विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 June 2019

किल्ले साल्हेरचा रणसंग्राम

किल्ले साल्हेरचा रणसंग्राम
www.navnathaher.wordpress.com
______१५६७ मी. उंचीचा गिरीदुर्ग प्रकारातील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला.
नाशिक जिल्ह्यातील सेलबारी-डोलबारी डोंगररांगेवर
वसलेला हा किल्ला चढाईस तेवढा कठीण नाही.
महाराष्ट्रात जसा सर्वात उंच शिखराचा मान कळसूबाईचा तसा गडकिल्ल्यांमध्ये सर्वाधिक उंचीचा मान साल्हेरचा. बागलाण हा मोक्षगंगा आणि अक्षगंगा या नद्यांमुळं समृद्ध झालेला प्रदेश. येथील भूमी तशी सुपिकच त्यामुळे येथील लोकांचे रहाणीमान तसे थोडे उंचावलेले. तरीही डोंगरी भागात कोकण, भिल्ल सारख्या काही आदिवासी जमाती रहातात. साल्हेर गडाचा घेरा साधारणपणे ११ कि.मी. असून व्यापलेले क्षेत्र ६०० हेक्टर आहे.
_______साल्हेर गड हा परशुरामाची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. जिंकलेल्या पृथ्वीचे दान करून स्वतःसाठी भूमी मिळवण्यासाठी सागराला मागे हटवायला त्यांनी बाण सोडला तो याच भूमीवरून असे पौराणीक स्थान असलेल्या साल्हेरचे शिवकालीन इतिहासातील स्थान देखील महत्त्वाचे आहे. ते येथे झालेल्या प्रसिद्ध लढाईमुळे
शिवाजी महाराजांनी नोव्हेंबर १६७० मध्ये वैभवशाली अशी सुरत पेठ लुटली व महाराज महाराष्ट्र देशी यायला निघाले.महाराजांनी बागलाण प्रांतात प्रवेश केला किल्ले मुल्हेरच्या पायथ्याला तेथील एका खेड्यावर शिवरायांच्या सैन्याने हल्ला करुन ते खेडे लुटले.पिछाडीस असलेल्या सैन्याची दिंडोरी येथे दाऊदखाना बरोबर लढाई झाली.लढाई मारल्या नंतर महाराजांनी अहिवंत,रवळा,जवळा,मारकंडा,हातगड हे किल्ले घेतले.याचवेळी महाराजांनी १६७० च्या अखेरीस किल्ले साल्हेर आपल्या ताब्यात घेतला त्याला खालील पत्रे व साधने प्रमाण आहेत.
संदर्भ:-
*शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्रमांक १३७८
इ.स ६ फेब्रुवारी १६७१
मुंबई ते सुरत
"दाऊदखान सालिहेरला होता.तो आपल्या मुलाच्या मदतीस बुर्हाणपूरला निघाला.तेवढ्यांत शिवाजीराजांनी साल्हेर घेतला."
*-शिवराजभूषण १०७
"किल्ल्याची उंची पाहू गेले असता पागोटे गळून पडतें.धाडसी लोक फक्त दिवसा व ते ही सरळ रस्त्याने वर चढू शकतात.पण शिवाजीराजे हो!तुमची आद्ना होतांच सालेरी सारखे अवघड किल्ले तुमच्या पायदळानें शेताप्रमाणे जिंकले.तुमचें मावळे सैन्य इतके दक्ष आहे कीं,श्रावण-भाद्रपदांतील अमावस्येच्या काळ्याकुट्ट अंधार्या रात्रीं देखील किल्ले चढून वर जातें.भूषण म्हणतो:मी ह्या गोष्टीचा विचार केला तेव्हां मला असे अढळून आले कीं,तें मावळे सैन्य तुमच्या प्रतापसूर्याच्या उजेडामुळेच किल्ले घेऊं शकते."
*जेधे शकावली
१५९२ पौष मासी सालेरी भेदे करुन घेतली.
