मराठ्यांचा प्रभाव अधिक मजबूत झाला. उत्तर हिंदुस्थानातील अनेक राजे आणि सरदारांनी मराठ्यांचे नेतृत्व मान्य केले.
संदर्भ: Persian Records of Maratha History, Vol. I – Delhi Affairs (1761–1788), Jadunath Sarkar, Letter A 21b (November 1771), पृष्ठ ४७.

रक्षाबंधन विशेष | महादजी शिंदे आणि त्यांच्या चार बहिणी

 


रक्षाबंधन विशेष | महादजी शिंदे आणि त्यांच्या चार बहिणी

महादजी शिंदे यांना चार बहिणी होत्या. त्या म्हणजे जानकीबाई भोईटे (तडवळे), जोगुबाई साळुंखे (नेरलेकर), येसूबाई शितोळे (पाटस) आणि मैनाबाई माने (रहिमतपूर).
रक्षाबंधनाच्या दिवशी या चारही बहिणींनी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधली असेल. आणि महादजींनीही त्या राखीचा मान आयुष्यभर जपला.
शिंदे घराण्यातील हे भाऊ-बहिणीचे नाते आजही इतिहासात प्रेम, विश्वास आणि सन्मानाचे प्रतीक म्हणून स्मरणात आहे.

महादजी शिंदे यांचा महाराजा किताब...!!

 


महादजी शिंदे यांचा महाराजा किताब...!!

पानिपतच्या युद्धानंतर महादजी शिंदे यांनी उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांची ताकद पुन्हा उभी केली. दिल्लीच्या राजकारणात मराठ्यांचा शब्द चालू लागला. शाह आलम दुसरा मुघल बादशहा गादीवर होता, पण दिल्लीची खरी सत्ता मराठ्यांच्या हातात होती.
७ नोव्हेंबर १७७२ रोजी बादशहाने महादजी शिंदे यांचा मोठा सन्मान केला. त्यांना ७००० जात आणि ७००० स्वार असा मनसब देण्यात आला. त्याचबरोबर नौबत आणि माही-मरातब हे मानही देण्यात आले.
याच दिवशी महादजी शिंदे यांना महाराजा पाटील साहेब हा किताब बहाल करण्यात आला. महादजींच्या सन्मानासाठी अनुपशहर आणि कर्नाल हे परगणे जहागीर म्हणूनही देण्यात आले.
शाह आलम दुसरा हा दिल्लीचा नाममात्र बादशहा होता. दिल्लीचा कारभार आणि खरी सत्ता मराठ्यांच्या हातात होती. त्या सत्तेचे नेतृत्व महादजी शिंदे करत होते. त्यामुळे मुघल बादशहाकडून महादजींना महाराजा पाटील साहेब हा किताब मिळणे, ही मराठ्यांच्या वाढलेल्या ताकदीची मोठी साक्ष होती.
संदर्भ: Persian Records of Maratha History, Vol. I – Delhi Affairs (1761–1788), Jadunath Sarkar, Letter A 32, November 1772,Page 64.

दत्ताजी शिंदें यांची संबळगढ/पत्थरगड मोहीम...!!

 





दत्ताजी शिंदें यांची संबळगढ/पत्थरगड मोहीम...!!

पानिपतच्या आधी उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांनी अनेक मोठ्या मोहिमा केल्या. त्यात दत्ताजी शिंदे यांनी गंगा–यमुना दोआबात केलेली मोहीम खूप महत्त्वाची मानली जाते. भर पावसाळ्यात यमुना आणि गंगा ओलांडून रोहिल्यांच्या मुलुखात घुसणे आणि संबळगढ उर्फ पत्थरगड जिंकणे हा मराठ्यांचा मोठा पराक्रम होता.
अटक मोहिमेनंतर पंजाबची जबाबदारी शिंदे घराण्यावर आली. दत्ताजी शिंदे यांनी साबाजी शिंदे यांना पंजाबात ठेवले आणि स्वतः गंगेपलीकडील मुलुखाकडे लक्ष दिले. त्याच वेळी नजीबखान रोहिल्याने मराठ्यांना गंगेवर पूल बांधून देण्याचे वचन दिले होते. पण तो सतत टाळाटाळ करत राहिला आणि दुसऱ्या बाजूला शुजाउद्दौलाशी गुप्त संधान बांधत होता.
१५ एप्रिल १७५९ रोजी दत्ताजी शिंदे रामघाटावरून यमुना उतरून अंतरवेदीत आले. काही दिवसांनी पावसाळा सुरू झाला. नजीबखानाचा डाव लक्षात येताच दत्ताजींनी वाट पाहणे सोडले आणि स्वतः गंगा पार करण्याचा निर्णय घेतला.
हरिद्वारच्या बाजूने मराठ्यांनी भर पावसाळ्यात गंगा ओलांडली. त्या काळात ही गोष्ट अशक्य मानली जात होती. मराठ्यांच्या या हालचालीने नजीबखान पूर्णपणे गाफील राहिला.
नजीबखानाचा मुलगा झाबेता खान नजीबाबादला होता. गोविंदपंत बुंदेले यांनी त्याच्याकडे मोर्चा वळवला. नजीबाबादच्या पश्चिमेला मराठ्यांनी रोहिले आणि पठाणांना घेरले. त्यांचा मोठा पराभव झाला. तोफा, घोडे, उंट, कापड आणि भरपूर लूट मराठ्यांच्या हाती लागली.
या विजयाच्या लगेचच मराठ्यांनी संबळगढ उर्फ पत्थरगड वर हल्ला केला. रोहिल्यांचा हा मजबूत किल्ला मराठ्यांनी तुफानी हल्ल्यात जिंकला. रोहिले किल्ला सोडून पळाले आणि संबळगढ उर्फ पत्थरगडावर भगवा फडकला.
संबळगढ उर्फ पत्थरगडचा विजय हा फक्त एका किल्ल्याचा विजय नव्हता. गंगा ओलांडून मराठे रोहिल्यांच्या मुलुखात पोहोचले आहेत, हा संदेश संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात गेला. दत्ताजी शिंदे यांनी भर पावसाळ्यात केलेला हा पराक्रम मराठ्यांच्या धाडसाचा आणि युद्धकौशल्याचा मोठा पुरावा आहे.
संदर्भ-मराठी रियासत
पेशवे दप्तर
पानिपताची बखर
फोटो-दत्ताजी शिंदे
संबळगढ/ पत्थरगढ
गंगा-यमुना नदी दोआब