*सभासद बखर
मोरोपंतांनी साल्हेरगड घेतला.
*औरंगजेबाचा संक्षिप्त इतिहास -
"प्रतापराव वर्हाडांत आणि मोरोपंत पश्चिम खानदेश आणि बागलाण प्रांत हेथें होते.दोघेही साल्हेर नजीकच्या प्रदेशांत एकमेकांना येऊन मिळाले आणि त्यानां साल्हेर किल्ल्याला वेढा दिला.रात्री आठ वाजता दाऊदखान मुल्हेर नजीक येऊन पोहोचला.परंतू त्याची छावणी आणि सैन्य तिथपर्यंत येऊन न पोहोचल्याने त्याला पुढे कोणतीही कारवाई करणे अशक्य होऊन बसले.त्यामुळे साल्हेरच्या सुटकेंकरीता त्याला ताबडतोब धावून येता आले नाही.
शिवाजी राजांनी २००० घोडेस्वार आणि अन्य पायदळ ह्या सैन्यासह साल्हेर किल्ल्याला वेढा दिलेला होता.एके दिवसीं किल्ल्यांतील शिबंदीच्या पहार्यांत थोडीसी ढिलाई आलेली आहे,असे पाहून त्यांनी शिड्या लावून किल्ल्यावर आपले सैन्य चढविले.किल्लेदार फत्तुल्लाखान ह्याने लढता लढता मरण पत्करले आणि किल्ल्याचा ताबा त्याच्या पत्नीच्या भावाने (मराठ्यांना) दिला."
_____शिवाजी महाराजांच्या सैन्याने किल्ले साल्हेर हा सुरत लुटीहून परत येतानाच घेतला हे उपरोक्त साधनांतील नोंदी नुसार सिद्ध होते.
_________________________________________
औरंगजेबाने बहादूरखानास जानेवारी १६७१ च्या आसपास मराठ्यांवर चालून जाण्याचा हुकुम सोडला.यावेळी बहादूरखान गुजराथ मध्ये होता.असाच हुकुम औरंगजेबाने बुर्हाणपुरास असलेल्या महाबतखानालासुद्धा सोडला होता. महाबतखान १० जानेवारी १६७१ ला औरंगबादेस पोहोचला.तेथून तो चांदवडला आला तेथे मोगलांची मुख्य छावणी होती व छावणीचा सेनापती होता दाऊदखान कुरेशी मोठा तोला मोलाचा सरदार होता.
मोहबतखानाने सुड बुद्धीने अहिवंत किल्ला घेण्याचा विचार केला व गडास मोर्चे लावले.गडावर हिंदवी स्वराज्याचा भगवा डौलात फडफडत होता.दारुगोळ्यांच्या सहाय्याने गड घेण्यास सुरुवात केली.सतत महिनाभर गडावर तोफा बंदूका भडीमार करत होत्या पण त्यांना किल्ला काही हातात येईना.
पण हर कोशिसिने दाऊद खानाने एक महिन्या नंतर गडाच्या आत आपले लोक घुसवले व अहिवंत ताब्यात घेतला.आता अहिवंतावर मोंगली निशाण फडफडत होते.खर तर महाबतखानाला असे वाटत होते की हा गड मी घ्यावा.पण,दाऊदखानानेच एल्गार फत्ते केला व महाबतखानाचे श्रेय गेले व तो तेथून गुलशनबादेस गेला.दाऊदखानाने मारकंडा,जवळा,अंचलगिरी हे ही किल्ले आपल्या ताब्यात घेतले.
पुढे १६७१ चा पावसाळा संपला न दिलेरखान व बहादूरखान हे दोघे बडे मोंगल सरदार सुरतेपाशी तळ देऊन होते.ते हिवाळ्याच्या सुरुवातीस बागलाण प्रांतात घुसले.यांचा फौजफाटा मोठा होता.त्यामुळे त्यांनी एकाच वेळी चार ठिकाणी चालून जाण्याचा निर्णय घेतला.अखेर त्यांनी साल्हेरीस वेढा घालण्याचे ठरवले व इखलासखान मियाना,मुहकमसिंंह चंदावत,राव अमरसिंह इत्यादी सरदारांना साल्हेरीच्या वेढ्यावर पाठवले.वेढा तसाच ठेवून दिलेरखान स्वत: रवळागड घेण्यासाठी म्हणून फौज घेऊन निघाला
महाराज यावेळी शिवाटपट्टण येथे होते.महाराजांना याची बातमी लागली त्यांनी ताबडतोब मोरोपंत पेशवे व सरनौबत प्रतापराव गुजर यांना फौजेसह प्रथम साल्हेरवर जाण्यास सांगितले.गुगल वा नेट वरील माहीतीत शिवाजीराजेंनी बागलाण मोहीम १६७१ साली काढली असे उल्लेख आहेत तर ते चुकीचे आहेत.महाराजांनी बागलाण मोहीम काढली ती १६७२ ला.याला खालील साधने साक्ष व प्रमाण आहेत.
संदर्भ:-
*शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्रमांक-१४४७
दिनांक-१५ फेब्रुवारी १६७२
मॅथ्यू ग्रे(स्वाली बंदर) ते मुंबई
"सालेरीला वेढा घालणार्या दिलीलखानाच्या सैन्याचा शिवाजीराजांनी मोड करुन त्या किल्लाचा शिवाजीराजांनी चांगला बंदोबस्त केला."
*शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्रमांक-१४६३
दिनांक-६ एप्रिल १६७२
सुरत ते कंपनी
"एका किल्ल्यावा वेढा देणार्या मोंगली फौजेचा शिवाजीराजांनी पक्का बिमोड केला.
*जेधे शकावली
"शके १५९३ माघ मासीं मोरोपंती हशम घेऊन सालेरीची माचीचा वेढा मारिला.उपराळा केला.
*शिवापूरकर देशपांडे शकावली
"शके १५९३ माघ मासीं मोरोपंती हाशम घेऊन सालेरीचे माचीचा वेढा मारिला.
*शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्र-१४४७
दिनांक-१५ फेब्रुवारी १६७२
"मॅथ्यू ग्रे(स्वाली) ते मुंबई पत्रव्यावहार
"दुसर्या एका लढाईत शिवाजीराजांनी बहलोल खानाला ठार मारुन सालेरींत सुमारेंं ३० मोठे अमलदार ठेविले आहे."
*शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्र-१४६३
दिनांक-६ एप्रिल १६७२
सुरत ते कंपनी पत्रव्यावहार
"शिवाजीराजांच्या देशांत घुसलेल्या दोघा सरदारांची मानखंडणा होऊन मोठें नुकसान सोसून त्यांना परत जावे लागले."
(टिप-पत्र व अस्सल कागद यांना इतिहासात अनन्य साधारण महत्व आहे.)
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _______महाराजांनी कोकणात असलेल्या मोरोपंताना आद्ना पाठवली की वरघाटी असलेल्या प्रतापरावांस मिळा व सालेरीवर चालून जा.त्याच प्रमाणे प्रतापरावासही पत्राने आद्ना केली..
"तुम्हा लष्कर घोऊन सिताबीने वरघाटे सालेरीस जाऊन..खानावरी छापा घालून...खान मारुन चालविणे आणि कोकणांकून मोरोपंत पेशवे येतील .तुम्ही वरघाटे येणें असे दुतर्फा चैलून घेऊन गनिमास मारुन गर्दीस मेळविणे."
या प्रमाणे प्रतापरावांनी आपली फौज किल्ले साल्हेरीच्या दिशेने फेकली व मोरोपंतही सिताबीने कोकणातून वर घाट चढून आले.पंत आणि राव एकत्र झाले व मराठी फौजांचा लोंढा साल्हेरच्या रोखाने निघाला.साल्हेरला मोगलांची फौज आफाट होती.जवळपास साठ हजार तसेच मराठ्यांचीही फौज मोठीच होती जवळपास चाळीस हजार.