चंदेरीवर मराठ्यांचे वर्चस्व....!!

 







चंदेरीवर मराठ्यांचे वर्चस्व....!!

चंदेरी म्हटलं की आज सर्वात आधी आठवतो तो चंदेरी कापड. शेकडो वर्षांपासून चंदेरीची ओळख याच कापडामुळे आहे. राजघराणी, सरदार आणि मराठा दरबारात चंदेरी कापडाला मोठा मान होता. खास करून शिंदेशाही पगडी बांधण्यासाठी चंदेरी कापड वापरले जात असे. आजही पारंपरिक शिंदेशाही पगडीमध्ये याच कापडाची परंपरा दिसून येते.
हेच चंदेरी एकेकाळी मराठ्यांच्या मोहिमेचे केंद्र बनले.
एप्रिल १७८२ मध्ये महादजी शिंदे यांनी चंदेरीची मोहीम आखली. त्या वेळी चंदेरीवर राजा राजधर राज्य करत होता. महादजींनी ग्वाल्हेर आणि गोहद येथे फौजेचा तळ ठोकला आणि तेथून मोहिमेची तयारी सुरू केली.
या मोहिमेची जबाबदारी बळवंतराव धोंडदेव नायगावकर यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांच्या सोबत कडवी गोसाव्यांची फौज देण्यात आली. मराठ्यांनी चंदेरीवर चाल करून राजा राजधराचा पराभव केला आणि चंदेरीचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.
यानंतर महादजी शिंदे यांनी रामचंद्रधर राजे यांना चंदेरीच्या गादीवर बसवले. चंदेरीसोबत आसपासच्या आणखी पाच-सात गढ्याही मराठ्यांच्या ताब्यात आल्या आणि त्या भागातून चौथ वसूल करण्यात आली.
चंदेरीचा किल्ला जिंकला, चंदेरीची गादी बदलली आणि चंदेरीच्या राजकारणावर मराठ्यांचा अधिकार बसला. उत्तर हिंदुस्थानात महादजी शिंदे यांचा दरारा किती वाढला होता, याचा हा महत्त्वाचा पुरावा आहे.
संदर्भ: The Great Maratha — एन. जी. राठोड.

पत्थरगडच्या वेढ्यात मराठ्यांचा विजय आणि नजीब-उद-दौलाच्या कुटुंबाची शरणागती..!!





 पत्थरगडच्या वेढ्यात मराठ्यांचा विजय आणि नजीब-उद-दौलाच्या कुटुंबाची शरणागती..!!