दिलेरखान रवळ्यावर चाल करुन गेला होता ही बातमी मोरोपंतांस समजली व मोरोपंतांनी बारा हजाराची सज्ज ताफेबंद फौज दिलेरखानावर पाठवली.मराठ्यांच्या तलवारीचे पाणी खानाने पुरंधरावर चाखलेच होते.त्या मुरारबाजींचा पराक्रम आणि निष्ठा या खानाने या डोळा देखीली होती.रवळागडचा किल्लेदार खानाला बधू देत नव्हता.एवढ्यातच मोरोपंतांनी पाठवलेल्या १२ हजार मराठ्यांनी टोळ्या टोळ्यांनी खानावर हल्ला करायला सुरुवात केली.आग्या मोहळाच्या माशा डसाव्यात तशी तशी खानाची हालत झाली.खान घाबरला....हैराण झाला त्याने रवळ्याची मिठी सोडली व तो मराठ्यांचा बिमोड करण्यासाठी मराठ्यांच्या मागे लागला.हां वार्यालाही दाद न देणारे मराठे खानाच्या तावडीत सापडतील तरी कसे?
खान कणेरगडानजीक आला.घोडपच्या वायव्येला साडेतीन कोसांवर असणारा हा कणेरागड.खान गडाच्या पायथ्याशी आला व त्याची गाठ आता एका दुसर्या मुरारबाजीशी पडली.त्याचे नाव होते रामाजी पांगेरा.भलताच शूर.रामाजीने पाहीले की खान आपल्याला बुडवू पाहतोय.तो आपल्या हजार मावळ्यांसह पुढे येऊन उभे राहिला आणि आवेशाने म्हणाला...
"चला निदान करावयाचे आहे!आपले सोबती असतील ते उभे राहणे..!"
सरासरा सातशे मावळा उभा ठाकला न त्या दिलेरखानावर मराठ्यांच्या असिलता कोसळल्या.खान खान बेजार झाला.काय ती निष्ठा,काय ते धाडस सर्व सर्व पाहून खानाची उंगळी दुसर्यांदा तोंडात गेली एकदा पुरंदर पायथ्याला व आता या कणेरागडाच्या पायथ्याला.
"टिपरी जैसी सिमगियाची दणाणते'तैसे मावळे भांडू लागले.एक प्रहर घोरांदर युद्ध झाले.मावळ्यांनी बाराशे पठाण कापून काढला.रामजीने शौर्याची शर्थ केली.मोठा हट्टी.प्राण इरेला घालून लढत होता तो.मावळ्यांनी रक्तस्नान केले.एका एकाला वीस वीस,तीस तीस जखमा झाल्या. आणि शत्रूच्या महापुरांत मावळे लोक असंख्य मेले.अखेर काय झाले ते.या इतिहासाला माहीत नाही.मात्र खानाचा पाडाव झाला हे नक्की..."
______तिकडे मोरोपंत व प्रतापराव सोल्हेरच्या मोंगली वेढ्यावर अकस्मात जाऊन तुटून पडले.त्यांच्या फौजेत ते स्वत: होतेच शिवाय
आनंदराव व व्यंकाजी दत्तो व रुपाजी भोसले व सुर्यराव कांकडे,शिदोजी निंबाळकर व खंडोजी जगताप व गोंदजी जगताप संताजी जगताप व मनाजी मोरे व विसाजी बल्लाळ,मोरो नागनाथ व मुकूंद बल्लाळ,वरकड बाजे वजीर,उमरावही होते.पंत व राव एकदम मोघलांवर तुटून पडले.एका बाजूने मावळी पायदळ व दुसर्या बाजूने घोडदळ शत्रूंच्या अंगात घुसले.अशी धुंद कधी उडाली नव्हती.अशी गर्द कधी उधळली नव्हती.हजीरो हजार मावळ्यांच्या कंठांतून आव्हानांच्या आरोळ्या उठल्या.शिवाच्या शिवगणांनी तांडव मांडला पृथ्वी दणाणली.महाराजांचा प्रिय,मावळ्यांचा प्रिय,अवघ्या अवघ्या स्वराज्याचा प्रिय,तुमचा आमचा प्रिय भगवा झेंडा फडफडत होता.स्वराज्याची नौबत झडत होती..घनघोर युद्धाचा कल्लोळ उडाला होता..