पानिपतच्या युद्धानंतर उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांनी पुन्हा आपली घोडदौड सुरू केली. रोहिल्यांचा प्रमुख नजीब-उद-दौला मरण पावला होता, पण त्याचा मुलगा झाबेता खान मराठ्यांविरुद्ध उभा होता. रोहिल्यांची ताकद मोडण्यासाठी महादजी शिंदे यांनी पाथरगड उर्फ नजीबाबादवर मोहीम काढली.
मार्च १७७२ मध्ये महादजी शिंदे आणि विसाजी कृष्ण यांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजेने पाथरगडच्या भक्कम किल्ल्याला वेढा दिला. हा किल्ला रोहिल्यांचा सर्वात मजबूत ठाणा मानला जात होता.
सलग चार दिवस दोन्ही बाजूंनी तोफांचा जोरदार मारा सुरू होता. मराठ्यांच्या तोफखान्याने किल्ल्याचा एक मोठा बुरुज पाडला. बुरुज कोसळताच किल्ल्यातील सैन्याने शरणागतीची मागणी केली.
किल्ल्यातील लोकांनी मराठा सरदारांकडे एकच विनंती केली. किल्ल्यातील स्त्रियांचा मान राखावा आणि त्यांना अभय द्यावे. मराठ्यांनी ही विनंती मान्य केली.
बाबुराव फडणीस स्वतः किल्ल्यात गेले आणि सुरक्षिततेचे वचन दिले. ५ मार्च १७७२ रोजी झाबेता खानची मुले, त्याची पत्नी आणि नजीब-उद-दौलाच्या घरातील स्त्रिया विसाजी कृष्ण यांच्यासमोर शरण आल्या. मराठ्यांनी त्यांना कोणतीही इजा केली नाही. उलट त्यांना नजीबाबादच्या हवेलीत सन्मानाने आणि सुरक्षित ठेवण्यात आले.
ही घटना मराठ्यांच्या युद्धपद्धतीची ओळख करून देते. रणांगणावर शत्रूशी कठोर लढाई, पण शरण आलेल्या स्त्रिया आणि कुटुंबीयांचा मान राखणे, ही मराठ्यांची परंपरा होती.
पत्थरगड जिंकल्यानंतर रोहिल्यांचा सर्वात मजबूत आधार मराठ्यांच्या हातात आला. नजीबाबादचा किल्ला, त्याची संपत्ती आणि त्याचे कुटुंब मराठ्यांच्या ताब्यात आले. उत्तर हिंदुस्थानात रोहिल्यांची घडी याच मोहिमेत विस्कटली आणि दिल्लीच्या राजकारणात मराठ्यांचा हात आणखी मजबूत झाला.
संदर्भ: Persian Records of Maratha History, Vol. I – Delhi Affairs (1761–1788), Jadunath Sarkar, Letter A 28b (9 March 1772), पृष्ठ ५८.

तळेगावच्या लढाईत मराठ्यांचा इंग्रजांवर दणदणीत विजय..!!

 









तळेगावच्या लढाईत मराठ्यांचा इंग्रजांवर दणदणीत विजय..!!

अठराव्या शतकात मराठे आणि इंग्रज यांच्यात सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला होता. मुंबईतील इंग्रजांनी रघुनाथरावांना सोबत घेऊन पुणे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण तळेगावची लढाई मराठ्यांच्या बाजूने गेली आणि इंग्रजांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. या विजयाची बातमी कलकत्त्यापर्यंत पोहोचली आणि गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज याचीही झोप उडाली, अशी नोंद त्या काळातील पत्रात सापडते.
तळेगावच्या लढाईची पार्श्वभूमी समजून घेणे महत्त्वाचे आहे. इंग्रजांची फौज रघुनाथराव दादांना सोबत घेऊन पुण्याकडे निघाली होती. भोर घाट ओलांडून ते तळेगाव येथे येऊन थांबले. मराठे योग्य संधीची वाट पाहत होते.
मराठ्यांनी भोर घाटाच्या पायथ्याशी इंग्रजांचा दारूगोळ्याचा साठा पेटवून दिला. दारूगोळा उडाल्यानंतर इंग्रजांच्या छावणीत मोठी गोंधळ उडाली. रघुनाथराव आणि इंग्रजांनी आपला तळ सोडून माघार घेतली. या पळापळीत रघुनाथराव पकडले गेले आणि इंग्रजांच्या पलटणींचा मोठा पराभव झाला.
या पराभवाची बातमी कलकत्त्यात पोहोचताच इंग्रज अधिकारी घाबरले. गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यालाही या बातमीचा मोठा धक्का बसला. मराठ्यांनी इंग्रजांना दिलेला हा धक्का कलकत्त्यापर्यंत पोहोचला होता, याची नोंद सेवकराम यांनी २६ मार्च १७७९ रोजी कलकत्त्यातून पाठवलेल्या पत्रात केली आहे.
तळेगावचा विजय हा मराठा–इंग्रज संघर्षातील पहिल्या मोठ्या विजयांपैकी एक मानला जातो. या लढाईनंतर इंग्रजांना मराठ्यांशी तह करावा लागला आणि मराठ्यांचे सामर्थ्य पुन्हा एकदा संपूर्ण हिंदुस्थानात दिसून आले.
संदर्भ: Persian Records of Maratha History, Vol. I – Delhi Affairs (1761–1788), जदुनाथ सरकार, Letter A 57a (सेवकराम यांचे कलकत्त्यातून पत्र, २६ मार्च १७७९), पृष्ठ ९६

#पवार #घराण्याची #उपनावे...

  #पवार #घराण्याची #उपनावे ... प्रथम मुलूखगिरी करताना काही खिताब (पदवी) मिळाले त्या पुढे तेच खिताब आडनाव म्हणून रुजू झाले. १) महिपतराव २) ...