या लढाईचे वर्णन सभासदाने खुप छान रित्या केले आहे.
*सभासद बखर-
"इखलासखान नवाब ह्याणी येऊन सालेरीस वेढा घातला आणि गडाखाले उतरले.हें वर्तमान राजियांस कळोन राजियांनी प्रतापराव सरनोबत लष्कर देऊन सिताबीनें वरघाटे सालेरीस जाऊन,बेलोलखानालरि छापा घालून,बेलोलखान मारुन चालवणें आणि कोंतणातून मोरोपंत पेशवे ह्यास हशमानिशी रवाना केले.हे हिकडून येतील आणि तुम्ही वरघाटे येणें.असे दुतर्फा चालून घेऊन,गनिमास मारुन गर्दीस मेळविणें.असीं पत्रें पाठवली.त्यावरुन प्रतापराव लष्कर वरघाटे आले.मोरोपंत पेशवे कोकणातून आले.उभयंता सालेरीस पावले.एक तर्फेंने लष्करानी घोडी घातलीं.एक तर्फेने मावळे लोक शिरले आणि मारामारी केली.मोठे युद्ध जाहालें.चार प्रहर दिवस युद्ध जाहालें.मोंगल,पठाण,राजपूत,रोहिले,तोफाची,हत्ती,उंटे,आराबा घालून युद्ध जहालें.युद्ध होतांच पृथ्वीचा धुराळा असा उडाला कीं,तीन कोस औरस,चौरस आपलें परके माणूस दिसत नव्हतें.हत्ती रणास आले.दुतर्फा दहा हजार माणूस मूर्दा जाहालें.घोडी,उंट,हत्ती गणना नाही.रक्ताचे पूर वाहिले.रक्ताचे चिखल जाहालें.त्यामध्ये रुतो लागले.असा कर्दम जाहला.मारता मारतां घोडे जिवंत उरले नाहींत.जे जिवंत सापडले ते सहा हजार घोडे राजियांकडे गणतीस लागले.सवाशें हत्ती सांपडले.साहा हजार उंटे सापडली.मालमत्ता खजीना,जडजवाहीर,कापड,अगणित बिछाईत हातांस लागली.बेवीस वजीर नामांकित धरले.खासा इखलासखान व बेलोलखान पाडाव झाले.ऐसा कुल सुभा बुजविला.हजार दोन हजार सडे सडे पळाले.असे युद्ध जाले.त्या युद्ध झाले.त्या युद्धांत प्रतापराव सरनौबत व आनंदराव व व्यंकाजी दत्तो व रुपाजी भोसले व सुर्यकांत कांकडे,शिदोजी निंबाळकर व खंडोजी जगताप व गोंदजी जगताप संताजी जगताप व मनाजी मोरे व विसाजी बल्लाळ,मोरो नागनाथ व मुकूंद बल्लाळ,वरकड बाजे वजीर,उमराव असे ह्याणी शिकस्त केली.तसेच मावळे लोक व ह्याणी व सरदारांनी शिकस्त कस्त केली.मुख्य मोरोपंत पेशवे व प्रतापराव सरनोबत ह्या उभयंतांनी आंगीजणा केली;आणि युद्ध करिंता सूर्यराव कांकडे पंचहजारीचा मोठा लष्करी धारकरी,ह्याणो युद्ध थोर केले.ते समयी जंबूरियाचा गोळा लागून पडला.सूर्यराव म्हणजे सामान्य योद्धा नव्हे.भारती जैसा कर्ण योद्धा,त्याच प्रतिमेचा असा शूर पडला.वरकडही नामांकित शूर पडले.असे सुद्ध होऊन फत्ते जाहली.
*शिवराज भूषण-
दु.आ.तिवारी,जळगांव
आवृत्ती १९३१
(टिप-मी एक व दोन मुळ छंद देत आहेत बाकी केवळ अर्थ येथे देत आहे.)
"सालेरीच्या युद्धांत निवडक सरदारांस ठोकून काढले आणि सर्व सैन्यास घेरुन लुटलें.तेव्हां जणूं हत्ती व घोडे सरदारांकडे देऊन औरंगजेब शिवाजीराजांकडे खंडणीच पाठवीत आहे कीं काय असे वाटले."
।।१०३।।
*सरजासह लढण्याची चंदावत राजपूत हाव धरी।।
अमरावतीस गेला राव 'अमर' लक्ष्मि सोडून समरी।।२२५।।
-सरजाशिवराजांशी युद्ध करुन अमरसिंह चन्दावत अमरपूरास गेला,पण त्याच्या शूरत्वाची कीर्ति समरांगणात राहिली.
*सालेर युद्धांत दिल्लीदलाची किती घोर केली तुवा कत्तल।।
चंदावती कच्छवाही पठाणी कबंधी नट भव्य युद्ध स्थल।।
जेते तुझे वीर आके गृहाला शिरे भीरुता शत्रू देहातरी।।
मारावया ठाकले तेच मेले ,घुमे 'मार!मार!' ध्वनी संगरी।।२२६।।
*शिवाजीराजांनी सालेरीच्या लढाईंत तलवार धरुन दिल्लीपतीच्या सैन्याची कत्तल केली.चन्दावत,कुछवाहे इत्यादी बलाढ्य व प्रशंसनीय वीरांचा फडशा पाडला.मोगल,पठाण मैदानावर फरफटत पडले.
कवि भूषण म्हणतात:-.(शिवाजीराजे)ह्यांचे शूरविर योद्धे युद्ध जिंकून घरी आले.पण त्यांच्या दरारा मात्र घरोघर बसला.मारा करणारे शत्रू मरण पावले,तरी पण रणांगणावर अद्याप "मारा मारा" ध्वनी निघत आहे.
*शिवाजीराजेसर्जांनी सालेरीच्या युद्धांत अनेक उमरावांचा फडशा पाडला.कुम्भ,चंदावत,सय्यद,पठाण ह्यांची धडे धावताना डळमळू लागतात.
शिवाजी राजांच्या अस्या धाकाने लाल असणारे पिवळे धमक झाले आणि पुन्हा शस्त्रांनी घायाळ झाल्यामुळे त्या सरदारांची मुखें रक्ताने लाल झाली.
(टिप-विस्तार भयास्तव सर्व छंद येथे देच नाही.परंतू शिवराज भूषण व शिवाबावनी मध्ये कवी भूषणांनी या लढाईचे वर्णन खुपच सुंदर रितीने केले आहे.ते अवश्य वाचावे.)
*जेधे शकावली-
"शके १५९३ प्रतापराव व आनंदराव फौजेनसी जाऊन बहलोलखान धरिला.मोहोकमसिंह व द्वारकोजी भोसले धरिले.हत्ती आकरा व घोडी सातराशें पाडाव केली."
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
विजयाची बातमी शिवरायांकडे गेली राजे खूप खूश झाले. खबर घेऊन आलेल्या जासूदांना सोन्याची कडी दिली.विजयी वीर प्रतापराव सरनौबत, मोरोपंत पेशवे, आनंदराव, व्यंकोजी पंत यांना अपार बक्षीस आणि द्राव्य देण्यात आले. कोणाची ओंजळ रिकामी ठेवली नाही.मोरोपंतापासून ते सामान्य मावळ्यापर्यंत सर्वांची नावाजणी केली.पकडून आणलेल्या मोंगली सरदारांचाही सन्मान केला.त्यांना वस्रे घोडे देऊन विना तोशीस घरी पाठविले.हा पराभव दिल्लीच्या बादशहाच्या जिव्हारी लागला की सभासद म्हणतो- पातशहा असे कष्टी जाले. ‘खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून शिवाजीसच दिधली असे वाटते. आता समोरासमोर लढाई करून तोपर्यंत महाराजांना विजय प्राप्त झाला होता, त्यात साल्हेरचा विजय प्रथम मानावर होता. असा मोठा विजय यापूर्वी कधीही मिळाला नव्हता. या युद्धात महाराजांच्या लोकांनी दाखवलेल्या युद्धकौशल्याची व शौर्याची किर्ती चहुकडे पसरली आणि त्यांचा दरारा अधिकच वाढला. साल्हेर जिंकल्यानंतर त्यासमोरील मुल्हेर किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि संपूर्ण बागलाण प्रांतावर त्यांनी आपला शह बसवला.त्यामुळे सुरत शहरास कायमची दहशत बसली.ही साल्हेरीचा रणसंग्राम इतिहासाच्या पानांनी तुम्हा आम्हास सांगितला आहे.तो पुस्तक काढून वाचण्याचे कष्ट तुम्हा माझ्यासारखे तरुण घेत नाहीत व इतिहास केवळ इतिहासाच्या पानांवरच राहतो.तो कधी आमच्या मुखी येत नाही त्या साठीच हा खाटाटोप...!
______दुर्ग सालेरीच्या आसमंतात कित्येक निष्ठावंत मर्द मराठ्यांचे रक्त सांडले आहे.त्यांच्या समाध्या वा स्मारकशीळा समाजास व इतिहासास द्नात नाही परंतू त्यांच्या परक्रमाचे व स्वराज्याप्रती असेलेल्या इमानाला ती रणभूमी मात्र साक्ष आहे.त्या ईमानास जागत हा आसमंत आपण जाऊन न्याहाळला पाहीजे.तेथील घाटवाटा,दर्या खोर्या,नदी नाले यांचा अभ्यास आपण केला पाहीजे.बागलाण प्रांत सांप्रदचा सटाणा तालुका यास मराठ्यांच्या इतिहासात भौगोलिक दृष्ट्या महत्वाचे स्थान आहे.हा प्रांत महाराजांच्या हातात आला आणि सुरतेवर मराठ्यांचा कायमचा चाप बसला..!
तो दरारा त्या किल्ले सालेरीवर उभे राहून शांत चित्ताने आपण आळवायला हवा.!
धन्यवाद..
लेखनसिमा...!
(चुकभूल देणे घेणे)
_________________________________________
संदर्भ:-
*शिवकालीन पत्रसार संग्रह
-भारत इतिहास संशोधक मंडळ
शंकर नारायण जोशी
*शिवराजभूषण
-दु.आ.तिवारी,जळगाव
*सभासद बखर
-श्री.शंकर नारायण जोशी
*जेधे शकावली
-डॉ.अ.रा कुलकर्णा
* शिवापूरकर देशपांडे शकावली/शिवापूरकर दप्तराची यादी
संपादक-
भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे.
द.वि.आपटे व स.म.दिवेकर
*औरंगजेबाचा संक्षिप्त इतिहास
संपादक-
मुळ-डॉ जदूनाथ सरकार
अनुवाद-डॉ.श.गो.गोशाळकर
*राजा शिवछत्रपती-उत्तरार्ध
-बाबासाहेब पुरंदरे
*रणपती शिवाची महाराज
-आप्पा परब
_________________________________________
संकलक:-
नवनाथ आहेर
(९९२२९७३१०१)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...